स्टॅनोव्हॉय : रशियाच्या आग्नेय भागातील एक पर्वतश्रेणी. रशियातील याकूत हे स्वायत्त प्रजासत्ताक व अमूर प्रांत यांच्या सरहद्दी-दरम्यान पूर्व-पश्चिम अशी ही पर्वतश्रेणी पसरलेली आहे. लांबी ६२५ किमी. पश्चिमेस अल्येक्मा नदीपासून पूर्वेस माया नदीपर्यंत या पर्वत-श्रेणीचा विस्तार आहे. स्टॅनोव्हॉयच्या नैऋत्येस ट्रान्स-बायकाल्य श्रेणी, तर ईशान्येस ओखोट्स्क समुद्रकिनार्‍याला समांतर अशी दक्षिणोत्तर पसरलेली जुग्जूर पर्वतश्रेणी आहे.

जुग्जूर हा स्टॅनोव्हॉयचाच विस्तारित भाग आहे. स्टॅनोव्हॉयचा दक्षिण उतार तीव्र असून उत्तरेस अल्दान पठाराकडे हळूहळू त्याची उंची कमी होत गेलेली आहे. ही पर्वतश्रेणी फार उंचीची नाही. पूर्व भागात तिची उंची २,४१२ मी. पर्यंत वाढलेली आहे. स्कालिस्टी ( उंची २,४८२ मी.) हे या पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. २७ ऑगस्ट १६८९ रोजी रशिया-चीन यांच्यात न्येरचिन्स्क येथे झालेल्या न्येरचिन्स्क करारान्वये स्टॅनोव्हॉय पर्वतश्रेणी ही रशिया-चीन यांच्यातील सीमा म्हणून निश्चित करण्यात आली होती.

स्टॅनोव्हॉय पर्वतश्रेणी आणि तिच्याशी सलगता असणार्‍या श्रेण्या ह्या उत्तरेस आर्क्टिक महासागराकडे व पूर्वेस पॅसिफिक महासागराकडे वाहत जाणार्‍या नदीप्रणाली दरम्यानच्या जलविभाजक आहेत. मुख्य स्टॅनोव्हॉय पर्वतश्रेणी मात्र लीना व अमूर नद्यांची जलविभाजक आहे. या पर्वतश्रेणीवर तैगा प्रकारची दाट अरण्ये व दलदलयुक्त प्रदेश आढळतात. त्यांमध्ये लार्च वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. उंच शिखरे मात्र उघडी आहेत. या पर्वतीय प्रदेशात सोने, कोळसा व अभ्रक या खनिजांचे साठे आहेत. ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गाचा उत्तरेकडे जाणारा एक लोहमार्ग व एक महामार्ग या पर्वतश्रेणीतून जातो.

चौधरी, वसंत