स्कोलॅस्टिकवाद : ( स्कोलॅस्टिसिझम ). व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार केला, तर स्कोलॅस्टिसिझम म्हणजे विद्यास्थानांच्या व बौद्धिक व्यासंगाच्या संबंधित असे जे जे असेल ते तथापि पश्चिमी इतिहासाचा संदर्भ पाहिला, तर चर्चवर अवलंबून असलेली विद्यालये, विद्यापीठे आणि मठ ह्यांच्या माध्यमातून सत्याचे व्यापक ज्ञान मिळविण्याचा, आत्मसात करण्याचा ख्रिस्ती धर्माने केलेला संपूर्ण प्रयत्न असा त्याचा अर्थ आहे. ह्या अर्थाने विचार केला, तर स्कोलॅस्टिकवाद हे एक जागतिक वास्तव आहे. त्याला भूतकाळ आहे, तसाच वर्तमानकाळही आहे. भूत-काळाचा विचार करता, स्कोलॅस्टिकवादाचा आरंभ मध्ययुगात अकराव्या शतकापासून होतो तथापि स्कोलॅस्टिकवाद हा मध्ययुगापर्यंतच सीमित नाही. त्याचप्रमाणे पश्चिमी इतिहासाच्या संदर्भातला स्कोलॅस्टिकवादाचा व्यापक अर्थ विचारात घेतला, तर स्कोलॅस्टिकवाद हा केवळ तत्त्व-ज्ञानापुरताच मर्यादित राहात नाही. त्यात ईश्वरशास्त्र, कला आणि इतर शास्त्रेसुद्धा येतात.

  पश्चिमी जगातील स्कोलॅस्टिकवाद आणि ख्रिस्ती धर्म हे परस्परांशी निकटपणे निगडित आहेत. वर म्हटल्याप्रमाणे सत्याचे व्यापक ज्ञान मिळवणे आणि ते आत्मसात करणे, तसेच ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ह्यासाठी ख्रिस्ती जगात जो प्रचंड प्रयत्न झाला, त्यामध्ये मध्ययुगीन काळातील ख्रिश्चन ईश्वरवादी विचारवंतांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

  स्कोलॅस्टिकवादाचा प्रारंभ ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीबरोबर ताबडतोब झाला नाही कारण आरंभी ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांतांची शिकवण आणि प्रसार काही थोर व्यक्तींनी व्यक्तिगत पातळीवर केला. त्यांना चर्चचे जनक ( फादर्स ऑफ द चर्च ) म्हणत. तथापि इ. स. च्या सहाव्या शतकाच्या सुमारास ख्रिस्ती मठांतून किंवा एखाद्या कॅथीड्रलच्या नजीक शाळा स्थापन होऊ लागल्या. ह्यांतील काही शाळा — मुख्यतः कॅथीड्रलशी नजीकपणे निगडित असलेल्या मोठ्या शहरांतल्या शाळा — यथावकाश विद्यापीठांत विकसित झाल्या. मध्ययुगातील स्कोलॅस्टिकपरंपरेची प्रस्थापना अशा प्रकारे झाली. सोळाव्या शतकात काही अग्रगण्य विद्वानांनी हळूहळू चर्चचा संबंध सोडला तरी चर्चचा हा विद्यावर्धक प्रयत्न थांबला नाही. तो काही विद्यापीठांतून, तसेच नव्याने बहरास आलेल्या सेमिनरींमधून चालूच राहिला. ह्या विद्याकेंद्रांतून भावी धर्मोपदेशकांना प्रशिक्षण दिले जात असे. निरनिराळ्या धार्मिक भ्रातृसंघटनांकडेही बरेच साधक वळले होते. अशा साधकांच्या आश्रमांतूनही विद्यादान चालू होते. अशा प्रकारे स्कोलॅस्टिक-वादाचा प्रभाव आजही टिकून राहिलेला आहे. त्याच्या प्रभावामध्ये चढ-उतार मात्र झालेले दिसतात.

वर म्हटल्याप्रमाणे स्कोलॅस्टिकवाद हा केवळ तत्त्वज्ञानापुरताच सीमित नाही. मध्ययुगात स्कोलॅस्टिकवादाने आपल्या कक्षेत उदार कलांचे दोन संच घेतले होते. उदार कला ( लिबरल आर्ट्स ) म्हणजे असे अभ्यासविषय, की जे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान आणि त्यांची विचार करण्याची क्षमता विकसित करतात. त्यांच्या तांत्रिक कौशल्यावर इथे भर नसतो. स्कोलॅस्टिकवादाने अभ्यासविषय म्हणून स्वीकारलेल्या विषयांचे दोन संच म्हणजे (१) व्याकरण, तर्कशास्त्र आणि वादशास्त्र. हे तीन विषय आहेत म्हणून त्यांना ‘ट्रिव्हिअम’ असे म्हटले जाई. (२) अंकगणित, भूमिती, खगोलशास्त्र आणि संगीत. हे चार विषय आहेत म्हणून त्यांना ‘ क्वाड्रिव्हिअम’ असे म्हटले जाई. ह्यांशिवाय तत्त्वज्ञान, ईश्वरशास्त्र, वैद्यक आणि कायदा असे विषयही अभ्यासासाठी असत. हे सर्व स्कोलॅस्टिकवादाचेच भाग होत. असे जरी असले, तरी तत्त्वज्ञान आणि ईश्वरशास्त्र ह्या दोन विषयांत स्कोलॅस्टिकवादाला त्याची ओळख ठळक-पणे गवसली. मध्ययुगात चर्चचे काम म्हटले म्हणजे प्राचीन अभिजात जगाच्या अवशिष्ट अंगांचे रक्षण करणे आणि चर्चकडे धार्मिक सिद्धांतांचा आणि धार्मिक अंतर्दृष्टीचा जो वारसा आरंभी आलेला होता, त्याच्याशी ह्या   अवशिष्ट अंगांची नीट सांगड घालणे. ह्या कामी चर्चला विद्वत्तेच्या क्षेत्रात प्रसृत असलेल्या एकाच भाषेची —  लॅटिनची —  खूप मदत झाली.

  ख्रिस्ती पाठशाळांतून अभ्यासाची एक विशिष्ट पद्धत विकसित झाली. शतकांमागून शतके गेली, तशी तिच्यात काही विशिष्ट परिवर्तने झाली पण तिचा भर नेहमीच ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्रोतांचा आणि प्रमाणभूत ग्रंथकारांचा शोध घेण्यावर राहिला. तसेच तर्कसंगत युक्तिवादांवरही तिचा भर राहिला. मध्ययुगीन स्कोलॅस्टिकवादात सर्व प्रश्नांच्या अभ्यासाच्या आरंभी एखाद्या प्रमाणग्रंथावरील एखाद्या पारंगत पंडिताचे भाष्य घेऊन त्याचे म्हणणे काय आहे, हे प्रथम स्पष्ट केले जाई हा पूर्वपक्ष. त्यानंतर विवाद हा भाग सुरू होई. त्यात समोर असलेल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण आणि पूर्व-पक्षाने उपस्थित केलेल्या सर्व आक्षेपांना उत्तरे दिली जात. आधुनिक स्कोलॅस्टिकवादात लहान पाठ्यपुस्तके वर्गांत शिकवण्याचा क्रम असा असे : प्रथम शिकवावयाचा सिद्धांत स्पष्टपणे मांडावयाचा. त्यातील संज्ञांचे स्पष्टीकरण वा व्याख्या द्यावयाची. त्यानंतर संबंधित विषयावरील विरुद्ध मतांची यादी पुढे आणायची. ह्या प्राथमिक गोष्टी झाल्यानंतर सिद्धांताचे प्रमाण (प्रूफ) सविस्तरपणे मांडावयाचे आणि अखेरीस संवाक्यरूपाने (सिलॉजिस्टिक फॉर्म) त्याचा सारांश तयार करावयाचा. शेवटी विविध आक्षेपांना उत्तरे द्यावयाची. सादरीकरणाचा हा प्रकार अतिकाटेकोर व बंदिस्त होता. जगातील वस्तू , त्यामध्ये मानवही आलाच, जशा आहेत तशाच त्या का आहेत, याचे आकारिक स्पष्टीकरण देण्यासाठी एक विशिष्ट परिभाषा विकसित करणे आवश्यक झाले होते. जुन्या प्रचलित शब्दांना नवीन अर्थांची परिमाणे देऊन अशी कृत्रिम भाषा विकसित करण्याचा प्रयत्न स्कोलॅस्टिकवाद्यांनी केला. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक भाषा व पूर्णतः कृत्रिम भाषा ( उदा., आकारिक तर्कशास्त्राची भाषा ) यांच्यातील सुवर्णमध्यच होता. त्यांनी जरी पूर्णतः कृत्रिम भाषेचा अवलंब केला नाही, तरी त्यांनी विकसित केलेली अर्ध-कृत्रिम भाषा अर्थ व आकलन यांच्या दृष्टीने तितकीच दुर्बोध व विशिष्ट क्षमतांची मागणी करणारी होती. त्यामुळेच ‘स्कोलॅस्टिकवादी विचारवंत क्लिष्टआणि अर्थदुर्गम शब्दांच्या आवरणाखाली आपले अज्ञान झाकतात’ अशी जॉन लॉकने टीका केली. यातील अतिशयोक्ती बाजूला ठेवली तरीसुद्धा क्लिष्टता, दुर्बोधता व अतितांत्रिकता हे स्कोलॅस्टिकवाद्यांच्या भाषेतील व सिद्धांतमांडणीतील निश्चितपणे कमजोर घटक होते. शब्दांचे नेमके अर्थ व काटेकोर व्याख्या यांच्या अभावामुळे या भाषेच्या वापरासाठी आणि आकलनासाठी सर्वसामान्य पातळीपेक्षा वेगळ्या अशा प्रतिभेची गरज होती व हा त्यांच्या विचारविकासातील प्रमुख अडथळा होता. त्यामुळे कालांतराने विचारांच्या देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून ही भाषा वापरणे अवघड होऊन बसले.

स्कोलॅस्टिकवादात विचार आणि सिद्धांत ह्यांत नेहमीच ऐकमत्य होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल तथापि काही विशिष्ट सत्यांना सर्वच स्कोलॅस्टिकवादी पंडितांनी मान्यता दिलेली होती. उदा., ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याची चैतन्यशीलता ( स्पिरिच्युॲलिटी ), त्याचे अमरत्व आणि स्वातंत्र्य.

  स्कोलॅस्टिकवादाला ज्या समस्या सोडवणे भाग होते, त्यांतील मुख्य समस्या म्हणजे स्कोलॅस्टिकवादात बुद्धी आणि श्रद्धा ह्यांचे स्थान किंवा तत्त्वज्ञान आणि ईश्वरविद्या ह्यांचे स्थान. एका बाजूने विचार केला, तर ईश्वरविद्येत श्रद्धा ही मूळ गृहीतकृत्य होय पण श्रद्धा ही स्वतःला कुठवर समजू शकणार, हा महत्त्वाचा मुद्दा. याउलट तत्त्वज्ञानात सत्तेच्या ( रिॲलिटी ) शुद्ध, बुद्धिनिष्ठ अन्वेषणाला वाव होता तथापि प्रश्न असा होता, की श्रद्धेच्या प्रकाशापासून ह्या अन्वेषणाने कुठवर लाभ शोधावा किंवा शोधू नये ? ह्या सर्वसामान्यतः मान्य असलेल्या प्रश्नाची सोडवणूक अशी, की ईश्वरशास्त्रात बुद्धी ही श्रद्धेला स्वतःला समजून घेण्यासाठी एका हद्दीपर्यंत साहाय्यभूत होते पण गूढतेचे स्थान नष्ट न करता आणि तत्त्वज्ञानात साक्षात्कार ( रेव्हिलेशन ) हा युक्तिवादाचा अंगभूत ( इन्ट्रिन्सिक ) पाया म्हणून येत नाही, तर केवळ एक बाह्यगत ( एक्स्ट्रिन्सिक ) आचारनियम म्हणून येतो. त्यामुळे तत्त्वज्ञानाला आपण परंपरेची चाकोरी सोडली नाही, असे आश्वासन मिळते.

मध्ययुगीन स्कोलॅस्टिकवादाच्या परंपरेतील काही उल्लेखनीय व्यक्ती अशा : ⇨ बोईथिअस ( सु. ४८० — ५२४) हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान आणि ख्रिस्ती धर्मश्रद्धेत अंतर्भूत असलेले सिद्धांत ह्यांच्यात समन्वय साधू पाहणार्‍या स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञांचा पूर्वसूरी. अल्क्विन (७३० — ८०४) हा शार्लमेनच्या पॅलेटिन येथील विद्यालयाचा संघटक. जॉन स्कोट्स एरियूजिन (८१० — ८८०), ॲन्सेल्म ऑफ कँटरबरी (१०३३ — ११०९), सत्ताशास्त्रीय ( ऑन्टॉलॉजिकल ) युक्तिवादाच्या आधारे ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा सादर करणारा ⇨ पीटर ॲबेलार्ड (१०७९ — ११४२). स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाच्या प्रारंभीच्या काळी एक वादपटू म्हणून त्याने भाग घेतला. एकाच प्रश्नावरील पूर्वपक्ष व उत्तरपक्ष एकत्र मांडण्याच्या स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाच्या पद्धतीचे पूर्वदर्शन त्याच्या येस् अँड नो  ह्या पुस्तकात घडते. ह्यू (१०९६ — ११४१) व रिचर्ड  ( मृ.११७३ ) हे दोघे पॅरिसजवळील सेंट व्हिक्तोर ॲबीशी संबंधित होते. स्कोलॅस्टिकवादाला एक गूढ दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला ⇨ रॉजर बेकन (१२१४ — ९२) ह्याला विज्ञानात स्वारस्य होते. प्रयोगसिद्ध विज्ञानाचा तो एक महत्त्वाचा पुरस्कर्ता आणि प्रवर्तक. प्रयोगसिद्ध म्हणजे साक्षात अनुभवावर आधारलेले असे ज्ञान परंतु गूढ अनुभवांवर आधारलेल्या ज्ञानाप्रमाणेच प्रयोगसिद्ध ज्ञान असते ईश्वर आपले अंतर्मन प्रकाशित करून आपल्याला गूढ अनुभव प्राप्त करून देतो, अशी त्याची भूमिका होती. विज्ञान व गूढ अनुभवांवर आधार- लेले ज्ञान ह्यांचे एक विचित्र पण हृदयंगम मिश्रण त्याच्या विचारांत आढळते. बोनाव्हेंचर (१२२१ ? — ७४) याने सेंट ऑगस्टीन आणि ॲरिस्टॉटल ह्यांच्या विचारांचे एक मिश्रण आपल्या तत्त्वज्ञानातून मांडले आणि मानवी संकल्पशक्तीच्या महत्त्वावर भर दिला ⇨ सेंट टॉमस अक्वाय्नस (१२२५ ? — ७४) ह्याने प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान आणि ख्रिस्ती धर्मश्रद्धेत अंतर्भूत असलेले सिद्धांत ह्यांचा समन्वय साधणे व त्याचे सुव्यवस्थित विवरण करणे हे स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट समर्थपणे तडीस नेले. विल्यम ऑफ ओक्हॅम (१२९० ? —१३४९) हा त्याच्या चिकित्सक-पणाबद्दल प्रसिद्ध होता. त्याची व डन्स स्कॉट्स याची विचारांची दिशा खूपच भिन्न होती.


मध्ययुगीन स्कोलॅस्टिकवादाचे चित्र इस्लामी आणि ज्यू तत्त्वज्ञानाचा त्यावर असलेल्या प्रभावाचा निर्देश केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. खरे तर ॲरिस्टॉटलचे विचार पश्चिमी जगात बर्‍याच प्रमाणात काही काही अरबी तत्त्वज्ञांमार्फतच संक्रमित झाले आहेत. अरबी तत्त्वज्ञ ॲव्हिसेना म्हणजेच ⇨ इब्न सीना आणि आव्हेरोइझ म्हणजेच ⇨ इब्न कश्द ह्यांचा निर्देश ह्या संदर्भात करता येईल. माइमोनिडीझ आणि ॲव्हिस बॉर्न(१०२० — ७०) हे ज्यू तत्त्वज्ञही उल्लेखनीय आहेत.

आधुनिक किंवा मध्यकालीन स्कोलॅस्टिकवादाची चळवळ प्रबोधन-काळात मानवतावाद्यांनी केलेल्या आघातांतूनही शाबूत राहिली आणि जरी ती मध्ययुगातल्यासारखी विद्याक्षेत्रात सार्वभौम राहिली नसली, तरी फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ रने देकार्त पासून (१५९६—१६५०) एकोणिसाव्या शतकापर्यंत अतिशय सक्रिय अशी एक वैचारिक चळवळ होती. धर्मसुधारणांच्या काळात ख्रिस्ती धर्म विभागला गेला. काही काळपर्यंत प्रॉटेस्टंट पंथीय ख्रिस्ती धर्मीयांनी स्कोलॅस्टिकवादाचे कार्य सुरू ठेवले. हे काम त्यांनी ऑक्सफर्ड, केंब्रिजसारख्या विद्याकेंद्रांतच केले असे नाही, तर त्यांनी ह्या चळवळींचा प्रभाव अमेरिकेपर्यंत पोहोचवला. तेथे त्यांनी जी केंद्रे उभी केली त्यांतूनच हार्व्हर्ड आणि येल ही विद्यापीठे उभी राहिली. ट्रेंट येथील धर्मपरिषदेच्या द्वारा रोमन कॅथलिकांनी धर्म-सुधारणेच्या विरुद्धचा आपला प्रतिकार जोरदार केला. त्यावेळी स्कोलॅ-स्टिकवादाच्या बाजूला टॉमस अक्वाय्नसच्या ग्रंथावरील थोर भाष्यकार होते. त्याचप्रमाणे ख्रिस्ती सिद्धांताचे विस्तृत सारांश सांगणार्‍या नव्या प्रकारच्या पाठ्यपुस्तकांच्या लेखकांची अनेक पुस्तके विद्यालयांतून आणि सेमिनरींमधून प्रसारित झाली. फ्रांथीस्को स्वारेथ (१५४८—१६१७) ह्या स्पॅनिश स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञाची ‘मेटॅफिजिकल डिस्प्यूटेशन्स’ ( इं. शी. ) आणि ‘ऑन लॉन्स’ ( इं. शी.) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ह्या पुस्तकांचा यूरोपातल्या अनेक देशांतील आधुनिक स्कोलॅस्टिकवादावर मोठा प्रभाव पडला. ह्याच काळात विविध धार्मिक गटांत मोठे वाद झाले. माणसाच्या परित्राणासाठी (  सॅल्व्हेशन  ) ईश्वरी अनुग्रह ( ग्रेस ) आणि मानवी स्वातंत्र्य काय करते, ह्या प्रश्नाच्या संदर्भातले हे वाद होते. तसेच राजकीय सत्तेचा मूलस्रोत हा ईश्वरी असतो, की अ-ईश्वरी ( नॉन्-डिव्हाइन ) ? ज्या नैतिक कृत्यांच्या चांगलेपणाबाबतची मते केवळ संभाव्यतेच्या सीमेत असतात, त्यांचा वास्तविक आधार काय? मानवी स्वभावाचा उत्कर्ष त्याच्या बुद्धीत असतो, की इच्छाशक्तीत? धार्मिक सत्ता श्रेष्ठ, की नागरी? हेही प्रश्न होते.

आधुनिक स्कोलॅस्टिकवादाने तत्कालीन तत्त्वज्ञानीय संप्रदायांबरोबरड्ढमग तो अनुभववाद असो वा चिद्वाद — जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्कोलॅस्टिकवादाची स्वतःची विचारव्यवस्था पुष्कळच स्वत्वहीन झाली आणि अनेक मतांची केवळ गोळाबेरीज, असे तिचे स्वरूप राहिले. 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला टॉमस अक्वायन्स ह्याच्या तत्त्व-ज्ञानाचा पुन्हा अभ्यास करून त्याची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न झाला. ह्यातूनच ⇨ नव-टॉमस मत ( स्कोलॅस्टिकवादाने अलीकडच्या काल-खंडात धारण केलेले प्रमुख रूप ) उगम पावले. केवळ धर्मोपदेशक वा धर्मनेतेच नव्हेत, तर ह्या चळवळीतील सामान्य माणसांनीही हे दाखवून दिले. एत्येन-आंरी गिल्सन (१८८४—१९७८) आणि ⇨ झाक मारीतँ (१८८२—१९७३) ह्यांना केवळ स्कोलॅस्टिक वर्तुळातच नव्हे, तर धर्मनिरपेक्ष विद्याकेंद्रांतसुद्धा जागतिक कीर्ती प्राप्त झाली. स्कोलॅस्टिक-वादी ईश्वरशास्त्राचा प्रभाव १८६९-७० व १९६३—६५ ह्या वर्षांत व्हॅटिकन येथे भरलेल्या धर्मपरिषदांवरही होता. 

मूल्यमापन : आधुनिक युगाच्या आरंभी स्कोलॅस्टिकवाद ही संज्ञा मध्ययुगीन विचारांना विरोध करणार्‍या मानवतावाद्यांकडून काहीशा तुच्छतेने वापरण्यात येई. ह्यातून तत्त्वज्ञानाच्या इतिहासात प्राचीन जगातील लेखकांवरून एकदम आधुनिक जगातील लेखकांकडे उडी घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली तथापि स्कोलॅस्टिकवादाने आधुनिक विचारांना घडविण्याच्या कामी महत्त्वाचा प्रभाव टाकला, ही वस्तुस्थिती अधिकाधिक प्रमाणात मान्यता पावू लागली आहे. आधुनिक आणि समकालीन स्कोलॅस्टिकवाद त्याच्या वास्तव आणि आध्यात्मिक दृष्टिकोणामुळे, टोकाचा चिद्वाद आणि जडवाद ह्यांच्या विचारस्रोतांना स्थैर्य देणारा घटक ठरलेला आहे. स्कोलॅस्टिकवादात काही त्रुटी निःसंशयपणे आहेतच तथापि ती एक  प्रचंड आणि वजनदार चळवळ असल्यामुळे प्रसंगी परंपरा, प्रामाण्य वा अधिकारिता ( ऑथॉरिटी ) आणि पुनरावृत्ती ह्यांचे दडपण तिच्यावर यायचे. त्यामुळे नवीन, महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टींशी — विशेषतः विज्ञानातल्या — ताबडतोब जुळवून घेणे तिला जमले नाही. परंतु ह्या चळवळीतील संशोधनाची आणि शिक्षणाची रीत आजच्या विज्ञानाने यशस्वी रीत्या वापरलेल्या रीतीची पूर्वनिदर्शक आहे. समकालीन तत्त्वज्ञ मात्र स्वतःच्या व्यक्तिगत अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवून अद्याप अशा वैश्विक विचारांचा शोध घेत आहेत, की जो स्कोलॅस्टिकवादाच्या समकालीन प्रस्तुततेबद्दल अशी आशा निर्माण करील तथापि हा हेतू अजूनही सिद्धीस गेला नाही. बुद्धी व अनुभव यांच्यातून संयुक्तपणे निर्माण होणार्‍या ज्ञानाला प्राधान्य देणार्‍या आधुनिक विज्ञानयुगात धार्मिक व आध्यात्मिक विचारांना सर्वोच्च लेखणारा स्कोलॅस्टिकवाद टिकून राहणेही कठीण आहे. गॅलिलिओच्या विज्ञानयुगाचा प्रारंभ हा त्याचा उत्तम निर्देशांक आहे.

जे. डी. मार्नेफ, एस्. जे. (इं.) दीक्षित, मीनाक्षी कुलकर्णी, अ. र. (म.)