स्टर्न, लॉरेन्स : (२४ नोव्हेंबर १७१३—१८ मार्च १७६८). इंग्रज कादंबरीकार. जन्म आयर्लंडमधील क्लॉनमेल येथे. स्टर्नचे वडील सैन्यात होते. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच लष्करी छावणीतील सैनिकी जीवनाची ओळख झाली. ह्या अनुभवाचा उपयोग त्याने आपल्या लेखनातही करून घेतला. केंब्रिज विद्यापीठातून तो पदवीधर झाला. त्यानंतरचे त्याचे सारे आयुष्य चर्चच्या सेवेत गेले. 

  स्टर्नच्या आयुष्यात बरेच ताणतणाव होते. त्याचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. १७५८ मध्ये त्याच्या बायकोला वेड लागले. त्याला स्वतःला क्षयाचा विकार होता. इंग्लंडची हवा त्याला मानवत नव्हती, म्हणून तो आपली पत्नी व मुलगी ह्यांच्यासह फ्रान्सला गेला. त्याच्या पत्नीच्या मानसिक प्रकृतीत तेथे सुधारणा झाली होती ती आपल्या मुलीसह फ्रान्समध्येच राहिली आणि स्टर्न एकाकी अवस्थेत इंग्लंडला परतला. १७५९ मध्ये ए पोलिटिकल रोमान्स ( पुढे द हिस्टरी ऑफ ए गुड वॉर्म वॉच-कोट ह्या नावाने प्रसिद्ध ) ही उपरोधिका त्याने लिहिली तथापि स्टर्न विख्यात झाला, तो त्याच्या दोन पुस्तकांमुळे. एक, ट्रिस्ट्रम शँडी ( कादंबरी ) आणि दोन, ए  सेंटिमेंटल जर्नी थ्रू फ्रान्स अँड इटली ( प्रवासवर्णन, १७६८).

  स्टर्नच्या ट्रिस्ट्रम शँडीचे नऊ भाग असून ते १७६०—६७ ह्या कालावधीत प्रसिद्ध झाले. ट्रिस्ट्रम शँडी  हा कादंबरीलेखनाचा एक आगळा आणि अवाढव्य प्रयोग होता. ह्या कादंबरीचे पहिले दोन भाग प्रसिद्ध होताच वाचक, तसेच समीक्षक स्तिमित झाले. काहींना ही कादंबरी गोंधळवून टाकणारी वाटली, तर काहींना ती कंटाळवाणी वाटली. ही कादंबरी म्हणजे एक वाङ्मयीन अराजक आहे, अशी प्रतिक्रिया असतानाही स्टर्नने मात्र आपण आयुष्यभर ह्या कादंबरीचे पुढचे भाग प्रसिद्ध करीत राहू , असे म्हटले होते.

  ही कादंबरी वाचकांना अराजकासारखी का वाटली, ह्याची काही कारणे अशी सांगता येतील : एक, ह्या कादंबरीला गती नाही. ह्या कादंबरीचा नायक ट्रिस्ट्रम शॅँडी ह्याचा जन्म होण्यासाठीच वाचकांना अगतिकपणे ह्या कादंबरीच्या तिसर्‍या खंडापर्यंत थांबावे लागते. त्याचा नामकरणविधी चौथ्या खंडात होतो. ह्या कादंबरीचे पूर्ण शीर्षक द लाइफ अँड ओपिनिअन्स ऑफ ट्रिस्ट्रम शँडी असे आहे पण नायकाचे चरित्र आणि त्याची मते सांगण्यासाठी ह्या कादंबरीत अनेक विषयांतरे येत राहतात. कादंबरीच्या तिसर्‍या खंडाचा अर्धाअधिक भाग झाल्यानंतर तिची प्रस्तावना येते. ह्या कादंबरीचा आणखी एक विशेष म्हणजे  तिच्यातील घटना कालानुक्रमाने सांगितलेल्या नाहीत. घड्याळाने मोजलेला काळ आणि अनुभव घेण्यास व्यक्तीला लागणारा काळ ह्यांत तफावत असते. तसेच वर्तमानकाळ ही एक निखळ गोष्ट नसून तिच्यावर भूतकाळातील घटनांचा परिणाम होत असतो, ही दोन तत्त्वे स्टर्नने ओळखली होती.

  ह्या कादंबरीला स्वतःचा असा एक कलात्मक घाट आहे. ट्रिस्ट्रमची  व्यक्तिरेखा या कादंबरीच्या सर्व घटकांशी संबद्धता राखते.

  ह्या कादंबरीत स्टर्नने विविध गोष्टी सांगितल्या आहेत. निरनिराळे विषय आणले आहेत. चर्चा, विनोदी चुटके, विडंबने यांची रेलचेल उडवून दिलेली आहे. तसेच करुण प्रसंगही घातले आहेत. त्यांतून त्याच्या व्यापक विद्वत्तेची आणि जीवनानुभवाची साक्ष पटते. त्याच्या   व्यक्तिरेखाटनामागची दृष्टीही आधुनिक मानसशास्त्राच्या बैठकीवर आधारित वाटावी अशी आहे. त्याच्यावेळच्या इतर लेखकांपेक्षा ती कितीतरी पुढच्या पल्ल्याची आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व पृथगात्म असते आणि व्यक्तिरेखांच्या अंतरंगात खोल शिरून स्टर्नने ती पृथगात्मकता दाखवून  दिली आहे. अंकल टोबी आणि कॉर्पोरल टिम ह्या त्याने निर्माण केलेल्या संस्मरणीय व्यक्तिरेखा होत.

  ए सेंटिमेंटल जर्नी… हे मिस्टर पार्सन योरीक या व्यक्तीचे प्रवासातील अनुभव सांगण्यासाठी म्हणून लिहिलेले आहे. पार्सन योरीक हा एक धर्मोपदेशक आहे. तो काहीसा तर्‍हेवाईक, पण सहृदय माणूस आहे. त्याचे हे प्रवासवर्णन लिहिताना स्टर्नने आपल्या लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण तंत्रे वापरलेली आहेत. त्याच्या ह्या प्रवासात अनेक बर्‍यावाईट गोष्टी घडतात लैंगिक साहसे होतात तसेच विषयांतरेही होतात. गद्यशैलीच्या हाताळ-णीच्या अंगाने पाहिले, तर स्टर्नचे सामर्थ्य स्पष्टपणे जाणवते. त्याच्या आवश्यकतेनुसार तो विविध प्रकारच्या शैली वापरतो. सहज संभाषणा-त्मकता आणि सुंदर वर्णनात्मकता तो पेलू शकतो. यूरोपीय साहित्यात स्टर्नला मिळालेले महत्त्व मुख्यतः त्याच्या ह्या पुस्तकामुळे आहे. गटे, हेन्रिक हाइन ह्यांसारख्या इंग्लंडबाहेरील थोर साहित्यिकांनी स्टर्नचा गौरव केला आहे. १७६७ मध्ये तो एलिझाबेथ ड्रेपर ह्या विवाहित तरुणीच्या प्रेमात पडला. ती त्याच्याहून वयाने फार लहान होती पण तिलाही आपल्या पतीकडे जावे लागले.

  लंडन शहरी तो निधन पावला.

संदर्भ : 1. Cash, Arthur H. Laurence Sterne : The Early and Middle Years, 1975. 

           2. Cross, Wilber L. Life and Times of Laurence Sterne, 1929. 

           3. Curtis, L. P. Letters of Laurence Sterne, 1935. 

           4. Hartley, Lodwick, Laurence Stern in the Twentieth Century : An Essay and Bibliography of Sturnean Studies, 1900–65, 1965.

कुलकर्णी, अ. र. देवधर, वा. चिं.