सौंदर्यप्रसाधने : व्यक्तीचे सौंदर्य व मोहकता वाढविणे आणि सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्त्वात सुधारणा करणे यांसाठी विशेषेकरून तयार केलेल्या द्रव्यांना किंवा पदार्थांना सौंदर्यप्रसाधने म्हणतात. सौंदर्यप्रसाधन या संज्ञेच्या कायदेशीर अर्थामध्ये पुढील गोष्टी अंतर्भूत असतात : शरीर स्वच्छ करणे, त्याचे सौंदर्य वृद्धिंगत करणे, व्यक्तिमत्त्व आकर्षक करणे आणि त्यासाठी चेहरेपट्टीत फेरबदल करणे यांसाठी वापरण्यात येणारे पदार्थ शरीरावर, शरीरांत किंवा शरीराच्या भागांवर लावणे किंवा चोळणे, त्यांचे मज्जन करणे, ती शरीरावर शिंपडणे वा फवारणे यांसाठीचे पदार्थ आणि त्यांच्या जोडीला त्याच्यातील एक आवश्यक घटक म्हणून वापरण्यात येणारे पदार्थ किंवा वस्तू. तथापि, सर्वसाधारणपणे सौंदर्यप्रसाधनातील एक आवश्यक घटक म्हणून साबणाचा समावेश होत नाही. अशा प्रकारे चेहरा, हात, पाय, नखे, केस, कर्परावरण (डोक्यावरील कातडी) इत्यादींना लावण्यात येणारी सर्व प्रकारची क्रीमे (स्नेहांश), चूर्णे (पावडरी), धावन द्रव (लोशन), वर्णदायक घटक तसेच त्यांच्या सीमारेषेवरील दुर्गंधीनाशके (डीओडरंट), केशनिष्काशके (हेअर रिमूव्हर), सौरदाहनिवारक द्रव्ये (सनस्क्रीन लोशन) यांसारखी द्रव्ये सामान्यपणे सौंदर्यप्रसाधन या संज्ञेत येतात. तयार वा सिद्ध केलेल्या अंतिम सौंदर्यप्रसाधनाचे पदार्थ हे व्यक्तीची अंगकांती, केस, हात, पाय, नखे इत्यादींचे सौंदर्य व आरोग्य वाढविण्याच्या उद्देशाने तयार केलेले असतात. अशा प्रकारे आरोग्य व सौंदर्य यांविषयीच्या दुहेरी कार्यामुळे जगभर सौंदर्यप्रसाधनांचा उद्योग हा एक प्रमुख उद्योग झाला आहे.

सौंदर्यप्रसाधनशास्त्र ही अनुप्रयुक्त (व्यावहारिक) विज्ञानाची शाखा आहे. सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू आणि उपचार यांचा वापर करून व्यक्तीचे बाह्य सौंदर्य वाढविणे किंवा व्यक्तीचे अलंकरण करणे याचा या व्यावसायिक शाखेशी संबंध येतो. या कलात्मक व्यवसायात सौंदर्यवर्धक पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांचा (प्लॅस्टिक सर्जरीचा) अंतर्भाव करतात. सुसंघटित अभ्यास म्हणून या विज्ञानशाखेची सुरुवात १८९५ मध्ये झाल्याचे मानतात. त्या वर्षी शिकागो (अमेरिका) येथे त्वचा व केस यांच्यावरील उपचारांसाठी सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याचे शिक्षण देणारी पहिली शाळा स्थापन झाली. या शैक्षणिक अभ्यासाचा झपाट्याने विस्तार व प्रसार झाला. या विषयाचा विस्तार प्रथम खाजगी शाळांमधून आणि १९२२ नंतर अनेक व्यावसायिक व औद्योगिक माध्यमिक विद्यालयांतही झाला.

इतिहास : सौंदर्यप्रसाधनांचा वापर प्रागैतिहासिक काळापासून होत आलेला आढळतो. सौंदर्यप्रसाधने तयार करणे व त्यांचा उपचारांसाठी उपयोग करणे या गोष्टींची माहिती प्रगत व अप्रगत देशांत वा संस्कृतींत होती. भारत, ईजिप्त, चीन इ. देश याबाबतीत एकेकाळी आघाडीवर होते. काळानुरूप सौंदर्यप्रसाधनांचे स्वरूप बदलत गेलेले आढळते.

अश्मयुगात माणूस जवळजवळ नग्नावस्थेत राहात असे. तशाही अवस्थेत शरीर सुशोभित करण्यासाठी आदिमानव निरनिराळ्या आकारांची पाने शरीराभोवती गुंडाळीत असे आणि अंगाला विविध नैसर्गिक रंगांनी सुशोभित करीत असे. हा मानव उपजीविकेकरिता इतर प्राण्यांची शिकार करीत असे. या प्राण्यांची हाडे, कातडी, शिंगे किंवा पक्ष्यांची पिसे यांचा सौंदर्यप्रसाधनाची साधने म्हणून तो उपयोग करीत असे. नंतरच्या काळात विविध रंगांच्या दगडांचे वा खनिजांचे मणी, पोवळे व मोती यांसारख्या अनेक प्राणिज वस्तू यांचा तो अलंकरणासाठी उपयोग करू लागला. नंतरच्या काळात निरनिराळ्या धातूंचा सौंदर्यप्रसाधनांसाठी वापर सुरू झाला. यातूनच सोने व चांदी यांसारख्या अनेक मौल्यवान धातूंचे अलंकार पुढे आले.

आ. १. ब्रिटिश वस्तुसंग्रहालयातील मृत्पात्रावरील सौंदर्यप्रसाधन करणारी स्त्री (इ. स. पू. सु. विसावे शतक)गोंदणे हा सौंदर्यवर्धनाचा एक प्राचीन काळापासून चालत आलेला प्रकार आहे. ईजिप्तमध्ये इ. स. पू. सु. २००० वर्षे इतक्या आधीच्या काळातील ⇨ ममीच्या शरीरावर गोंदल्याच्या निळसर खुणा आढळल्या आहेत. तसेच न्यूझीलंडमधील माओरी जमातीत गोंदण्याची कला अत्यंत प्रगत अवस्थेत होती, असे दिसून येते. ख्रिश्चन व इस्लाम धर्मांत गोंदणे निषिद्ध मानले होते. काही ठिकाणी संपूर्ण शरीरावर गोंदवून घेत असत. मध्यंतरीच्या काळात ही कला बरीच मागे पडली होती मात्र विसाव्या शतकाअखेरीस ही कला निराळ्या रूपात ‘स्व’ अभिव्यक्ती प्रकार म्हणून पुढे आलेली दिसते. भारतात ग्रामीण भागांत विशेषतः आदिवासी जमातींत गोंदण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.[ ⟶  गोंदणे].

त्वचा मऊ नितळ, सुंदर व कोमल करण्यासाठी भारतात फार पूर्वीपासून निरनिराळ्या प्रकारची सुगंधी उटणी वापरली जात आहेत. मोहरी, हळद व तीळ यांच्यापासून तयार केलेले चूर्ण अंगाला लावीत. त्यामुळे शरीर सोन्याप्रमाणे कांतिमान होते व अंग सुगंधित होते. ज्येष्ठमध, सरसू, सातू व लोध्र (एक वनस्पती व तिची साल) यांचे चूर्ण उटणे म्हणून चेहऱ्यावर लावीत. यामुळे चेहरा तजेलदार होतो, असे मानीत. अशा प्रकारच्या अनेक उटण्यांचा उल्लेख प्राचीन संस्कृत ग्रंथांत आढळतो. आजही या प्रकारच्या उटण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर भारतात होतो.

ग्रामीण भागात हळद, ताक, लिंबाचा रस, दूध, नारळाचे दूध, काकडीचा रस, खोबरेल तेल, दुधावरील साय वगैरे पदार्थ स्नानापूर्वी सर्वांगाला व केसांना लावण्यात येतात. यामुळे डोक्यातील कोंडा व खवडा नाहीसा होतो, असा अनुभव आहे. आंबेहळद, खसखस व कारले एकत्र भिजवून वाटून नंतर आंघोळीच्या आधी अर्धा तास अंगाला लावतात. यामुळे त्वचा मऊ होते व पुरळाने येणारी खाज कमी होते.

साबणाऐवजी शिकेकाई, रिठे किंवा डाळीचे पीठ केसांना व अंगाला लावून नंतर आंघोळ करतात. त्यामुळे त्वचा व केस मऊ आणि स्वच्छ होतात. विशेषतः गुजरात, राजस्थान व पंजाब या राज्यांतील ग्रामीण भागात केस धुण्यासाठी स्त्रिया चिकण माती वापरतात. परिणामी साबणामुळे केसांना येणारा चिकटपणा येत नाही आणि केस स्वच्छ, मऊ व मोकळे (गुंता नसलेले) होतात.

अंगाला तेल लावून मालीश करण्याची प्रथा पूर्वीपासून प्रचलित असून अशा मालीशमुळे रक्ताभिसरण चांगले होऊन स्नायू व नसा तजेलदार होतात आणि थकवा नाहीसा होतो. शरीरसौष्ठव वाढविण्यासाठीही मल्ल तेलाने शरीराला मालीश करतात. लहान बाळांना तेल लावून व नंतर हरभऱ्याच्या डाळीचे पीठ लावून न्हाऊ घालण्याची प्रथाही रूढ आहे.

आ. २. सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून शृंगार करताना प्रचीन ईजिप्शियन स्त्रिया (पपायरसावरील चित्र इ. स. पू. सोळावे शतक).माणूस सुवासिक द्रव्ये व अत्तरे कधीपासून वापरू लागला ते ज्ञात नाही. तथापि, फार पूर्वीपासून हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये व यज्ञयागांमध्ये सुवासिक द्रव्ये (उदा., ऊद, चंदन) वापरीत असत. यामुळे जंतुनाश होतो व मन प्रफुल्लित होते. याचा आरोग्यरक्षणासही हातभार लागतो. अभ्यंगस्नान, वाफाऱ्याचे स्नान, डोणीतील वा कुंडातील स्नान (टब बाथ) यांमध्ये सुगंधी द्रव्ये व अत्तरे वापरण्याची पद्धतही आढळते. विशेषतः दिवाळीच्या वेळी असे स्नान करतात.

चेहरा मोहक व नितळ राहण्यासाठी लोणी, तूप किंवा कोकम तेल त्यावर चोळून लावीत. चेहऱ्यावरील लव घालविण्यासाठी तेल व हळद वापरतात. लहान मुलांच्या अंगावरील लव कमी करण्यासाठी तेल, हळद वा हरभरा डाळीचे पीठ चोळून लावतात. चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी तीट, हळद व कुंकू लावतात. भांगामध्ये व कपाळावर कुंकू किंवा सिंदूर लावतात. चेहरा अधिक सुंदर दिसावा म्हणून केसांची काळजी घेतात व केशभूषेचे विविध प्रकार तयार करतात. केशरचना व केशभूषा या कला भारतात अगदी प्राचीन काळात परिपूर्ण अवस्थेत पोहोचल्या होत्या, हे अजिंठा आणि वेरूळ येथील चित्रे व मूर्ती यांत आढळणाऱ्या स्त्रियांच्या केशभूषेतून उघड होते.[ ⟶ केशभूषा].


 भारतात पाणीदार व काळेभोर डोळे हे सौंदर्याचे एक प्रमुख लक्षण असून डोळे असे दिसावेत म्हणून त्यांत काजळ घालतात वा सुरमा लावतात. लोण्यापासून किंवा कावळ्याच्या अंड्यापासून बनविलेले काजळ विशेषतः लहान मुलांसाठी वापरतात.

नैसर्गिक लाल ओठ हे आरोग्याप्रमाणेच सौंदर्याचेही एक प्रमुख द्योतक आहे. ओठ लाल दिसण्यासाठी पूर्वी मुख्यतः स्त्रिया औषधीयुक्त व सुगंधी विडा खात असत. अक्रोडाची साल चावून ओठ लाल होऊ शकतात. मात्र ही साल अतिशय तिखट असल्याने ओठ भाजतात. शिवाय ही साल रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी दातांवर घासल्यास दात पांढरे शुभ्र होऊन चमकदार होतात. हिरड्याची साल, कापूर, बदामाची साल, मीठ व शेणी (रानात नैसर्गिक रीतीने सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या) या वस्तू जाळून बनणारी राख वस्त्रगाळ करून दात घासण्यासाठी राखुंडी म्हणून वापरतात. आयुर्वेदात विविध प्रकारच्या राखुंड्यांचे उल्लेख आढळतात. आता त्यांची जागा दंतमंजने, दंतधावने, मुखशुद्धीकरण द्राव इत्यादींनी घेतली आहे. नखे, हात, तळपाय व त्यांच्या कडा सुंदर दिसण्यासाठी त्यांना मेंदी वा अळतो (लाखेपासून केलेला तांबडा रंग) लावतात. तसेच केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केसांनाही मेंदी लावतात. चुन्याबरोबर वाटून लावलेल्या मेंदीचा रंग पक्का लाल होतो.

पूर्वी चंदन, कापूर, वाळा, कस्तुरी, केशर, नागरमोथा, शिलाजीत, लोध्र इ. असंख्य सुगंधी द्रव्ये घामाची दुर्गंधी घालविण्यासाठी वापरीत असत. आता त्यासाठी घर्मदुर्गंधीनाशके वापरली जातात.

वरील वर्णनावरून विशेषतः भारतातील व काही प्रमाणात पौर्वात्य देशांतील प्रसाधन पद्धतींमध्ये शारीरिक आरोग्याला मदत करून शारीरिक सौंदर्य वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते.

सौंदर्यप्रसाधनांचा उदय भारत व चीन येथे झाला असण्याची दाट शक्यता आहे. महाभारतात द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी म्हणून काम करत असताना ती प्रसाधन पेटिका घेऊन वावरत असल्याचा उल्लेख आहे. अष्टांग-हृदय (इ. स. ५००) या ग्रंथात सहा ऋतूंसाठी सहा प्रकारची सौंदर्यप्रसाधने सांगितलेली आहेत. तंजावर (तमिळनाडू) येथील संस्थानिक राजा सरफोजी (कार. १७८८-१८३२) याने वनस्पती औषधींचे संशोधन करण्यासाठी धन्वंतरी महाल या प्रयोगशाळेची स्थापना केली होती. त्यात त्यांनी शोध लावलेल्या सौंदर्य औषधींची माहिती अनुभोग वैद्य भाग (१८००-१९००) या मराठी ग्रंथात अनुवादित करण्यात आली आहे.

ईजिप्तमध्येही सौंदर्यप्रसाधने व त्यांचा वापर यांच्या सर्वांत आधीच्या नोंदी व पुरावे आढळतात. तेथील पहिल्या थायनाइट वंशाच्या कारकीर्दीमध्ये (इ. स. पू. सु. ३०००) राजांच्या शवांबरोबर (ममीसोबत) सुखसोयीच्या व चैनीच्या वस्तूही पुरण्याची प्रथा होती. त्यांत स्नेहलेपन, सुगंधी तेले, मलम व उटण्यांसारखी द्रव्येही असत. ब्रिटिश म्यूझीयममध्ये चंबूसारखी अनेक नक्षीदार सुंदर पात्रे आहेत. ती सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरीत. त्यांचा काळ इ. स. पू. सु. ३५०० असावा. अठराव्या वंशातील (इ. स. पू. १५००) अशी काचेची कोल (अँटिमनी सल्फाइड) नावाची पात्रेही तेथे आहेत. डोक्याच्या सर्वांत वरच्या भागावर नार्द (जटामांसी) लावलेले लोक एका पपायरसवरील चित्रात आहेत. तूतांखामेन (इ. स. पू. सु. १३३५) यांची कबर हॉवर्ड कार्टर यांना सापडली तेव्हा अनेक वस्तूंचे उत्कृष्ट नमुने प्रकाशात आले. त्यांपैकी काही पात्रातील सुगंधी द्रव्यांचा सुगंध टिकून राहिल्याचे त्या वेळी तेथे हजर असलेल्या लोकांनी सांगितले होते. प्राचीन ईजिप्शियन लोक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करीत असल्याचे पुरेसे पुरावे ईजिप्तमधील इतर स्मारकांत व कबरींमध्ये आढळले आहेत. राजे थुतमोज चवथे (इ. स. पू. सु. १४२०) यांच्या काळातील स्फिंक्सच्या छातीत सरकविलेल्या ग्रॅनाइटाच्या मोठ्या तुकड्यावर सुवासिक तेल व धूप अर्पण करणारे चित्र रेखाटले आहे. त्या काळात यांपैकी बहुतेक संयुगे धर्मगुरू वा पुरोहित तयार करीत असण्याची शक्यता आहे आणि ही संयुगे तयार करणे ही गोपनीय व पुष्कळ आदर करण्यात येणारी कला होती. त्याची पात्रे हस्तिदंताची व ॲलाबॅस्टर यांची बनवीत. पुष्कळदा कोरीव लाकूड, ऑनिक्स व पॉर्फिरी यांची कोरीव पात्रे वापरीत. त्यात आढळणारे सौंदर्यप्रसाधनविषयक घटक नैसर्गिक दृष्ट्या साधे असत आणि त्यांची संख्या व प्रमाण मर्यादित असे. ईजिप्तमध्ये मरवा व थाईम यांचे उत्पादन घेत असत आणि बालानोस हे द्रव्य बनवीत. ते बहुधा कोणत्या तरी अज्ञात फळाच्या कवचापासून काढीत असत. मात्र मूलभूत घटक अधिक प्रमाणात अरबस्तानातून येत असत उदा., हिराबोळ, चंद्रसेनी ऊद (धूप), जटामांसी वगैरे. तिळाचे तेल हे सर्वाधिक वापरले जाणारे सुगंधी द्रव्यांचे माध्यम होते. शिवाय बदामाचे व ऑलिव्ह तेलही वापरीत.

बहुधा स्नानकुंडांचा वापर प्रथम ईजिप्शियनांनी केला असावा. नंतर त्याचा अधिक कल्पकतापूर्वक वापर ग्रीक व रोमन लोकांनी केला. अशा प्रकारच्या स्नानांमध्ये नंतर अधिक प्रमाणात सुगंधी तेले व द्रव्ये वापरली जाऊ लागली. ती समाधानकारक आढळली व त्यांच्यामुळे त्वचा मऊ होऊन अंगकांती एकसारखी होत असल्याचे लक्षात आले. काहीसे कच्चे रंग वापरून ईजिप्शियन महिला आपल्या सौंदर्यात भर घालीत असत. रंग लावण्याची कला क्लीओपात्रा राणीच्या काळात कळसास पोहोचली. यामध्ये डोळ्यांच्या सुशोभनाला सर्वांत जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. असेच काहीसे डोळ्यांचे सुशोभन १९६०-७० या दशकामध्ये करीत असत. त्यासाठी डोळ्यांची खालील बाजू हिरवी रंगवीत आणि लाकडी वा हस्तिदंती काडीने कोल लावून पापणी, पापणीचे केस व भुवया काळ्या रंगवीत. तळपाय, तळहात व नखे यांना मेंदी लावीत. ईजिप्शियन महिलांनी वापरलेले कंगवे आणि झिलईदार धातूचे आरसे ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात चांगल्या स्थितीत जतन केलेले आहेत. बायबल मध्ये ज्यू स्त्रियांनी वापरलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा उल्लेख आहे. कुराणात सुगंधी द्रव्यांचे महत्त्व वर्णिले आहे.

सुरुवातीला रोमन लोकांना आपल्या व्यक्तिगत दिसण्यामध्ये विशेष रस नव्हता. त्यांच्या दक्षिण इटलीमधील आक्रमणानंतर व तो भाग ग्रीकांनी व्यापल्यावर रोमनांना जीवनातील सौंदर्याची जवळून माहिती झाली. रोमन तत्त्वज्ञ प्लॅटस (इ. स. पू. २५४-१८४) याने असे म्हटले आहे की, ङ्ग सौंदर्यप्रसाधनाविना स्त्री म्हणजे मिठाशिवाय अन्न ! ङ्घ इसवी सन ५४ मध्ये नीरो सम्राट झाल्यावर दरबारी राजकारणात सुगंधी द्रव्ये व सौंदर्यप्रसाधने यांना महत्त्व प्राप्त झाले. तो सम्राट सढळपणे सौंदर्यप्रसाधने वापरीत असे, तर सम्राज्ञी (पॉपीआ) कृत्रिम सौंदर्यसाधने उघडपणे वापरीत असे. त्या काळात त्वचा पांढरी व्हावी म्हणून खडू व व्हाइट लेड (लेड कार्बोनेट) वापरीत. तर ईजिप्शियन पापण्या व भुवया रंगविण्यासाठी कोळसा (कोल) वापरीत. फुकुस (एक प्रकारचे रूज) गाल व ओठ रंगविण्यासाठी, तर सिलोट्रम हे एक प्रकारचे केशनाशक म्हणून वापरीत. मुरूम तसेच त्वचेवरील सुजेसाठी सातूचे पीठ व लोणी आणि दात पांढरे शुभ्र करण्यासाठी पमीस या खडकाचे चूर्ण वापरीत. रोमन दरबारातील आधुनिक राहणीमानाच्या स्त्रियांनी केसांचे साबणाने विरंजन करण्यासाठी एक पद्धत तयार केली होती. हा साबण गॉल येथून येत असे. रोमन लोकांनी सुगंधी द्रव्ये व सौंदर्यप्रसाधने यांच्यासाठी अनेक आकर्षक पात्रे तयार केली होती. घनरूप सुगंधी द्रव्ये म्हणजे लेडायस्माटा, द्रवरूप सुगंधी तेले वा द्रव्ये म्हणजे स्टायमाटा आणि चूर्णरूप सुगंधी द्रव्ये म्हणजे डायास्पामाटा हे तीन मुख्य प्रकार होते. घनरूप सुगंधी द्रव्ये सर्वसाधारणपणे एका विशिष्ट सुगंधाचे असे. उदा., बदाम, गुलाब किंवा बिही (क्विन्स) द्रवरूप तेले बहुधा ऑलिव्ह, बेन वा तिळाचे तेल यात पाचन केलेली फुले, मसाले वा डिंक यांची संयुगे असत.

ब्रिटनमध्ये सौंदर्यप्रसाधने फार पूर्वीपासून वापरात आहेत. धर्मयुद्धाच्या काळापासून (१५३३) तेथे पौर्वात्य देशांतून सौंदर्यप्रसाधने येऊ लागली. पहिल्या एलिझाबेथ यांच्या काळात (१५५८-१६०३) सौंदर्यप्रसाधनांची लोकप्रियता वाढत गेली. त्या काळात अंगकांती सुंदर करण्यासाठी प्रथम अतिशय गरम पाण्याने आंघोळ करून जादा घाम येऊन जाऊ देत आणि नंतर विपुल मद्याने चेहरा धुवून काढीत. त्यामुळे चेहरा नितळ व तांबूस होत असे. दुधाने स्नान केल्यास सौंदर्य वाढते असे मानले जाई. सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरावर बंधने घालणारा कायदा १७७० मध्ये करण्यात आला.

फ्रान्स व इटलीतही सौंदर्यप्रसाधने लोकप्रिय होती. स्पेनमधून व्हॅनिला व कोको यांची क्रीमे व बदामाचा लेप तेथे येत असे. त्यामुळे त्वचा गौर होई. पहिला नेपोलियन व सम्राज्ञी जोसेफाइन यांच्या काळात सुगंधी द्रव्ये व सौंदर्यवर्धक द्रव्ये यांचे उत्पादन वैज्ञानिक रीतीने करण्यास सुरुवात झाली.


 यूरोपातूनच सौंदर्यप्रसाधनांचे अमेरिकेत आगमन झाले व तेथील त्यांच्या वापराचा इतिहास समांतर दिशांत प्रगत झाला. तेथील मूळचे रेड इंडियन आदिवासी शरीर रंगविण्यात कुशल होते आणि त्यांना रंग, रंगद्रव्ये, वसा, तेले इत्यादींची चांगली माहिती होती. मात्र यूरोपातून आलेल्या वसाहतवाद्यांवर याचा प्रभाव पडला नाही. तसेच वसाहती निर्माण होण्याच्या काळात अमेरिकेतील निरनिराळ्या भागांतील सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामध्ये चांगलीच तफावत होती.

रोमन साम्राज्याच्या पहिल्या दोन शतकांमध्ये सौंदर्यप्रसाधने व सुगंधी द्रव्ये तयार करण्याच्या कलेत वाढ होत गेली व रोमन साम्राज्याचा ऱ्हास होईपर्यंत ती चालू राहिली. नंतर अरब लोकांनी आसवन करून एथिल अल्कोहॉल वापरून विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये तयार केली. चौदाव्या व पंधराव्या शतकांत फ्रेंच लोकांनी सौंदर्यप्रसाधनांचा सौंदर्यवर्धक आणि औषधी वापर यांत भेद करण्यास सुरुवात केली. एकोणिसावे शतक सुरू होईपर्यंत किमयागार, नापित, केशरचनाकार, दाया व स्वतः सौंदर्यवती महिला आपापल्या आवडीनुसार सौंदर्यप्रसाधने तयार करीत. १८५० पर्यंत ही एक घरगुती कला होती. १९१० च्या सुमारास काही उद्योजकांनी सौंदर्यप्रसाधने वैज्ञानिक रीतीने तयार करून त्यांची गुणवत्ता वाढविली. या उद्योगातील प्रगतीमुळे पहिले महायुद्घ सुरू होण्याच्याआधी चांगल्या गुणवत्तेची व नैसर्गिक रूपातील सौंदर्यप्रसाधने बाजारात उपलब्ध झाली. यामुळे त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर होऊन ती मान्यता पावली व त्यांची मागणी वाढली.

सौंदर्यप्रसाधनांच्या प्रगतीला रसायनशास्त्राची बरीच मदत झाली. वैज्ञानिक पद्धतींचा वापर, अचूक मापनक्रिया, कच्च्या मालासाठीचे विनिर्देशन, अंतिम उत्पादनांचे परीक्षण इत्यादींमुळे सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीला वैज्ञानिक शाखेचे स्वरूप प्राप्त झाले. अशा प्रकारे विज्ञान व तंत्रविद्या यांच्या आधारे सौंदर्यप्रसाधनशास्त्र ही विज्ञानशाखा पुढे आली.

सौंदर्यप्रसाधनांतील घटक पदार्थ : सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी कार्बनी व अकार्बनी द्रव्ये वापरतात. कधीकधी कार्बनी द्रव्यांऐवजी वनस्पतिज व प्राणिज तसेच कृत्रिम रीतीने बनविलेली धातुयुक्त कार्बनी द्रव्ये वापरतात.

नैसर्गिक व संश्लेषित तेले, वसा व मेणे, द्रवरूप, घनरूप व अर्धघन हायड्रोकार्बने, साबण व कृत्रिम पृष्ठक्रियाकारके, विविध स्टार्च, डिंक, रेझिने, रंग व रंगद्रव्ये, अम्ले, अल्कोहॉले, एस्टरे, अल्किल अमाइने व अल्केनॉल अमाइने ही कार्बनी द्रव्ये आणि पाणी, हायड्रोजन पेरॉक्साइड, धातूंची लवणे व ऑक्साइडे, अम्ले, अमोनिया क्षारके (अल्कली) इ. अकार्बनी द्रव्ये सौंदर्यप्रसाधने तयार करताना वापरतात.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये केवळ प्रमाणित केलेले रंग व रंगद्रव्येही वापरतात. त्यामुळे त्यांचा त्वचेवर विपरीत परिणाम होत नाही. पूर्वी लालसर व गुलाबी छटा येण्यासाठी कार्माइन व कार्थामीन हे नैसर्गिक रंग वापरीत. ॲलोक्झॅन हा प्रथम वापरलेला कृत्रिम कार्बनी रंग होय.

ऑकर, सिएन्ना, अल्ट्रामरीन, अंबर यांसारखी कार्बनी व अकार्बनी रंगद्रव्ये कृत्रिम कार्बनी रंगद्रव्ये, डांबरापासून बनविलेली रंगद्रव्ये वगैरे रंगद्रव्ये सौंदर्यप्रसाधनांत वापरतात. खाद्यपदार्थ, औषधे व सौंदर्यप्रसाधने यांमध्ये वापरण्यायोग्य, केवळ औषधे व सौंदर्यप्रसाधने यांत वापरण्या-योग्य आणि फक्त बाहेरून लावण्याच्या औषधांत व सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरण्यायोग्य हे अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाने कायदेशीरपणे ठरविलेले रंग व रंगद्रव्यांचे प्रकार आहेत. रंगछटेची उपयुक्तता वा उचितता, टिकाऊपणा व त्याच्या माध्यमाचे स्वरूप यांनुसार सौंदर्यप्रसाधनात वापरण्याच्या रंगद्रव्याची निवड करतात. अम्लरंजक, क्षाररंजक, तेलात विरघळणारा व पाण्यात विरघळणारा हे माध्यमानुसार होणारे प्रकार आहेत.

वर्गीकरण : सौंदर्यप्रसाधनांचे पुढील तीन प्रमुख वर्ग करतात : (अ) त्वचा व केस यांची निगा राखणारी क्रीमे, धावन द्रव व पायसे (लोशन) (आ) पावडर (चूर्णे), ओष्ठशलाका (लिपस्टिक), रूज व नखांसाठीची लॅकरे (रोगणे) यांसारखी सौंदर्यवर्धक द्रव्ये आणि (इ) दुर्गंधीनाशके, केशनाशक द्रव्ये व स्नानामधील साहाय्यकारी द्रव्ये यांसारखी आरोग्यदायी सौंदर्यप्रसाधने.

सौंदर्यप्रसाधनांचा वापर १९६० सालानंतर अधिक व्यापक झाला. त्याआधी उच्चभ्रू वर्गातील लोकच मुख्यत्वे सौंदर्यप्रसाधने वापरीत. मध्यम व नवश्रीमंत मंडळींची संख्या वाढल्यानंतर सौंदर्यप्रसाधनांचा वापर विशेषतः शहरी भागात सार्वत्रिक होऊ लागला. उदारीकरणाच्या काळात कमी किमतीत उपलब्धतेमुळे ग्रामीण भागांतही हा वापर हळूहळू वाढत आहे. माणसाची आयुर्मर्यादा वाढल्याने त्वचा निरोगी व तरुण दिसण्याची गरज महत्त्वपूर्ण बनली. निगा न ठेवल्यास त्वचेची तकाकी नाहीशी होते, तिच्यातील नैसर्गिक तेले व आर्द्रता नष्ट होते आणि त्वचा कोरडी होते, तिला सुरकुत्या पडतात व वृद्धत्वदर्शक होते. याला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सौंदर्यप्रसाधनाची क्रीमे व धावन द्रव तयार करतात. ती त्वचेला कुशलतेने लावल्यास सौंदर्याचा आभास निर्माण करता येतो.

त्वचा स्वच्छ ठेवणे व तिचे कार्य उचितपणे चालू ठेवणे हा त्वचेची निगा राखण्यातील महत्त्वाचा भाग आहे. वातावरणातील धूळ, धूर, मलीन द्रव्ये व इतर प्रदूषणे सौंदर्यप्रसाधनांमध्ये मिसळत असल्याने विशेषतः नागरी जीवनात त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे अवघड होते. पूर्वीचा साबण हा आवश्यक व कार्यक्षम स्वच्छताकारक असला, तरी त्याच्यामुळे त्वचा शुष्क होई. मात्र आता विविध तेले व द्रव्ये वापरून नितळ त्वचा देणारा साबण उपलब्ध आहे. स्वच्छताकारक क्रीममध्ये मलीन द्रव्ये अधिक सौम्य रीतीने विरघळतात स्नेहनकारक क्रीम त्वचेतून निघून गेलेल्या नैसर्गिक तेलांची भरपाई करते वा त्यांना पूरक कार्य करते आणि आधार (फाउंडेशन) क्रीममुळे त्वचेचे संरक्षण होते.

त्वचा अनुकूल स्थितीत व सतेज ठेवण्यासाठी सौंदर्यप्रसाधने वापरतात. त्वचा निरोगी ठेवणे धूळ, सूक्ष्मजंतू, उष्णता व थंडीवारा यांपासून तिचे संरक्षण करणे सुरकुत्यांमुळे येणारी अकाली प्रौढत्वाची लक्षणे दूर करणे आणि मुरमांमुळे चेहऱ्यावर आलेला खडबडीतपणा घालवून त्वचा मऊ, नितळ, सतेज, टवटवीत व सुंदर करणे यांसाठी सौंदर्यप्रसाधने वापरतात. शारीरिक व्यंग झाकून मूळचे सौंदर्य वाढविणारी, मूळचे सौंदर्यविशेष खुलवून आकर्षक करणारी ही दुसऱ्या प्रकारची सौंदर्यप्रसाधने आहेत.

(अ) क्रीमे : त्वचेवर सर्वाधिक लावण्यात येणारी सौंदर्यप्रसाधने क्रीमच्या रूपात असतात. तेले किंवा वसा एखाद्या द्रवरूप पायसीकारकाच्या साहाय्याने पाण्याबरोबर एकजीव करतात. यामुळे तयार होणारी क्रीमे (पायसे) कमी-अधिक प्रमाणात घनरूप वा द्रवरूप असतात. मार्जनकारी व मृदुकारी क्रीमे बहुधा तेलात पाणी घालून आणि अंत्यरूपण क्रीम पाण्यात तेल अंतर्भूत करून तयार करतात.


मार्जनकारी (क्लीन्‌सर्स) क्रीमे : हे क्रीम मुख्यतः त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरतात. तेलात पाणी घालून असे उत्कृष्ट क्रीम म्हणजे पायस तयार करतात. हे तेलकट असल्याने शरीराच्या तापमानामुळे वितळून त्वचेवर लगेच पसरते. यांतील घटक तेले त्वचेत थोडी जिरतात व त्वचेमधील मळ बाहेर काढण्याइतपत हलकी असतात. या क्रीममधील इतर घटक त्वचेमध्ये टिकून राहतील इतक्या मोठ्या प्रमाणात नसतात. हे क्रीम त्वचेवर चोळून लावतात व नंतर कापसाच्या बोळ्याने पुसून काढतात. यामुळे त्वचेचा घामटपणा व मळ निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते. हे क्रीम चिकट नसते. तसेच त्वचेवरून हे काढून टाकल्यावर त्वचा मऊ व स्वच्छ होते मात्र ती तेलकट वा ओशट राहत नाही. कोल्ड (शीत वा थंड), जलद वितळणारे व द्रवरूप असे याचे तीन प्रकार आहेत.

(१) कोल्ड क्रीम : याला ऐतिहासिक परंपरा आहे. रोमन वैद्यकवेत्ते गेलेन (इ. स. १३१-२०१) यांनी हे क्रीम प्रथम तयार केले. त्यासाठी त्यांनी बदामाचे तेल, मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण व गुलाब पाणी हे घटक वापरले होते. हे पायसरूपातील क्रीम लावल्यावर त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्वचेला गारवा जाणवतो. त्यामुळे याला कोल्ड क्रीम हे नाव पडले. याच्या संघटनात काही औषधिकोशांत अधिकृतपणे सुधारणा करण्यात आली व त्यात वरील घटकांशिवाय स्पर्मेसेटी (जनंगिर-वसा म्हणजे स्पर्म व्हेल तेलातून अलग केलेला पांढरा व स्फटिकी घन पदार्थ) व अल्प प्रमाणात टाकणखार हे साहाय्यक पायसीकारक म्हणून वापरतात. यानंतर खनिज तेल, पॅराफीन इ. घटक यात वापरण्यात आले. सर्वसाधारण व कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीने कोल्ड क्रीम समाधानकारक आहे. कोल्ड क्रीममध्ये एरंड, ऑलिव्ह, तीळ इत्यादींची तेले आणि संश्लेषित वसा व मेणे इ. तैलयुक्त आणि मेणयुक्त द्रव्ये वापरतात. तसेच विविध प्रकारांचे पायसीकारक आणि गुलाब पाण्याऐवजी ऊर्ध्वपातित किंवा निरायनीकृत पाणी वापरतात.

 

(२) जलद वितळणारे क्रीमे : सुरुवातीला हे क्रीम पायस नव्हते तर द्रवरूप व घनरूप हायड्रोकार्बनांचे वितळवून तयार केलेले मिश्रण होते व त्याला मंद सुवास देत असत. ते त्वचेवर लावल्यावर वितळून सर्वत्र पसरते व त्यामुळे त्वचेतील सर्व प्रकारचा मळ काढून टाकणे हा या क्रीमचा मुख्य हेतू असला, तरी या दृष्टीने हे क्रीम विशेष उपयुक्त नाही. यातील खनिज तेल हायड्रोकार्बनांचा दीर्घ काळ वापर झाल्यास त्वचा कोरडी होते. त्यामुळे ज्या व्यक्तीची त्वचा तेलकट होण्याची प्रवृत्ती असते, तिला हे क्रीम उपयुक्त ठरते.

(३) द्रवरूप मार्जनकारी क्रीम : हे बहुधा पाण्यात तेल घालून बनविलेले पायस असते. याला मार्जनकारी क्षीर वा दूध असेही म्हणतात.

मृदुकारी (एमोलियन्ट) क्रीमे : त्वचा मृदू म्हणजे मऊ करण्यासाठी हे वापरतात. ते मुख्यतः रात्री वा विश्रांतीच्या वेळी उपस्नेह (ल्युब्रिकंट) म्हणून वापरतात. वसाभ द्रव्ये मिसळलेले असे क्रीम रात्री झोपण्याच्या वेळी चेहऱ्यावर व मानेवर चांगले चोळून लावतात व रात्रभर राहू देतात. त्यामुळे त्वचेमधील स्निग्धतेची कमतरता भरून निघते. जास्त प्रमाणात स्निग्ध द्रव्ये असलेले हे क्रीम चोळून चोळून मर्दन करून लावतात. चेहऱ्यावर ते खालून वर असे चोळतात. त्यामुळे स्नायूंच्या शिथिलतेमुळे पडलेल्या सुरकुत्यांना व्यायाम होऊन चेहऱ्यावरील त्वचेला भरपूर रक्तपुरवठा होतो व सुरकुत्या कमी होऊ शकतात. या क्रीमच्या मर्दनाने त्यातील स्निग्ध पदार्थांबरोबर लेसिथीन व कोलेस्टेरॉल यांसारखी द्रव्ये त्वचेत शिरतात. यामुळे त्वचेच्या कोशिका (पेशी) पुष्ट होऊन त्वचा ताणली जाते आणि ती टवटवीत, मऊ व नितळ होते.

मृदुकारी क्रीम मार्जनकारी क्रीमपेक्षा दाट असून लॅनोलीन (मेंढीच्या लोकरीतील मेण) वापरल्याने ते पिवळसर व चिकट ओलसर होते. मुळात पूर्णतः दाट असलेले लॅनोलीन त्वचेवर सहजपणे पसरत नाही. म्हणून त्यात भिन्न प्रमाणात वनस्पतिज व खनिज तेले वापरतात. लॅनोलिनामुळे येणारा पिवळसर रंग टाळण्यासाठी त्याऐवजी अक्रिय हायड्रोकार्बने व स्टेरॉले यांची मिश्रणे शोषण-आधार म्हणून वापरतात. या क्रीममध्ये मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण, स्पर्मेसेटी, बदाम बी, एरंडेल, ऑलिव्ह तेल, ग्लिसरॉल, ग्लायकॉल वगैरे घटकही असतात. हे क्रीम सापेक्षतः त्वचेत प्रविष्ट होऊ शकते. जादा लॅनोलीनयुक्त क्रीम कोरड्या त्वचेच्या मार्जनासाठी उपस्नेह म्हणून वापरतात. मात्र लॅनोलीन अल्प असलेले किंवा लॅनोलीन नसलेले क्रीम तेलकट त्वचेसाठी अधिक उपयुक्त आहे.

अंत्यरूपण (फिनिशिंग) क्रीमे : त्वचेचे मार्जन किंवा चेहऱ्याचे मर्दन केल्यानंतर त्वचेचा वा चेहऱ्याचा शृंगार (मेक-अप) करण्यासाठी आधार (फाउंडेशन) म्हणून हे क्रीम वापरतात. याचे दिसेनासे होणारे (व्हॅनिशिंग) व रंगाधार (पिग्मेटेंड फाउंडेशन) क्रीम हे दोन प्रकार आहेत.

(१) दिसेनासे होणारे क्रीम : पाण्यात तेल घालून बनविलेले हे क्रीम पाणी व स्टिअरिक अम्ल यांच्यापासून बनविलेले पायस असते. यातील अल्प प्रमाणातील पायसीकारक बंधक म्हणून वापरतात. थोडे स्टिअरिक अम्ल सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड अथवा ट्रायएथेनॉल अमाइन किंवा ॲमिनो ग्लायकॉल याबरोबर मिसळल्यावर तेथल्या तेथे पायसीकारक तयार होते. स्टिअरिक अम्लाच्या स्फटिकांमुळे हे क्रीम पांढरेशुभ्र व मोत्यासारखे चमकदार होते. त्वचेवर चोळल्यानंतर या क्रीमचा थर पातळ होत जाऊन दिसेनासा होतो, म्हणून याला हे नाव पडले आहे. मात्र प्रत्यक्षात पसरून हे क्रीम त्वचेत नाहीसे न होता त्वचेवर त्याचा मऊ व अगदी पातळ थर तयार होतो. यामुळे त्वचेचा खरखरीतपणा तात्पुरता झाकला जाऊन तिच्या पृष्ठभागाची तकाकी जाते व ती कोरडी दिसते. परिणामी हा पृष्ठभाग चेहऱ्यावर लावावयाची पावडर (चूर्ण) चिकटून राहण्यायोग्य होतो.

जास्त स्निग्ध व तेलकट त्वचेवर पावडर आपोआप चिकटून राहत असल्याने अशा त्वचेसाठी या क्रीमची जरूरी भासत नाही. रुक्ष त्वचेसाठी नाहीसे होणारे साधे क्रीम उपयोगी नसते. यासाठी आधारभूत पायसात परिवर्तनीय पदार्थ मिसळतात. यासाठी स्निग्ध पदार्थयुक्त आधार क्रीम वापरणे योग्य ठरते.

दिसेनासे होणाऱ्या क्रीमचे गुणधर्म बदलण्यासाठी लॅनोलीन, कोको बटर (कोकोच्या बियांतील वसा), संश्लेषित मेणे, खनिज तेल इ.पदार्थ वापरतात तर ग्लिसरॉल आर्द्रताशोषक म्हणून वापरतात. ग्लिसरॉलाचे प्रमाण हा क्रीमच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे. ते पाण्यात सर्व प्रमाणात मिसळत असल्याने चांगले आर्द्रताशोषक आहे व ते त्वचेला हितकारक आहे. मात्र वाजवीपेक्षा जास्त ग्लिसरॉल वापरल्यास त्वचेच्या ऊतकांतील (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकासमूहांतील) पाणी शोषले जाऊन त्वचा रुक्ष होऊन दाहक संवेदना (भगभग) होते. दमट हवेतील आर्द्रताही ग्लिसरॉल शोषते. त्यामुळे चिकटपणा निर्माण होऊन चेहऱ्यावरील क्रीमवर लावलेल्या पावडरवर डाग पडतात. ग्लिसरॉलचे प्रमाण १० टक्क्यांहून कमी असल्यास क्रीम सुकत नाही व कोरडे वाटत नाही. यातील स्टिअरिक अम्ल शुद्घ असणे गरजेचे असते. या क्रीममध्ये परिरक्षक घालणे आवश्यक असते. चांगल्या गुण-वत्तेचे क्रीम त्वचेवर लावल्यानंतर ते पूर्णपणे त्वचेत जिरते. परिणामी तेलकटपणा मुळीच न रहाता त्वचा मऊ व थोडी रुक्ष होते. क्रीममध्ये अल्पसे अल्कोहॉल घातल्यास थोडासा गारवा जाणवतो परंतु ते जास्त घातल्यास पायस बिघडते.

(२) रंगाधार क्रीम : हे दाट (हेव्ही) क्रीमचे परिवर्तित रूप आहे. दिसेनासे होणाऱ्या क्रीमलाच रंगाधार क्रीम म्हणतात, मात्र रंगाधार क्रीममध्ये उचित छटेची पावडर अल्प प्रमाणात मिसळतात. त्यामुळे क्रीम अपारदर्शक होते. रंगभूमीवरील सजवणूक करण्यासाठी हे वापरतात. काही रंगाधार क्रीमे चेहऱ्यावर चोळून लावता येण्यासारखी असतात. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर पावडरचा पातळसा थर चिकटून राहतो. म्हणजे पावडरला हे क्रीम आधारभूत ठरते. अशी काही क्रीमे घट्ट केलेल्या वडीच्या (केकच्या) व रबडीच्या (पेस्टच्या) रूपांत असतात. ती क्रीमे पाण्यात मिसळून स्पंजच्या साहाय्याने त्वचेवर लावून तशीच सुकू देतात. टिटॅनियम डाय-ऑक्साइडामध्ये लावलेल्या जागी पसरण्याची व झाकण्याची (आच्छादण्याची) क्षमता असते. त्यामुळे ते पावडरच्या रूपात थोडे वापरले तरी चालते. योग्य प्रकारे मिश्रण केलेली अशी क्रीमे सर्व प्रकारच्या त्वचांवर वापरता येतात. मात्र तेलकट होण्याची प्रवृत्ती असलेल्या त्वचेसाठी ती विशेष उपयोगी आहेत. कारण त्यामुळे त्वचा तुकतुकीत व तजेलदार होऊन त्वचेवरील सहजपणे लक्षात येणारी छिद्रे इ. दोष झाकता येतात. रंगाधार क्रीमसारखे असणारे पावडर क्रीम घट्ट असते. कारण त्यात निरनिराळ्या रंगछटांच्या पावडरी व जास्त प्रमाणात ग्लिसरीन घातलेले असते.


 खास क्रीमे : काळसर, सुरकुतलेली वा राठ, खरखरीत यांसारखे त्वचा दोष दूर करण्यासाठी ही क्रीमे वापरतात आणि त्यासाठी त्यांच्यात विशिष्ट प्रकारे सुधारणा वा परिवर्तन केलेले असते.

(१) स्तंभक (ॲस्ट्रिंजंट) क्रीम : सामान्यपणे चेहऱ्यावरील संस्करणासाठी आणि विशेषतः तेलकट त्वचेच्या मर्दनासाठी वा रात्री लावण्यासाठी हे क्रीम वापरतात. चांगले मृदुकारी क्रीम स्तंभक क्रीमसाठी आधार म्हणून वापरतात. तुरटी, झिंक सल्फेट, झिंक फेनोसल्फोनेट या घटकांमुळे क्रीम स्तंभक (आवळणारे) बनते. स्तंभक क्रीमचे कार्य कसे होते यासंबंधीच्या यंत्रणेचे स्वरूप पूर्णपणे लक्षात आलेले नाही. त्वचेवरील छिद्रांचे नैसर्गिक आकारमान कमी करता येणे शक्य नाही. तथापि, स्तंभक क्रीम वापरल्यानंतर त्वचेवरील छिद्रांचे वेज कमी झाल्यासारखे वाटते, असा समज आहे. कारण छिद्रांभोवतीची ऊतके काहीशी सुजल्याने छिद्राचे आकुंचन होऊन ते बारीक झाल्यासारखे वाटते. स्तंभक धावन द्रव वापरल्यावर स्तंभक क्रीम याला पूरक म्हणून लावतात.

(२) शुभ्रक (विरंजक) क्रीमे : शुभ्रक क्रीममध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचेचा रंग उजळतो किंवा त्यांच्यामुळे त्वचेवर अपारदर्शक गौरवर्णी पटलाचे आवरण तयार होते. तेलात पाणी घालून या क्रीमचे पायस तयार करतात. या क्रीमचा आधार म्हणून मृदुकारी क्रीम उपयुक्त ठरू शकते. तीव्रतर शुभ्रक घटक म्हणून यात विशेषतः अमोनियाकृत मर्क्युरी क्लोराइड यासारखी पाऱ्याची संयुगे वापरतात. मृदुतर शुभ्रक घटक म्हणून हायड्रोजन पेरॉक्साइड, मॅग्नेशियम किंवा झिंक पेरॉक्साइड, विरल सायट्रिक, ॲसिटिक किंवा लॅक्टिक अम्ल ही संयुगे वापरतात. शुभ्रक क्रीमचा परिणाम अगदी सावकाशपणे होतो. याला पूरक म्हणून शुभ्रक धावन द्रव वापरतात. गौरवर्णकारी (व्हाइटनिंग) क्रीममध्ये टिटॅनियम डाय-ऑक्साइड, झिंक ऑक्साइड व कधीकधी बिस्मथ सबनायट्रेट वापरतात. यामुळे चेहऱ्यावर गौरवर्ण छटा पसरते. पेरॉक्साइड वापरल्यानंतर त्यातील ऑक्सिजन चटकन निघून जाऊ नये म्हणून फेनॅसिटीन हे संयुग वापरतात.

(३) मुरूम-क्रीम : चेहऱ्यावरील मुरमाच्या पुटकुळ्या व इतर दोष दूर करण्यासाठी हे औषधी क्रीम आहे. मृदुकारी क्रीम याचे आधार क्रीम असून मुरूम-क्रीम चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचेला कोणताही अपाय न होता सहजपणे पसरावे म्हणून ते अतिमृदुकारी असणे चांगले असते.मुरूम-क्रीमचे संघटन त्वचाविज्ञानाच्या सखोल माहितीवर आधारलेले असते. मुरमांवरील उपचारासाठी यात बेंझॉइन, बीटा-नॅप्थॉल, कापूर, बोरिक वा सॅलिसिलिक अम्ल, फिनॉल, गंधक, झिंक कार्बोनेट, कॅलॅमीन आणि झिंक ऑक्साइड यांपैकी एक वा अनेक द्रव्ये घालतात.

 

परिरक्षक क्रीमे : मोठ्या कारखान्यांमध्ये काम करताना हात घाण होऊ नयेत म्हणून हे क्रीम वापरतात. म्हणून याला व्यावसायिक वा औद्योगिक क्रीम असेही म्हणतात. हे हातांवर सहजपणे पसरू शकते व त्वचेवरील छिद्रांत प्रवेश करू शकते. याचा त्वचेवर पातळ तैलयुक्त थर बनतो व त्यामुळे रासायनिक पदार्थ त्वचेच्या संपर्कात आले तरी त्यांचा त्वचेवर परिणाम होत नाही. यामुळे त्वचेचे निर्जलीकरण होऊ नये व साबणाने धुतल्यावर हे चटकन निघून जावे, याची काळजी घेतात.

वसा व तेले यांचे मिश्रण, भौतिक प्रतिबंधकयुक्त जेली, पायस व साबणक्षारक हे परिरक्षक क्रीमचे प्रकार आहेत. वसा व मेणे यांचे जल-युक्त पायस हे यातील सर्वोत्कृष्ट मानतात. त्यात ट्रायएथेनॉल अमाइन मिसळलेले असून मॅग्नेशियम स्टिअरेट किंवा संगजिरे (टाल्कम) हे भौतिक व रासायनिक प्रतिबंधक म्हणून असते.

द्रवरूप क्रीमे : वरीलपैकी सर्व क्रीमे द्रवरूपात तयार करता येतात. अशा क्रीममध्ये २० टक्क्यांपर्यंत पाणी असू शकते. हस्तप्रक्षालक धावन द्रव (लिक्विड हँड वॉश) हा याचा अतिशय लोकप्रिय उपयोग असून यांपैकी मध-बदाम (हनी-आल्मंड) क्रीम हा प्रकार दीर्घकाळापासून वापरला जात आहे.

(१) धावन द्रव : (लोशन). धुणे या अर्थाच्या लोटम या लॅटिन शब्दावरून लोशन हा शब्द आला आहे. धावन द्रव हे जलीय किंवा अल्कोहॉली जलीय विद्राव असून त्वचेवर विशेष परिणाम घडवून आणण्यासाठी ते तयार करतात. द्रवरूप क्रीमे, केसांची वळणे कायम टिकविणारे विद्राव व केसांना वळण देणारे द्रव यांनाही धावन द्रव म्हणतात. नितळ विद्राव, अविद्राव्य (न विरघळणारे) पदार्थयुक्त व तळाशी अवक्षेप (साका) निर्माण करणारे विद्राव आणि वसांचे स्थायी निलंबन किंवा विसरण होणारे विद्राव हे धावन द्रवांचे तीन प्रकार आहेत. धावन द्रव रंगछटा व सुगंध दिलेले असतात. वापरावयाच्या उद्दिष्टांनुसार क्रीमप्रमाणेच धावन द्रवांचे स्तंभक, शुभ्रक, मार्जनकारी, मृदुकारी, औषधी व उत्साहवर्धक (श्रमहारक) हे प्रकार आहेत. शिवाय डोळ्यांसाठी व दाढी केल्यावर लावण्यासाठी असलेले धावन द्रवांचे प्रकारही आहेत.

(२) स्तंभक धावन द्रव : हे द्रव साधारणपणे तेलकट त्वचेवरील सहजपणे दिसणाऱ्या छिद्रांवरील उपचारासाठी वापरतात. तेलकटपणा लगेच निघून जाण्यासाठी यामध्ये ५०% एथिल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहॉल असते. अल्कोहॉलाचे प्रमाण कमी करून विशेषतः ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व जस्त यांची लवणे योग्य प्रमाणात घातल्यास धावन द्रव संयुगेही वापरतात.

(३) शुभ्रक धावन द्रव : यांच्या गुणधर्मांविषयी खात्री नसते, कारण त्वचेतील रंगनिर्मिती प्रक्रिया बाह्य त्वचेखाली चालू असते. तेथपर्यंत पोहोचून रंग बदलण्याइतपत तीव्र शुभ्रक द्रव्य बाह्य त्वचेला हानिकारक ठरते. हायड्रोजन पेरॉक्साइड वापरून त्वचा व केस यांमधील मेलॅनीनचा (कृष्ण रंजकाचा) रंग फिकट करता येतो. याशिवाय ॲसिटिक, सायट्रिक, लॅक्टिक व टार्टारिक यांसारखी सौम्य अम्ले पाण्यात मिसळून दहा टक्क्यांपर्यंत ग्लिसरॉल असलेला किंवा ग्लिसरॉल नसलेला धावन द्रव तयार करता येतो. कधीकधी यामध्ये गरजेनुसार पोटॅशियम क्लोरेट, सोडियम परबोरेट व इतर ऑक्सिडीकारक रसायने घालतात.

(४) मार्जनकारी धावन द्रव : त्वचा स्वच्छ करणाऱ्या मार्जनकारी क्रीमला पूरक म्हणून त्वचा त्वरित स्वच्छ करण्यासाठी किंवा साबणापेक्षा अधिक प्रमाणात त्वचा स्वच्छ करण्यासाठी हे द्रव वापरतात. यांचे विविध प्रकार आहेत. रुक्ष त्वचा स्वच्छ करणाऱ्या धावन द्रवात अल्कोहॉल व खनिज तेल कमी प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे क्षारकीय लवणे वा संश्लेषित ⇨ पृष्ठक्रियाकारके त्यांत अत्यल्प प्रमाणात असतात. कारण त्यांच्यामुळे त्वचा रुक्ष होण्याची प्रवृत्ती वाढते. अशा धावन द्रवांत टाकणखार, ट्रायएथेनॉल अमाइन (१%), ग्लिसरॉल (५-१०%), एथिल व आयसोप्रॉपिल अल्कोहॉले (५-१०%, तेलकट त्वचेसाठी ५० टक्क्यांपर्यंत अल्कोहॉल), तसेच संश्लेषित प्रक्षालके, बोरिक व सॅलिसिलिक यांसारखी सौम्य अम्ले, ॲसिटोन, कापूर इ. द्रव्ये असतात.

(५) उत्साहवर्धक धावन द्रव : त्वचा सौम्यपणे उद्दीपित करण्यासाठी आणि सजवणूक करण्याआधी क्रीमे पूर्णपणे काढून टाकण्यासाठी हे द्रव वापरतात, यात अल्कोहॉल असतेच असे नाही. गुलाब पाणी किंवा संत्र्यांच्या फुलांचे पाणी या द्रवासाठी आधार म्हणून वापरतात. यात बहुधा परिरक्षक द्रव्ये घालतात. शीतलता मिळण्यासाठी अत्यल्प मेंथॉल वापरतात. ग्लिसरॉल आर्द्रताशोषक म्हणून यात घालतात. यांशिवाय तुरटी, कापूर, सौम्य कार्बनी अम्ले इत्यादींचाही यात अंतर्भाव करतात.

(६) औषधी धावन द्रव : किरकोळ जखमांच्या वेदनेचा उपचार करण्यासाठी हा द्रव वापरतात. यामध्ये अल्कोहॉल, फिनॉल, हेक्झिल रिसॉर्सिनॉल यांचा पूतिरोधक म्हणून वापर करतात. शिवाय यात कापूर, गंधक, रिसॉर्सिनॉल आणि जस्ताची फेनोसल्फोनेट, कार्बोनेट, सल्फेट व ऑक्साइड ही द्रव्येही असू शकतात.

(७) त्वचेचे शक्तिवर्धक (टॉनिक) : या धावन द्रवामुळे ताजेतवाने व थंड वाटते त्वचेवरील ओशटपणा जाऊन ती मऊ व गुळगुळीत होते आणि तिला थोडी अम्लता येऊन ती पूतिरोधक बनते. अल्कोहॉल, ग्लिसरीन तसेच बोरिक व लॅक्टिक यांसारखी सौम्य अम्ले असलेला धावन द्रव लावल्याने त्वचा पावडर किंवा सजवणुकीची प्रसाधने वापरण्यास योग्य होते.

(८) सौंदर्य क्षीर (ब्यूटी मिल्क) : पाण्यात तेल टाकून बनविलेल्या या पायसात मृदुपणा आणणारे बदामाचे व इतर वनस्पतिज तेले असतात. तसेच त्यात लॅनोलीन, कोकोबटर, स्पर्मेसेटी इ. द्रव्ये पायस साहाय्यक म्हणून वापरतात. यात ग्लिसरीन, कोलेस्टेरीन, लेसिथीन ही द्रव्ये आणि पॅराहायड्रॉक्सी बेंझॉइक अम्ल व एस्टर यांसारखी प्रतिरक्षक द्रव्ये घालतात.


 (९) दाढीचे धावन द्रव : दाढी करण्याआधी व दाढी केल्यानंतर हे द्रव चेहऱ्याला लावतात. दाढीचे केस मऊ करण्यासाठी याचा एक प्रकार वापरतात. यामध्ये पाणी व ग्लिसरॉल यांच्यात क्रियाशील घटक व आर्द्रताकारक द्रव्ये घालतात. हे द्रव सुगंधी व रंगीत असते. विद्युत् चलित वस्तरा वापरण्यापूर्वी लावावयाचा धावन द्रव स्तंभक स्वरूपाचा असून त्याच्यामुळे त्वचा आकसली जाऊन केस अधिक ताठ उभे राहतात.

दाढी केल्यानंतर वापरावयाचे धावन द्रव स्तंभक धावन द्रवासारखेच असते. मात्र त्यात अल्कोहॉलाचे प्रमाण अधिक असते. यामुळे त्वचेला थंडावा येतो व दाह कमी होतो. अल्कोहॉल पूतिरोधकही ठरते. यात प्रतिरक्षक द्रव्ये घालणे आवश्यक असते.

(१०) नेत्र धावन द्रव : याच्यामुळे डोळे स्वच्छ व तेजस्वी होऊन त्यांना थंडावा मिळतो. मिश्रणाच्या रूपातील हा द्रव अशा रीतीने तयार करतात की, त्याचे ⇨ पीएच मूल्य व तर्षण दाब [ ⟶  तर्षण] ही नैसर्गिक अश्रुद्रवाशी जुळणारी असतात. वनौषधींच्या अर्कामध्ये बोरिक अम्ल, अमोनियम, पोटॅशियम किंवा सोडियम क्लोराइड, सोडियम बोरेट किंवा सॅलिसिलेट, जस्ताची लवणे व योग्य रसायने यांचे मिश्रण करून हे द्रव तयार करतात. यात नैसर्गिक कार्बनी द्रव्ये घातली असल्यास त्यात प्रतिरक्षक द्रव्ये घालणे गरजेचे असते. जुन्या भारतीय ग्रंथांत नेत्र धावन द्रव तयार करण्याच्या कृती दिलेल्या आढळतात.

(११) हस्त धावन द्रव : याचे दोन मुख्य प्रकार आहेत. स्नेहांश असलेला (किंवा मलईयुक्त) द्रायू (द्रव वा वायू) प्रकार मध व बदाम यांच्यापासून तयार करतात. पातळ श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्ययुक्त प्रकारामुळे हात, हाताचे तळवे व पाय यांच्या त्वचेला थंड हवेत संरक्षण मिळते. साबण व पाणी सतत वापरल्यामुळे होणाऱ्या हानिकारक त्रासाला हा द्रव लावल्याने प्रतिबंध होतो. याचे प्राचीन उदाहरण म्हणजे गुलाब पाणी व ग्लिसरॉल यांचे मिश्रण होय आणि हे अजूनही वापरतात. हस्त धावन द्रवात बेंझॉइक अम्ल व एस्टर ही संरक्षक द्रव्ये अवश्य वापरतात. दुधी काचेसारखे पारभासी, जिलेटिनी (सरस सदृश्य) किंवा श्लेष्मल हस्त धावन द्रवांमध्ये एक वा अनेक डिंक (उदा., बाभळीचा, ट्रॅगाकांथ, कोंड्रस, कराया), अल्कोहॉल, ग्लिसरॉल, ग्लायकॉल, बोरिक अम्ल, कापूर, बेंझॉइन ही द्रव्ये निरनिराळ्या प्रमाणांत वापरतात. हे द्रव दाट होण्यासाठी त्यांच्यात स्टार्च, आगर, पेक्टिन, मार्शमालोकट, सिलियम यांचे अर्क घनीभवनकारक (घट्ट किंवा दाट) करणारे म्हणून वापरतात.

 

(आ) सजवणूक (रंगभूषा) प्रसाधने : (मेक-अप प्रसाधने). ही संज्ञा प्रामुख्याने रंगभूमीवरील पात्रांच्या संदर्भात वापरतात. तथापि, चेहऱ्याला रंगछटा व रेखीवपणा आणणारी प्रसाधने यांत येतात. चेहऱ्याला लावावयाची पावडर, गाल व ओठ यांना लालिमा आणणारे रूज (तांबडे चूर्ण), डोळ्याभोवती लावावयाचे रंग इ. प्रसाधने यात येतात.

चेहऱ्याची (फेस) पावडर : पूर्वी चेहरा तेजस्वी व चमकदार (तुकतुकीत) दिसण्यासाठी कांतिद्रव्ये वापरीत. तथापि, नंतर चेहरा तुकतुकीत, नाक चमकदार व त्वचा तेलकट दिसू नये म्हणजे चेहरा नितळ व टवटवीत दिसावा म्हणून चेहऱ्यावर पावडर लावण्यात येऊ लागली. शिवाय पावडर लावल्याने त्वचेचा खरबरीतपणा व बारीकसारीक दोष झाकता येतात. सर्व त्वचांना शोभून दिसणारी एकच पावडर तयार करणे शक्य नाही. सर्वसाधारणपणे अपेक्षित योग्य परिणाम साधण्यासाठी कोरड्या त्वचेसाठी हलकी वा विरळ तर तेलकट त्वचेसाठी दाट वा गडद पावडर वापरतात. पावडरच्या आच्छादने निर्माण करण्याच्या क्षमतेला उद्देशून हलकी वा दाट या संज्ञा वापरतात. घटक द्रव्यांच्या वजनाशी याचा संबंध नाही. अपारदर्शकत्व किंवा आच्छादन करण्याची क्षमता, त्वचेवर सहजपणे पसरण्याची क्षमता, टिकून (वा चिकटून) राहण्याचा किंवा परिणाम कायम ठेवण्याचा गुण (संलग्नता), कणांचे आकारमान म्हणजे सूक्ष्मता या गुणधर्मांच्या आधारे पावडरचे मिश्रण व परीक्षण करतात. मिसळून जाण्याची क्षमता, स्थूलता किंवा मऊपणा हे पावडरचे महत्त्वाचे भौतिक गुणधर्म असून सौंदर्यात्मक दृष्टीने तिचा रंग, तजेला वा टवटवी व सुगंध हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. या गुणधर्मांना अनुसरून तिच्यातील घटक ठरतात. उदा., टिटॅनियम डाय-ऑक्साइड, कलिली मृत्तिका वा चिकण माती, झिंक ऑक्साइड व मॅग्नेशियम ऑक्साइड ही द्रव्ये पावडरच्या अपारदर्शकतेसाठी वापरतात. धातुयुक्त साबणासारखे लवण, संगजिरे (टाल्कम) यांमुळे पावडर सहज पसरते. कॅल्शियम, मॅग्नेशियम वा झिंक स्टिअरेट, चिकण माती या घटकांमुळे पावडर त्वचेवर टिकून रहाते. कॅल्शियम व मॅग्नेशियम कार्बोनेट, अवक्षेपित खडू (चॉक) आणि शुद्ध केओलीन या घटकांमुळे पावडर त्वचेत मिसळून जाणारी बनते.

संगजिरे हा फेस पावडरमधील विशेष महत्त्वाचा घटक असून एकूण मिश्रणात त्याचे प्रमाण ५०-८० टक्क्यांपर्यंत असते. म्हणून तिला टाल्कम पावडर म्हणतात. संगजिऱ्यामुळे पावडर गुळगुळीत होते व ती सहज पसरते. कधीकधी तांदूळ वा मक्यातील स्टार्च पावडरमध्ये घालतात.

विक्रीच्या दृष्टीने फेस पावडरचा सुगंध महत्त्वाचा असतो. साधारणपणे हा सुगंध मंद असून त्याच्यामुळे अकार्बनी घटकांचे मूळचे गंध लोपून जातात. प्रथम संगजिरे पूड सुगंधित करतात. तसेच पुरेशा प्रमाणातील अवक्षेपित खडूच्या पुडीत (चूर्णात) सुगंधी तेलांचे तयार मिश्रण मिसळून दाट रबडी (पेस्ट) बनवितात. संगजिऱ्याच्या चूर्णात ही रबडी मिसळतात. नंतर उर्वरित घटक मिसळून सर्व मिश्रण चांगले हलवितात व चाळतात. त्यामुळे सुगंध सर्वत्र पसरतो. त्यानंतर हे मिश्रण किमान एक आठवडा न हलविता तसेच ठेवतात. सर्वसाधारणपणे मिश्रणात सु. एक टक्का सुगंधी द्रव्य मिसळतात.

सर्वसाधारण घटक मिसळून बनलेले पावडरचे मिश्रण मुळात पांढरे शुभ्र असते. कारण तिच्यातील घटक शुद्ध असतात. शुभ्र पावडरमुळे चेहऱ्यावर फिकट पांढरटपणा निर्माण होतो. तो टाळण्यासाठी प्रथम दोन प्रकारच्या गुलाबी छटा असलेल्या पावडरी बनविल्यानंतर मुख्यत्वे पिवळसर, बदामी व गुलाबी छटांच्या पावडरी तयार झाल्या. त्यांना अनेक वर्णनात्मक व काल्पनिक नावे दिलेली आहेत.

विविध प्रकारची अविद्राव्य लाख व रंगद्रव्ये वापरून पावडरला रंगछटा देतात. गेरू, सिएन्ना (लिमोनाइट खनिजातील पिवळसर-तपकिरी मातकट द्रव्ये), अंबर या नैसर्गिक मृदांमुळे पावडरीला पिवळसर, पिंगट किंवा काळसर पिवळट छटा प्राप्त होतात. तर गुलाबी छटा येण्यासाठी लाखेचे गुलाबी, नारिंगी व लाल प्रकार वापरतात. अशा चूर्णरूप फेस पावडरशिवाय तिचे कोरड्या वड्या, क्रीम, रबडी व द्रवरूप इ. प्रकारही आहेत.

(१) कोरडी वडी : (घट्ट पावडर). कोणत्याही फेस पावडरचे चांगले मिश्रण यासाठी वापरतात. यात संगजिरे ५० टक्क्यांहून कमी असल्याने मिश्रण कमी ठिसूळ होते. निर्द्रव किंवा सद्रव संपीडन (दाबण्याची क्रिया) करून अथवा साच्यामध्ये घालून पावडरच्या वड्या तयार करतात. अतिसूक्ष्मकणी पावडरीवर योग्य प्रकारे दाब देणे शक्य होत नाही. त्यामुळे मूळ मिश्रणात बंधक म्हणून श्लेष्मल वा जिलेटिनी पदार्थ घालून मिश्रणाची पातळ रबडी तयार करतात आणि कणमय रूपात ती सुकवितात. पावडरमधील घटक अपघटनप्रवण असल्याने मिश्रणात परिरक्षक द्रव्य घालणे गरजेचे असते.

(२) क्रीम पावडर : दिसेनासे होणारे क्रीम सु. ७०% आणि चांगल्या दर्जाची फेस पावडर सु. ३०% घेऊन त्यांचे समांगी किंवा एकजीव मिश्रण म्हणजे क्रीम पावडर होय. क्रीम पावडर तयार करण्याची ही सर्वांत सोपी पद्धत असून तिच्यात हे एकजीव मिश्रण तयार करण्यासाठी समांगीकारक यंत्राचा वापर करतात. त्याचप्रमाणे क्रीमच्या घटक द्रव्यांमध्ये २०% संगजिरे, ५% टिटॅनियम डाय-ऑक्साइड व रंग विशेषतः लाखेचा रंग मिसळून ही क्रीम पावडर तयार करता येते.

(३) सजवणूक वडी : (मेक-अप केक). पूर्वी रबडीच्या रूपातील पावडर पाण्यात मिसळून लावीत. नंतर ग्लिसरॉल, ग्लायकॉल, सॉर्बिटॉल, लॅनोलीन व वनस्पतिज तेले यांचे अधिक स्निग्ध मिश्रण करतात व त्यात पृष्ठक्रियाकारक घालतात. चेहऱ्यावर लावलेले हे मिश्रण लवकर सुकते व त्याचा मऊ थर तयार होतो. रूज या थराबरोबर चांगले मिसळते. यावर फेस पावडरचा थर दिल्यास हे सर्व दिवसभर चांगले टिकून राहते. साबण व पाणी वापरून मेक-अप काढून टाकता येतो.

(४) द्रवरूप पावडर : कृत्रिम प्रकाशात त्वचा अधिक खुलून दिसण्यासाठी हिचा उपयोग करतात. चिकण माती, ग्लिसरॉलामध्ये मिसळलेली रंगद्रव्ये तसेच लवकर वाळण्यासाठी अल्कोहॉल, गुलाब पाणी किंवा संत्र्यांच्या फुलांचा पाण्यातील अर्क हे द्रवरूप पावडरमधील घटक आहेत. सजवणूक वडी उपलब्ध झाल्यावर द्रवरूप पावडरचा वापर कमी झाला.


 (५) प्रसाधन पायमोजे : युद्ध काळात पायमोज्यांसारख्या होजिअरी वस्तू दुर्लभ व महाग झाल्या, तेव्हा अशा प्रसाधनांची सुरुवात झाली. पायांच्या त्वचेवर हा रंग लावून पायमोजे घातल्याचा आभास निर्माण करतात, म्हणून होजिअरीचे रंग प्रसाधन पायमोज्यांसाठी वापरतात. हा रंग सुलभपणे लावता येतो तो कपड्यांना वा फर्निचरला लागणारा नसतो आणि तो लावल्यावर विशिष्ट वाजवी काळापर्यंत तसाच टिकून राहणारा असतो.

पाण्यातील कोरड्या द्रव्यांचे विसरण, चिकण माती, अवक्षेपित खडू, अपारदर्शक पांढरे रंगद्रव्य, संगजिरे, अल्कोहॉल, ग्लिसरॉल इ. या प्रसाधनाचे घटक असतात. सुलभपणे लावता येण्यासाठी यात आर्द्रतादायक पदार्थ, तसेच रंगरोगण आणि योग्य छटेची रंगद्रव्ये व रंजक घालतात. प्रसाधन पायमोजे क्रीम वा कांड्या या रूपांतही असतात. याच्या कांड्या मेणात रंगद्रव्ये मिसळून तयार करतात. मेणामुळे त्या जलरोधी होतात.

रूज : (लाल रंग). सुरुवातीला गाल व ओठ यांना लाली आणणाऱ्या सर्व प्रसाधनांसाठी रूज संज्ञा वापरीत. नंतर ही गालांना लावावयाच्या रंगांपुरतीच मर्यादित झाली. क्रीम, रबडी, घट्ट पावडर व द्रव या रूपांत रूज मिळते.

(१) क्रीम रूज : हे रुक्ष त्वचेवर चांगले चोळता येते व व्यवस्थित पसरते. त्वचा नैसर्गिक वाटण्यासाठी रूजवर हलकी पावडर लावतात. कोल्ड, मृदुकारी किंवा दिसेनासे होणारे क्रीम, यांपैकी एखाद्या पायसामध्ये रंगद्रव्य मिसळून क्रीम रूज तयार करतात. यातील घटकांची निवड करताना यामध्ये टिकाऊपणा चिरस्थायी होणे, सुलभतेने लावता येणे, सुंदर, डौलदार व प्रमाणबद्ध आकार देता येणे तसेच हवामानातील बदलांचा परिणाम न होणे हे गुणधर्म येतील याची काळजी घेतात.

शुभ्र खनिज तेल, अतिपरिष्कृत रंगहीन (शुभ्र) हायड्रोकार्बन तेल, मधमाश्यांचे शुभ्र मेण, स्पर्मेसेटी, स्टिअरिक अम्ल, कोकोबटर ही तेलकट द्रव्ये, पायसीकारक (उदा., टाकणखार किंवा ट्रायएथेनॉल अमाइन), आर्द्रताशोषक (ग्लिसरॉल वा ग्लायकॉल) हे क्रीम रूजमधील घटक असतात. अविद्राव्य लाख व कधीकधी तेलात विरघळणारी रंजके क्रीम रूजमध्ये अधिक प्रमाणात वापरली जातात.

(२) रबडी रूज : निरनिराळ्या वसा व मेणे यांत योग्य रंग व सुगंध घालून रबडी रूज तयार करतात, त्यात पाणी नसते. त्वचेवर सुलभतेने पसरणे, कमी द्रवांक व टिकून राहणे हे याचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. यात परिरक्षक द्रव्ये असतात.

 (३) पावडर रूज : तेलकट त्वचेवर व सजवणूक नीटनेटकी करण्यासाठी हे वापरतात. ८० टक्क्यांपर्यंत संगजिरे, स्टार्च, डिंक व स्टिअरीन यांसारखी बंधक द्रव्ये तसेच झिंक ऑक्साइड व स्टिअरेट, केओलीन, अवक्षेपित खडू, टिटॅनियम डाय-ऑक्साइड हे पावडर रूजमधील घटक असतात.

(४) द्रवरूप रूज : योग्य प्रकारचे व मान्यताप्राप्त पाण्यात विरघळणारे रंग, अल्कोहॉल व ग्लिसरॉल यांचा हा सौम्य विद्राव असतो. इओसीन (लाल रंग) योग्य प्रमाणात घातल्यास याचा चांगला परिणाम साध्य होतो. अल्प आर्द्रतादायक द्रव्य मिसळल्यास रंग पसरण्यास मदत होते. ॲलोक्झॅन हा पांढरा घटक त्वचेवर चोळल्यानंतर लाल होतो. त्यामुळे तो घातलेले द्रवरूप रूज वैशिष्ट्यपूर्ण समजले जाते. द्रवरूप रूज कधीकधीच वापरतात.

लिपस्टिक : (ओष्ठशलाका). लिपस्टिक विविध रंगछटांमध्ये उपलब्ध असून त्यांचे फिकट, झगझगीत वा चमकदार, मध्यम व गडद असे मुख्य गट करतात. ओठांच्या कडांच्या नैसर्गिक लाल छटेत सहजपणे मिसळणाऱ्या छटेची लिपस्टिक उत्तम परिणाम साधणारी असते. ही रंगछटा टवटवीत लाल, नारिंगी लाल किंवा जांभळट लाल असते. या रंगछटांसाठी लाखेचे विविध प्रकार व तिच्यात पक्केपणाचा म्हणजे सहज पुसली न जाण्याच्या गुणधर्म येण्यासाठी इओसीन हे अनुस्फुरक लाल रंजक वापरतात.

हातात नारिंगी व ओठांवर निळसर लाल दिसणारी म्हणजे रंग बदलणारी लिपस्टिक हा लिपरूजचा नाविन्यपूर्ण प्रकार आहे. अशा लिपस्टिकमध्ये इओसीनचे प्रमाण जास्त व लाखेच्या रंजक द्रव्याचे प्रमाण कमी असते. अपेक्षित रंगछटा व चमकदारपणा आणण्यासाठी लिपस्टिकमध्ये अल्प प्रमाणात झिंक ऑक्साइड अथवा टिटॅनियम डाय-ऑक्साइड घालतात. आता विविध रंगांमध्ये लिपस्टिक उपलब्ध आहेत.

चांगल्या लिपस्टिकमध्ये पुढील गुणधर्म असतात. शारीरिक तापमानापेक्षा अधिक तापमानाला ती वितळते. ओठांवर ती सुलभतेने पसरते. तिचा रंग ओठांवर सर्वत्र एकसारखा दिसतो. ओठांवर दाबून लावण्याएवढी ती टणक असते. तिची रंगछटा आकर्षक व टिकाऊ असते. तिचा रंग हवेने, उन्हाने किंवा ओलाव्याने पसरणार नाही किंवा बदलणार नाही अशा रीतीने तिची सांद्रता (दाटपणा) ठरविलेली असते. तिला पाणी सुटत नाही. तिचे तुकडे वा गोळी होत नाही. तसेच तिचा आकार बदलत नाही. तिचा सुवास व स्वाद आल्हाददायक असतो. ओठांनी स्पर्श केलेल्या जागी तिच्या रंगाचा छाप उमटत नाही. अल्कोहॉलात विरघळणारी रंजके व योग्य प्लॅस्टिकीकारक यांची सूक्ष्मकणी, श्यान (दाट) विद्राव म्हणजे द्रवरूप लिपस्टिक होय. अल्कोहॉलामुळे ही लगेच सुकते व त्याच्यामुळे ओठांवर पातळ थर तयार होतो. जास्त काळ टिकून राहण्याचा गुणधर्म हा द्रवरूप लिपस्टिकचा एक फायदा आहे.

नेत्र सौंदर्यप्रसाधने : डोळ्यांभोवतालचे सौंदर्य वाढविणारी प्रसाधने यांत येतात. डोळ्यांच्या पापण्यांचे केस रंगविण्याचे प्रसाधन, नेत्रकोटरांसाठीच्या रंगछटा देणारे प्रसाधन, भुवया रंगविण्याची पेन्सिल (शलाका) इ. यांत येतात.

(१) मस्कारा : (मॅसकॅरो). डोळ्यांच्या पापण्यांच्या केसांना लावण्यात येणाऱ्या रंगाला मस्कारा म्हणतात. यामुळे डोळे रेखीव, तेजस्वी व भावपूर्ण दिसतात आणि आकर्षक वाटतात. यामुळे पापणीचे केस थोडेसे कडक होतात. पूर्वी काळी वा पिंगट रंगद्रव्ये सर्वसाधारण साबणात मिसळून त्याच्या लहान वड्या बनवीत. मात्र त्यामुळे डोळ्यांना भयंकर वेदना होत असत. नंतर काजळी, उदी आयर्न ऑक्साइड किंवा अल्ट्रामरीन निळे रंगद्रव्य सौम्य साबणामध्ये ट्रायएथॅनॉल अमाइन स्टिअरेट किंवा रेसिनोलियेट, ओलियेट तसेच मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण, कार्नोबा मेण, स्पर्मेसेटी इ. नैसर्गिक व कृत्रिम मेणे यांचे मिश्रण करून मस्कारा तयार करण्यात आला. तो ओल्या ब्रशाने लावतात. क्रीमे व श्लेष्मल द्रव्य यांत स्थायी निलंबन करून क्रीम रूपातील मस्काराही तयार करतात. मात्र तो वरचेवर घट्ट होतो. हा बाष्पनशील विद्रावकात बनविला असून विद्रावक उडून गेल्यावर मागे राहिलेला मस्कारा चांगला जलरोधी असतो. निळ्या वा राखी रंगाच्या डोळ्यांच्या काळ्या पापण्यांना निळा तर हिरवट वा पिंगट डोळ्यांच्या पिंगट वा लाल पापण्यांना हिरवा मस्कारा लावण्याचे सुचविले जाते.


 (२) पापणी व भुवयी यांसाठीचा रंग : ५% सिल्व्हर नायट्रेटाचा हा सौम्य विद्राव असतो व सोडियम थायोसल्फेटाच्या साहाय्याने हा रंग विकसित करतात. हा वापरताना अतिशय काळजी घेऊन लावतात व तो डोळ्यांत जाणार नाही याची खबरदारी घेतात. हा रंग कायम स्वरूपाचा असून तो लहान बाटल्यांमध्ये वा कुप्यांमध्ये मिळतो.

रंगद्रव्ये, पेट्रोलॅटम (मऊ, अर्धघन असे खनिज तेल व मेणे यांचे मिश्रण) आणि लॅनोलीन यांचे मिश्रण पेन्सिलीच्या वा अंकनीच्या रूपात भ्रुकुटी पेन्सिली तयार करतात. या लिपस्टिकपेक्षा लांब व बारीक असतात. पूर्वी धातूच्या वेष्टनातील मेणाच्या कांड्यांच्या रूपात त्या मिळत असत. हे मेण मऊ असून त्या लिहिण्याच्या पेन्सिलीप्रमाणे वापरतात व त्यांना टोकही करता येते. काळ्या, पिंगट, सोनेरी पिंगट या रंगांच्या विविध छटांत व लाकडी पेन्सिलीच्या रूपात या उपलब्ध आहेत. त्यांच्या साहाय्याने आकारहीन व विरळ भुवया रेखीव करतात.

(३) नेत्रछाया (आय शॅडो) क्रीम : पेट्रोलॅटम व लॅनोलीन यांच्यात रंगद्रव्ये मिसळून हे क्रीम बनवितात. यात माशांच्या खवल्यांचा अर्क घालून मोत्यासारखे दिसण्याचा खास परिणाम साधतात. रंगभूमीवरील प्रखर दिव्यांच्या प्रकाशात डोळ्यांचे सौंदर्य खुलून दिसावे म्हणून पूर्वी हे वापरीत. इतर वेळी हे केवळ कृत्रिम प्रकाशात वापरतात. यांच्या पिंगट, राखी, निळसर राखी, जांभळट व हिरवट अशा रंगछटा असतात. या रंगछटा डोळ्यांभोवतालच्या नैसर्गिक रंगछटेत मिसळून त्या अधिक खुलविल्या जातात. या क्रीममध्ये वसा, मेणे, सेरेसीन, पेट्रोलॅटम, लॅनोलीन, स्पर्मेसेटी इ. घटक असतात. अपेक्षित दाटपणानुसार यातील वसा व मेणे यांचे मिश्रण करतात.

मस्कारा, भ्रुकुटी पेन्सिल, नेत्रछाया क्रीम इ. डोळ्यांविषयीच्या प्रसाधनांमध्ये वापरावयाच्या रंगांच्या बाबतीत इतर प्रसाधनांपेक्षा अधिक कडक निर्बंध व नियम आहेत. यांमध्ये संश्लेषित कार्बनी रंजक वापरीत नाहीत. म्हणून यांमध्ये फक्त नैसर्गिक मान्यताप्राप्त धातूंची ऑक्साइडे वापरतात. उदा., काजळी (काळा), ऑकर (पिंगट), सिएन्ना (अंबर), अल्ट्रामरीन रंगद्रव्य (निळा), क्रोम ऑक्साइड (हिरवा), झिंक ऑक्साइड आणि धातूंची चूर्णे वगैरे. बेंझीन, रंगद्रव्यांतील अशुद्धी, फ्ल्युओरोसीन व त्याचे अनुजात, परीक्षा न केलेले सुगंध इ. घटक ⇨ ॲलर्जी निर्माण करू शकत असल्याने ते टाळतात.

(इ) व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छता यांविषयीची प्रसाधने : स्नानसाहाय्यक प्रसाधने, दुर्गंधीनाशके व केशनाशक द्रव्ये यांत येतात. क्वचितच यांत साबण अंतर्भूत करतात.

(१) स्नानसाहाय्यक प्रसाधने : यांचा वापर केल्याने स्नानाला सौंदर्यविषयक मूल्य प्राप्त होते. यांत लवणे, तेले व चूर्णे येतात. स्नान लवणांपैकी सोडियम सेस्क्विकार्बोनेटामुळे जड पाणी मृदू होते. यात सोडियम परबोरेट मिसळल्यावर यातून ऑक्सिजन मुक्त होतो. हे लवण आकर्षक रंगाचे व सुगंधित असते. सोडियम क्लोराइड खाऱ्या पाण्याच्या स्नानासाठी सुगंधित करून वापरतात. सोडियम फॉस्फेटाने जड पाणी मृदू होते मात्र त्याच्यामुळे त्वचा कोरडी होते. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा क्रियाशील घटक आणि सायट्रिक व टार्टारिक यांसारखी सौम्य कार्बनी अम्ले वापरून फसफसणारे (फेनद) लवण तयार करतात. त्यात भरण द्रव्य म्हणून १०% स्टार्च घालतात. या लवणांना मान्यताप्राप्त रंगांद्वारे विविध सौम्य छटा देतात, तसेच सुगंधितही करतात. यांसाठी विशेषतः पाइन सुगंध वापरतात. या लवणांच्या आधी स्नानासाठी व्हायोलेट अमोनिया व स्नान (टॉयलेट) व्हिनेगर वापरीत. उग्र वासाचा ३०% अमोनियायुक्त विद्राव म्हणजे व्हायोलेट अमोनिया यामुळे पाणी मृदू होते. केवळ सुगंधित स्नानासाठी वापरण्यात येणारे स्नान व्हिनेगर हा निरनिराळी सुगंधी तेले, ॲसिटल अम्ल, एथिल ॲसिटेट अणि ७५-९०% अल्कोहॉल यांचा विद्राव असे.

स्नानतेले : सुगंधी स्नानसाठी वापरण्यात येणारी ही तेले म्हणजे सल्फेटेड एरंडेल वा ऑलिव्ह तेल, वाटप करणारा विशिष्ट द्रव आणि नैसर्गिक किंवा संश्लेषित सुगंधी तेले यांची मिश्रणे असतात. पाण्यात सहजपणे मिसळणाऱ्या या मिश्रणांमुळे त्वचा रुक्ष बनते. ही जड पाण्यातील घटक द्रव्यांबरोबर मिसळतात व स्नानकुंडाच्या फेसाचे वलय निर्माण होण्यास प्रतिबंध करतात. पाण्यात न मिसळणाऱ्या स्नानतेलात विरघळविणारा व सुगंधी घटक म्हणून डायएथिलीन ग्लायकॉल मोनोएथिल ईथर घालतात. क्रीमयुक्त स्नान तेले (स्नानदुग्ध) द्रवरूप पायसे असून यांत स्टिअरिक अम्ल किंवा स्टेरॉले यांचे ग्लिसरॉल किंवा ग्लायकॉल व खनिज तेल यांचे कार्बनी अमाइनांच्या साहाय्याने पायसीकरण केलेले असते.

फेनद स्नान द्रव्यांमध्ये सल्फेटीकृत मेदी अल्कोहॉले व त्यांपासून तयार केलेले अनुजात असतात. कधीकधी यांत सॅपोनीन, पाणी मृदू करणारी द्रव्ये व फेस टिकवून ठेवणारे सोडियम ॲल्जिनेट वापरतात. जर ही तोटीतून, नळीतून बाहेर पडणाऱ्या जोराच्या प्रवाहात सरळ मिसळली गेली, तर विपुल दुर्गंध येतो व घामाचे प्रमाणही जास्त होते. घामात सु. एक टक्का कार्बनी द्रव्ये असून उष्ण हवेत ती लवकर कुजून घामाला आंबूस वा घामट वास येतो. कारण यातून कॅप्रॉइक, कॅप्रिलिक व व्हॅलेरिक यांसारखी वसाम्ले तयार होतात.

(२) दुर्गंधीनाशके : ही घामाच्या दुर्गंधीला प्रतिबंध करण्यासाठी वापरतात. त्यांच्यामुळे घामाचा असुखद गंध लोप पावतो व सुगंध पसरतो. दुर्गंधीनाशके चूर्ण, क्रीम किंवा द्रवरूप स्वरूपात असतात. काखा, तळहात, तळपाय व मासिक पाळीच्या वेळी वापरावयाचे आरोग्यरक्षक घड्यांचे रूमाल (सॅनिटरी नॅपकिन) यांवर दुर्गंधीनाशके लावतात. यांमध्ये सर्वसाधारणपणे बोरिक, बेंझॉइक वा सॅलिसिलिक अम्ले, झिंक ऑक्साइड, झिंक पेरॉक्साइड, मॅग्नेशियम कार्बोनेट, हायड्रॉक्सी क्विनोलीन सल्फेट व संगजिरे हे घटक असतात.

स्वेदप्रतिबंधक द्रव्ये बहुधा द्रव, क्रीम वा लेह रूपांत असतात. ही तीव्र स्तंभक असतात. त्यामुळे त्वचेवर ती जेथे लावतात तेथील प्रथिने साखळतात व अवक्षेपित होतात. त्यामुळे घाम शरीरात इतरत्र जातो, असे मानतात. मात्र त्यांचा शरीराच्या कार्यावर परिणाम होत असल्याने त्यांना सौंदर्यप्रसाधनांऐवजी औषधी द्रव्ये मानणे उचित ठरते.

ऊर्ध्वपातित पाण्यातील १६-२०% ॲल्युमिनियम क्लोराइडाचा विद्राव हे सर्वांत साधे स्वेदप्रतिबंधक द्रव्य आहे. तुरटी, हायड्रॉक्सी क्विनोलीन सल्फेट, ग्लिसरॉल व इतर कार्बनी द्रव्ये घालून यात सुधारित गुणधर्म आणतात. ॲल्युमिनियम क्लोराइड, सल्फेट, ॲसिटेट, क्लोरोडायहायड्रॉक्साइड जटिल तसेच झिंक क्लोराइड, सल्फेट व फेनोसल्फोनेट,फॉर्‌मॅरलीन, हेक्झामिथिलीन टेट्राअमाइन, टॅनीन, टॅनिक अम्ल, हायड्रॉक्सी क्विनोलीन सल्फेट ही यातील इतर घटक द्रव्ये आहेत. या घटक द्रव्यांशी जुळणारे सुगंधी द्रव्य यात घालतात. ते त्वचेचा दाह करणारे नसते. लोखंड व इतर धातूंशी हायड्रॉक्सी क्विनोलीन सल्फेटाचा संयोग होऊन ते दूषित व रंगहीन होते. म्हणून त्याचा उपयोग काळजीपूर्वक करतात.

(३) केशनाशक द्रव्ये : नको असलेले केस काढून टाकणारी अशी प्रसाधने अतिप्राचीन काळापासून वापरात आहेत. तेव्हापासून या प्रसाधनांच्या मूलभूत संघटनात किंवा केशनाशनासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर प्रकारांत अगदी थोडा बदल झाला आहे. केशनाशनाच्या भौतिक व रासायनिक पद्धती आहेत. यांपैकी केशनिष्कासन (केस काढून टाकणे) व केशनिःसारण किंवा केशनिर्मूलन (केस मुळासकट काढणे) या केस काढून टाकण्याच्या दोन मुख्य प्रक्रिया आहेत.

केशनिष्कासनात त्वचेच्या पातळीवरून केस काढून टाकणे सुरक्षित वस्तऱ्याने केस काढणे आणि केशनिष्कासक द्रव्ये ही रासायनिक मिश्रणे वापरून केस काढणे या केशनाशनाच्या सामान्य वापरातील पद्धती आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर केस काढून टाकता येणे हा केशनिष्कासनाचा मुख्य फायदा आहे. यामुळे राठ व दाट केसांबरोबर मऊ केसही काढले जातात आणि थोड्याच कालावधीत पूर्वीसारखे नवीन दाट केसांचे खुंट दिसू लागतात. हा या पद्धतीचा तोटा आहे.

अतिप्राचीन काळापासून ग्रीक व रोमन लोक स्नान करताना पमीस हा (फेसासारखा वा स्पंजासारखा काचेचा सच्छिद्र) खडक अपघर्षक म्हणून वापरीत. त्याने अंग घासल्यास केसांबरोबर त्वचेवरील मळही निघून जातो. या दगडाला वडीसारखा सोयीस्कर आकार देतात. भारतात यासाठी वज्री वापरीत असत. वज्री सामान्यपणे पितळ व तांबे यांची बनविलेली असते. तिला प्राणी, पक्षी यांचा किंवा वेगळा आकार दिलेला असतो आणि ती हातात धरण्यासाठी मूठ असते व विशेषतः तळपायांवर घासण्यासाठी तिला खडबडीत पृष्ठभाग असतो. इतरत्र अंगावर घासण्यासाठी वज्रीचा हा पृष्ठभाग तुलनात्मक दृष्ट्या मऊ व मृदू असतो. त्यामुळे त्वचेला इजा पोहोचत नाही. पूर्वी पट्ट्यावर मऊ अपघर्षक पदार्थ चिकटवून असे पट्टे स्नानाच्या वेळी अंग घासण्यासाठी वापरीत. लाकडी वा धातूचा पृष्ठभाग घासण्यासाठीचे घासकागद असेच बनवितात [ ⟶ घासकागद]. अर्थात या पद्धतीने केस काढण्यासाठी जास्त वेळ लागतो व तिच्यामुळे त्वचेची आग होण्याची शक्यता असते.

केशनिष्कासन : केशनिष्कासक मिश्रणांत केसांवर सौम्य परिणाम घडविणारे घटक असतात. रुस्मा नावाचा असा घटक प्राचीन काळापासून पौर्वात्य देशांतही वापरात होता. यामध्ये एक भाग कॅल्शियम ऑक्साइड व दोन भाग आर्सेनिकयुक्त आयर्न पायराइट या द्रव्यांची बारीक पूड घालीत. वापरण्याआधी हे मिश्रण तीव्र अल्कधर्मी विद्रावात मिसळीत असत. यात आर्सेनिक ट्रायसल्फाइड घालून प्रथम सुधारणा वा बदल करण्यात आला. बेरियम, कॅल्शियम, स्ट्राँशियम, पोटॅशियम व सोडियम या धातूंची सल्फाइडे ५ टक्क्यांपर्यंत घेतात व त्यांत निरनिराळ्या प्रमाणात कॅल्शियम ऑक्साइड एकत्र करून ते मिश्रण वापरतात. ही मिश्रणे चूर्णरूपात किंवा रबडीच्या रूपात तयार करतात. अशा केशनिष्कासक द्रव्यांमुळे त्वचेची आग होण्याची भीती असते व त्यांना उग्र असुखद दर्प येतो. हा दुर्गंधी घालविणारा आणि हानीकारक वा उपद्रवकारक घटकांऐवजी निरुपद्रवी व परिणामकारक घटक वापरून शुद्ध स्वरूपाचे लेह व क्रीमे तयार केली आहेत. केस मऊ करणारे क्षपणकारक [ ⟶ क्षपण] घटक घालून तयार केलेल्या अनेक केशनिष्कासकांची एकस्वे (पेटंट) घेतली आहेत. यांमध्ये विरलकारक, सक्रियकारक व भरण द्रव्ये सुद्धा घालतात. बेरियम सल्फेट, मॅग्नेशियम ऑक्साइड, टिटॅनियम डाय-ऑक्साइड ही शुभ्रपणा आणण्यासाठी खडू, मृत्तिका, कॅल्शियम ऑक्साइड, साबण, स्टार्च व संगजिरे भरण द्रव्ये म्हणून आणि जिलेटीन, डिंक व मिथिल सेल्युलोज ही बंधक द्रव्ये म्हणून वापरतात.

केशनिष्कासक लेह किंवा क्रीमे सुगंधित करताना त्यांच्या जादा क्षारतेमुळे [पीएच मूल्य ११-१३ स पीएच मूल्य] अनेक अडचणी येतात. यामुळे कच्चा माल व प्रस्थापित मिश्रणे यांचे प्राथमिक परीक्षण करतात. केस निघून जाण्यासाठी लागणारा ४-८ किंवा अधिक मिनिटांचा कालावधीही लक्षात घेतात.


 धातूवर आधारलेली केशनिष्कासक द्रव्ये ॲलर्जी निर्माण करीत नाहीत, परंतु त्यांच्यामुळे अतिसंवेदनशील त्वचेचा दाह होऊ शकतो. कार्बनी घटक वापरून बनविलेल्या आधुनिक केशनिष्कासक प्रसाधनांमुळे ॲलर्जींचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्वचेची संवेदनशीलता अजमावण्यासाठी प्रथम त्यांची चाचणी घेतात. यांचा त्वचेवर परिणाम होत असल्याने कायद्यानुसार ही प्रसाधने औषधे मानतात आणि त्यांच्या वेष्टनावर त्यांच्यात वापरलेल्या घटकांची यादी देणे बंधनकारक असते.

केशनिर्मूलन किंवा केशनिःसारण : या प्रक्रियेत केस मुळापासून उपटण्याच्या पुढील तीन पद्धती आहेत. केस उपटून काढणे, मेण लावणे व विद्युत् प्रक्रिया. केशनिर्मूलन केल्यावर केस परत येण्यास सापेक्षतः अधिक वेळ लागतो व हे केस कमी प्रमाणात येतात. परत येणारे केस राठ व खुंटासारखे नसतात. केस वारंवार मुळापासून उपटल्यास ते परत वाढण्याची प्रवृत्ती कमी होते. हे केशनिर्मूलनाचे फायदे आहेत.

(१) केस उपटून काढण्याची पद्धती : ही पद्धती प्राचीन काळापासून प्रचलित आहे. केस उपटून काढताना मृदुकारक क्रीम वापरण्याची शिफारस केली जाते परंतु केस उपटताना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी या क्रीममध्ये बेंझोकेन (एथिल-पॅरा-ॲमिनोबेंझोएट) हे पांढरे चूर्ण किंवा अन्य संवेदनाहारक मिसळतात. संवेदनाहारक नसल्यास क्रीम विशेष उपयुक्त ठरत नाही. जेथील केस काढावयाचे आहेत त्या ठिकाणी इजा पोहोचू नये किंवा संसर्गाला प्रतिबंध होण्यासाठी पूतिरोधक द्रव्ये वापरणे अत्यावश्यक असते.

(२) केशनिःसारक मेण : काख, हात व पाय यांसारख्या मोठ्या भागांवरील केस जलदपणे व परिणामकारक रीतीने काढून टाकण्यासाठी तेथे मेण लावण्याची पद्धत वापरतात. या पद्धतीत मऊ केसही काढून टाकले जातात. मात्र ते कमी-अधिक गतीने हळूहळू परत येतात.

प्राचीन काळी केशनिःसारक मेणामध्ये एरंडेल, टर्पेंटाइन, अल्कोहॉल, कलोडियन व आयोडीन हे घटक वापरीत. अशा सुधारित मेणांत नंतर मेणे व राळ यांचा वापर होऊ लागला. पुढे अशी मिश्रणे मऊ जिलेटिनी किंवा घट्ट वड्यांच्या रूपांत उपलब्ध झाली. असे मिश्रण थंड किंवा थोडेफार गरम करून व केस काढावयाच्या भागावरील त्वचेवर पसरवून त्याचा एकसारख्या जाडीचा थर तयार करतात. मिश्रण थंड झाल्यावर हा थर लगेच काढून टाकतात. हा थर काढून टाकण्यासाठी त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या कापडाचा तुकडा ठेवतात व तो किंचित दाबतात. नंतर हा तुकडा केसांच्या दिशेच्या उलट दिशेत झटकन उचलून घेतात. केशनिःसारक मेणांत ५०-६०% रोझीन, ५-१०% मधमाश्यांच्या पोळ्यांतील मेण, २५% कार्कोबा मेण किंवा २०% पॅराफीन, ५% अळशीचे शुष्कन तेल आणि संवेदनाहारक म्हणून १-२% बेंझोकेन ही घटक द्रव्ये वापरतात.

(३) विद्युत् प्रक्रिया : केस कायमचे काढून टाकण्याची ही एकमेव सुरक्षित पद्धत आहे. त्वचा वैद्य व सौंदर्यप्रसाधनतज्ञ यांनी हिच्या खालील दोन पद्धती मान्य केल्या आहेत.

विद्युत् विच्छेदन : या पद्धतीत स्थिर ⇨ एकदिश विद्युत् प्रवाह वापरून केस काढून टाकले जातात. विद्युत् विच्छेद्याच्या विद्रावातून किंवा वितळलेल्या लवणातून असा विद्युत् प्रवाह पाठवून या पद्धतीत रासायनिक विक्रिया घडवून आणल्या जातात.

विद्युत् किलाटन : उच्च कंप्रतेचा विद्युत् प्रवाह वापरून या पद्धतीत ऊतकाचे किलाटन किंवा क्लथन करतात.

वरील दोन्ही पद्धतींत अतिशय सूक्ष्म सुई केसांच्या पुटकात अंकुरकापर्यंत (केसाच्या उगमस्थानापर्यंत) घालतात. विद्युत् प्रवाह चालू झाल्यावर पुटकाच्या आतल्या भागाला हिसका वा झटका बसतो आणि केस हळूवारपणे त्वचेबाहेर येतात. यांपैकी दुसरी पद्धत अधिक जलद असून तिचा योग्य रीतीने परिणाम होतो.

त्वचेची संकीर्ण प्रसाधने : (१) मुखलेप : चेहऱ्याचे प्रसाधन करताना व्यावसायिक मुखलेप वापरतात. घरातही याचा वापर करता येतो. विविध द्रव्ये एकत्र करून तयार केलेले खाजगी मालकी हक्क असणारे अनेक मुखलेप उपलब्ध आहेत. मुखलेप वापरल्याने चेहऱ्यावरील धूळ व इतर दूषित द्रव्ये निघून जातात चेहऱ्यावर विपुल प्रमाणात घाम येऊन त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेमधील रक्ताभिसरणाला चालना मिळते.

मुखलेप रबडी किंवा लेह आणि क्रीम या रूपांत मिळतात. बाभूळ, कराया, क्वीन्स सीड, ट्रागकांथ, मार्श मॅलो आणि इतर डिंक, श्लेष्मल द्रव्य, मुलतानी माती, बेंटोनाइल, केओलीन, कॅलॅमीन, ओटचे पीठ, मक्याचे पीठ, बदाम, अंडे (रुक्ष त्वचेसाठी पिवळा व तेलकट त्वचेसाठी पांढरा बलक), टिंक्चर बेंझॉइन, त्वचा गौर करण्यासाठी झिंक ऑक्साइड, टिटॅनियम डाय-ऑक्साइड आणि झिंक व हायड्रोजन पेरॉक्साइड ही मुखलेपातील घटक द्रव्ये आहेत. अल्कोहॉल, ग्लिसरॉल, लव्हेंडर, गुलाब पाणी, विच हॅजेल अर्क ही द्रव्ये रबडी तयार करण्यासाठी वापरतात. घाम आणण्यासाठी पॅराफीन मेण, पेट्रोलॅटम यांचा अखंड थर देतात. यात अल्प प्रमाणात रबराचा चीक मिसळतात. त्यामुळे मुखलेप अखंडपणे काढता येतो.

मातीचा लेप हेही एक सौंदर्यप्रसाधन आहे. हे प्राचीन काळापासून वापरात आहे. स्त्रिया त्वचेचे सौंदर्य कायम राखण्यासाठी सर्व शरीर चिखलाने माखून घेत असत. चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी माती वापरतात. मातीचा लेप दिल्याने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होऊन खरखरीत त्वचा मऊ, गुळगुळीत व तेजस्वी होते. बाजारात मिळणाऱ्या मुखलेपात चिकण माती, संगजिरे, सज्जी माती (रेह), सुगंध, रंगद्रव्य व पूतिरोधक द्रव्य यांचे मिश्रण केलेले असते. धान्ये व डाळी यांची पीठेही यांसाठी वापरतात. मृत समुद्राचा गाळ वा माती अतिशय उपयुक्त लेप म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. त्वचेच्या आजारांसाठी तो वापरला जातो.

(२) स्नायुतेले : मर्दन (मालीश) करताना त्वचा अधिक स्निग्ध होण्यासाठी स्नायुतेले वापरतात. त्यांना मृदुकारी किंवा मर्दन तेले म्हणतात. खनिज तेलात ऑलिव्ह तेल, एरंडेल किंवा बदामाचे तेल घालून ही तयार करतात. खनिज तेल स्नेहनासाठी चांगले असले, तरी त्याने त्वचा रुक्ष होते. त्यामुळे त्यात वनस्पतिज तेले, कोलेस्टेरॉल, लेसिथीन किंवा शोषक क्षारक मिसळतात.

सूर्यरापविषयक प्रसाधने : हवेतील उष्णतेने त्वचा काळवंडत नाही. मात्र सौर प्रारणातील दृश्य व अदृश्य प्रारणांच्या मर्यादित पट्ट्यामुळे (भागामुळे) त्वचा रापते वा काळवंडते. हे प्रारण आकाशात विखुरलेल्या प्रकाशातील, बर्फावरून परावर्तित होऊन आलेले किंवा थेट सूर्यापासून आलेले असते. बाह्य त्वचेच्या मूलभूत थरात संरक्षक कृष्णरंजक (मेलॅनीन) निर्माण झाल्याने त्वचा पिंगट रंगाची होते. अशा प्रकारे सौर प्रारणातील त्वचेला दाहक असणारी किरणे शोषून घेणारे संरक्षक द्रव्य सौंदर्यप्रसाधनांत येतात. सूर्यदाह प्रतिरोधक द्रव्याचा पातळ थर त्वचेवर देतात. सूर्यस्नान घेणाऱ्याच्या अपेक्षा व गरजा भागविणाऱ्या प्रसाधनांचे प्रतिबंधक, कृत्रिम (नकली) आणि निवारक किंवा उपशामक हे तीन प्रकार आहेत.

(१) सूर्यदाहप्रतिबंधक प्रसाधने : संरक्षक प्रारणशोषकाचा सूर्यप्रकाशरोधक पटलासारखा उपयोग होईल या दृष्टीने यातील घटक ठरवितात. परिणामी या प्रसाधनाने ८० टक्क्यांपर्यंत दाहक प्रारण शोषले जातात. अर्थात हे घटक दाहक व विषारी नसतात. हे घटक रंगहीन, रासायनिक घटक अलग न होणारे व २-४ तासांपर्यंत प्रभाव टिकवून ठेवणारे असतात. प्रखर सूर्यप्रकाश व घाम यांचा त्यांच्यावर रासायनिक परिणाम होत नाही. हे घटक पाण्यात किंवा तेलात मिसळून एकजीव होतात आणि ती त्वचेवर सहजपणे पसरून त्यांचा पातळ थर तयार होतो. वनस्पतिज तेलेही सौर प्रारण शोषतात तिळाचे तेल हे याचे उत्तम उदाहरण आहे. दाहक सौर प्रारण शोषून त्वचेचे संरक्षण करणे हा या प्रसाधनांचा मुख्य उद्देश असतो. मात्र यांत न शोषल्या जाणाऱ्या प्रारणामुळे त्वचेचा रंग थोडासा बदामी होतो. विशेषतः पाश्चात्त्य देशांत त्वचा काहीशी बदामी करण्यासाठी खास सौर राप क्रीम वा धावन द्रव वापरतात. सूर्यदाहप्रतिबंधक प्रसाधने क्रीम, चूर्ण व धावन द्रव या रूपांत असून यांपैकी क्रीम अधिक लोकप्रिय आहे. या प्रसाधनांत ॲसिटानिलाइड, अल्कोहॉल, कोलेस्टेरॉल, पॅराॲमिनो बेंझॉइक अम्ल आणि त्याचे अनुजात, अँथ्रॅनिलिक व सॅलिसिलिक अम्ले तसेच मिथिल, फिनिल व बेंझिल एस्टरे शिवाय पेट्रोलॅटम, झिंक ऑक्साइड मलम, लिनोलीन पायसे, दिसेनासे होणारे क्रीम इ. घटक वापरले जातात.


 (२) कृत्रिम वा नकली प्रसाधने : यांनी त्वचेला रंगछटा येते. सजवणुकीसाठी यांचे घनरूप व चूर्णरूप प्रकार आहेत. त्वचेवर या प्रसाधनाचा थर तयार करतात. यामुळे उघड्या न राहिलेल्या त्वचेचाही रंग सूर्यकिरणामुळे बदामीसर होतो. झिंक ऑक्साइड जास्त प्रमाणात असलेले असे चूर्ण प्रकाशरोधक सूर्यपटलाप्रमाणेही वापरता येते. यातील रंजके जलयुक्त वा तैलयुक्त विद्रावांत वापरतात. याचे संघटन व परिणाम प्रसाधन पायमोज्यासारखे दिसतात.

(३) निवारक किंवा उपशामक प्रसाधने : ही प्रसाधने नसून औषधे आहेत. भाजल्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांसाठी शिफारस केलेली घटक द्रव्ये या मिश्रणांत असतात. सूर्यकिरणामुळे भाजलेल्या त्वचेवर कॅलॅमीन धावन द्रव लावतात, त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. लॅनोलीन मिसळलेले व वनस्पतिज तैलयुक्त वा विरहित जलीय अल्कोहॉली पायसे यांचा सामान्यपणे उपयोग करतात आणि त्यांच्यात पूतिरोधक द्रव्ये घालतात.

कुंकू : भारतात कुंकू या सौंदर्यप्रसाधनाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आहे. याचे पिंजर (सुके कुंकू) व सुवासिक गंध (ओले कुंकू) हे दोन प्रकार आहेत. हळदीवर अम्लाची वा क्षारकाची रासायनिक विक्रिया करून कुंकू तयार करतात. अम्लाची तीव्रता व हळकुंडे अम्लात भिजत ठेवण्याचा कालावधी यांवर कुंकवाच्या लाल छटा अवलंबून असतात. हळकुंडे सौम्य सल्फ्यूरिक अम्लात भिजत ठेवल्याने लाल रंग निर्माण होतो. यात पापडखार व टाकणखार घातल्यास लाल रंग पक्का होतो. लालशिवाय काळा, जांभळा, हिरवा इ. विविध रंगांच्या छटा असलेले कुंकूही वापरतात. मेणात खलवून बनविलेले व डिंकाच्या चिकट खळीत रंग घालून तयार केलेले हे ओल्या कुंकवाचे प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कधीकधी हिंगूळ वा शेंदूर यांसारखे विषारी घटक असतात. त्यामुळे त्वचेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. गरम पाण्यात डेक्स्ट्रिन विरघळवून खळ बनवितात. नंतर तिच्यामध्ये पाण्यात विरघळणारा इओसीन किंवा दुसरा लाल रंग मिसळतात. यात अल्पप्रमाणात परिरक्षक घालतात. यामुळे गंधाला बुरशी येत नाही. मिश्रण थंड झाल्यावर त्यात सुगंध घालतात. यांशिवाय विविध आकारांच्या व रंगांच्या चिकटविण्याच्या टिकल्या आणि पेन्सिल या रूपांतही कुंकू उपलब्ध आहे. [ ⟶ कुंकू].

केसांसाठीची सौंदर्यप्रसाधने : केस चांगल्या आणि आरोग्यसंपन्न स्थितीत ठेवण्यासाठी ते स्वच्छ ठेवणे गरजेचे असते व त्यांसाठी ही प्रसाधने वापरतात.

(१) शांपू : केसांलगतच्या ग्रंथींमधून सतत स्निग्ध द्रव्य स्रवत असल्याने केस मऊ राहतात. मात्र या स्निग्ध द्रव्यावर धूळ व घाम साचून ते मलीन आणि चिकट होतात. म्हणून केस स्वच्छ करण्यासाठी विविध प्रसाधने वापरतात. त्यांपैकी शांपू एक आहे. शांपू अनेक प्रकारचे असतात. उदा., साबण घातलेले किंवा साबणविरहित पातळ (द्रवरूप) शांपू व चूर्णरूप शांपू. विशेषतः भारतात केस स्वच्छ करण्यासाठी शिकेकाई, रिठे वगैरे परंपरागत द्रव्येही वापरतात.

(२) क्रीम : पायस व दाट रबडी या रूपांत हे क्रीम असते. पायसरूप क्रीम अधिक प्रमाणात वापरले जाते. अशी पायसे तेलात पाणी किंवा पाण्यात तेल घालून तयार करतात. रबडीच्या रूपातील क्रीममध्ये उच्च दर्जाचे ट्रागकांथ वा कराया डिंक तसेच अळशी, अंबाडी व इसबगोल यांपासून तयार केलेले डिंकही वापरतात. क्रीम जास्त काळ टिकण्यासाठी त्यात फॉर्‌माल्डिहाइडासारखे परिरक्षक द्रव्य घालतात.

केस चापूनचोपून व्यवस्थित बसविण्यासाठी पातळ वा घट्ट प्रसाधने वापरतात. पांढरी वा पिवळसर पेट्रोलियम जेली गरम करून तिच्यात आवडीनुसार रंग व सुगंध घालून थंड होऊ देतात. पॅराफीन मेण किंवा मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण घालून घट्ट प्रसाधन तयार करतात. पॅराफीन तेल घातल्यास पातळ प्रसाधन बनते. त्यात तेलात विरघळणारा पिवळा वा हिरवा रंग घालतात. यामध्ये ब्रिलियंटाइन, पोमेड इ. अशी प्रसाधने आहेत.

(३) केशवर्धक प्रसाधने : काहींच्या बाबतीत आनुवंशिकता, शारीरिक विकृती व इतर कारणांमुळे केस गळतात किंवा ते लांब वाढत नाहीत. डोक्यावरील स्निग्ध पदार्थ निर्माण करणाऱ्या ग्रंथींमार्फत जादा प्रमाणात स्निग्ध पदार्थ स्रवतात व त्यांचा चिकट थर डोक्याच्या त्वचेवर साचतो. यामुळे केसांची छिद्रे बंद होऊन केसांचे व्यवस्थित पोषण होत नाही. यावर उपाय म्हणून डोक्याची त्वचा स्वच्छ धुतात आणि केसांच्या मुळांना उत्तेजित करणारी औषधे वापरतात. केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत द्रव्यांची शरीरातील कमतरता किंवा तंत्रिका तंतूंची दुर्बलता यांच्यामुळेही केस गळू शकतात. यावरील उपाय म्हणून प्रभावी व उपयुक्त औषधे, केशवर्धक द्रव्ये किंवा केसांसाठीचे धावन द्रव वापरतात. केसांच्या वाढीला व पोषणाला प्रत्यक्ष मदत करणारी आणि डोक्याची त्वचा उत्तेजित करून अप्रत्यक्ष मदत करणारी व पूतिरोधक द्रव्येही आहेत. कोलेस्टेरॉल, जीवनसत्त्व, लेसिथीन हे फॉस्फोलिपिड, जीवनसत्त्व इ. द्रव्ये केसांची वाढ व पोषण यांसाठी उपयुक्त आहेत. केशधावन द्रवात मुख्यत्वे अल्कोहॉल वापरतात. बोरिक, सायट्रिक व टार्टारिक अम्ले, ग्लिसरीन ही द्रव्ये व सुगंध ही यातील इतर घटक द्रव्ये होत. डोक्यातील कोंडा निघून जाण्यासाठी क्लोरल हायड्रेट, गंधक आणि कोलेस्टेरॉल तर पूतिरोधक म्हणून कापूर व मेंथॉल ही द्रव्ये वापरतात.

केसांना वळण देण्यासाठी व ते कुरळे करण्यासाठी तीन प्रकारची प्रसाधने वापरतात. केस तात्पुरते कुरळे करण्यासाठी तरंगाकार स्थापक धावन द्रव वापरतात. केस कायमचे कुरळे करण्यासाठी यांत्रिक मदत घेतात. केश लॅकर हे केसासाठी वापरावयाचे व्हॉर्निश असून केस वळविल्यावर ते नीट व व्यवस्थित बसविण्यासाठी केसांवर त्याचा फवारा मारतात यात अल्कोहॉलामध्ये विरघळणारे कृत्रिम चिकट पदार्थ वापरतात. बेंझॉइन, सँडॉरॅक (विशिष्ट वालुकाश्म), स्टायरॅक्स, मॅस्टिक व कोलोफोनी ही यासाठी योग्य व उचित द्रव्ये आहेत.

केसांना कलप करण्यासाठी व निरनिराळ्या रंगछटा देण्यासाठी निरनिराळ्या प्रमाणात मेंदी वापरतात. मेंदीबरोबर पायरोगॅलिक व सायट्रिक अम्ले, अल्कोहॉल, ग्लिसरीन ही द्रव्येही वापरतात. यांशिवाय लेड ॲसिटेट, हायपो सिल्व्हर नायट्रेट, कॉपर सल्फेट, अमोनिया, गुलाब पाणी या द्रव्यांचाही केसांना कलप करण्यासाठी उपयोग करतात.

केसांना लावण्यासाठी सामान्यतः खोबरेल तेल वापरतात. शुद्ध खोबरेल तेल चांगले असते. कारण त्याला खोबऱ्याचा नैसर्गिक सुगंध टिकून राहतो व ते खवट होत नाही. याशिवाय एरंडेल तसेच तीळ व बदाम यांची तेले ही केशवर्धक तेले आहेत. ही तेले सुवासिकही असतात. हिवाळ्यात खोबरेल तेल गोठू नये म्हणून त्यात शुद्ध व वासरहित व्हाइट ऑइल घालतात. पेट्रोलॅटम, व्हॅसलीन व पॅराफीनसुद्धा वापरतात. अधिक काळ टिकून खवट होऊ नये म्हणून खोबरेल तेलात परिरक्षक द्रव्ये घालतात. तेलात विरघळणारा रंग घातल्यास तेल स्वच्छ व पारदर्शक दिसते. ॲनिलीन, वॅक्सोलीन, हरितद्रव्य, हळद इ. द्रव्ये रंग येण्यासाठी तेलात घालतात. गुलाब, चमेली, केवडा, लव्हेंडर व रोझमेरी यांची फुले, वाळा, चंदन, बेर्गमाँट फळे यांची तेले १-२% प्रमाणात मिसळून केशवर्धक तेले सुगंधी करतात. एकाहून अधिक सुगंधी तेले घालून तेलाला संमिश्र मोहक सुवास आणतात. गव्हला, नागरमोथा, लवंग, दालचिनी, कापूर, कापूरकचरा, चंदन, वाळा यांचा पाण्यातील अर्क पूर्वी तेलाला सुवास आणण्यासाठी वापरीत असत. ब्राह्मीसारख्या काही औषधी वनस्पती वापरून सुवासिक व केशवर्धक तेल तयार करतात. माका किंवा ब्राह्मीच्या पानांतील हरितद्रव्यामुळे तेल नैसर्गिक रीत्या हिरवे होते. आवळ्यात तेल नसले तरी औषधी घटक असतात. आवळे वाटून त्या लगद्यात पाणी व तेल घालून ते मिश्रण एकत्रित उकळतात आणि मिश्रणातील पाणी काढून टाकतात. अशा प्रकारे तयार झालेले आवळ्याचे तेल केशवर्धक व थंड असते. आवळ्यातील तुरटपणा व अम्ल यांच्यामुळे केस धुतल्यावर स्वच्छ, मऊ आणि बळकट होतात. यांशिवाय एरंडेल, माक्याचे व भृंगराज तेले तसेच कडूनिंब, बेल, त्रिफळा इत्यादींपासूनही केशवर्धक तेले तयार करतात.

नखांचे रंग व व्हार्निश : हातापायांची नखे स्वच्छ ठेवून व व्यवस्थित कापून ती कलात्मक रीतीने रंगविल्यास सुंदर दिसतात. नखांना लावावयाच्या रंगांच्या अनेक छटा उपलब्ध आहेत. व्यक्तीच्या रंगाला साजेसा नखरंग (नेलपेंट) नखांना लावल्यास नखे उठून दिसतात. सेल्युलोज ॲसिटेट किंवा नायट्रोसेल्युलोज वापरून बनविलेले रंग वापरल्यास नखे चमकदार दिसतात. हे घटक विरघळविण्यासाठी वापरण्यात येणारे विद्रावक द्रवरूप व हवेत उडून जाणारे असतात. ॲसिटोन, एथिल अल्कोहॉल, एथिल ॲसिटेट, एथिल ग्लायकॉल, ग्लायकॉल ॲसिटेट, मिथिल किंवा प्रोपिल ॲसिटेट, ब्युटिल ग्लायकॉल व ॲसिटेट इ. असे विद्रावक आहेत.

नखांचे व्हार्निश (नेलपॉलिश) लवचिक व चिवट होण्यासाठी एरंडेल, कापूर, थॅलिक अम्ल एस्टर, ब्युटिल स्टिअरेट इ. द्रव्ये प्लॅस्टिकारक म्हणून वापरतात. पारदर्शकता, चकचकीतपणा, चमकदारपणा नखांवर बराच काळ टिकणे, सुकल्यावर एक सलग थर निर्माण होणे म्हणजे भेगा न पडणे, पातळ व लवचिक थर निर्माण होणे, चकाकी व रंगछटा न बदलणे, पाण्याचा परिणाम न होणे, काढून टाकता येणे, नखालगतच्या त्वचेला कोणताही अपाय न होणे हे नखरंगाचे आवश्यक गुणधर्म मानतात.

दंतमंजन व दंतरबडी : (टूथ पावडर व टूथ पेस्ट). दात स्वच्छ करण्यासाठी चूर्णे, रबडी, काडी इ. रूपांतील द्रव्ये वापरतात. यांपैकी दंतमंजन व दंतरबडी मुख्य आहेत. शिवाय कडूनिंब वा बाभूळ, मिसवाक झाडाची काडी (दातवण), मशेरी (भाजलेली तंबाखू), तपकीर, हळद, मीठ इत्यादींचा दात घासण्यासाठी उपयोग करतात. द्रवरूप दंतधावनेही वापरतात. यामुळे हिरड्यांना इजा न पोहोचू देता दातांमधील व दातांवर साचलेले किटण व मलीन घटक काढून टाकतात. यांपैकी काही द्रव्यांमुळे हिरड्या बळकट होतात व दातदुखी बरी होते, असा दावा केला जातो.

दंतरबडीमध्ये अपघर्षक वा पॉलिश करणारे द्रव्य तसेच बंधक, स्नेहनकारके, मधुरके, स्वादकारके, विरलकारके ही द्रव्ये व इतर घटक असतात. त्यांच्यामुळे दंतरबडीत विशेष गुणधर्म येतात. दंतरबडी सामान्यपणे दबणाऱ्या नळीत भरतात.


 अवक्षेपित खडू, डाय- व ट्राय-कॅल्शियम फॉस्फेटे, संगजिरे, केओलीन व अभ्रक हे अपघर्षक श्लेष्मल द्रव्य, सोडियम अल्जिनेट, डिंक, पेक्टिने, ग्लिसरीन, स्टार्चचे ग्लिसराइट, मध वा साखरेचा पाक व शुद्ध केलेले बेंटोनाइट हे बंधक सौम्य साबण, आर्द्रताकारक व कृत्रिम फेनदकारक खनिज तेल व पेट्रोलॅटम हे स्नेहनकारक (यामुळे नळी दाबल्यास रबडी बाहेर पडण्यास मदत होते) सॅकॅरीन, ग्लिसरीन, साखर किंवा मध ही मधुरके तसेच स्वादकारक पाणी, ग्लिसरीन व सॉर्बिटॉल पाक हे विरलकारक आणि पोटॅशियम क्लोरेट, सोडियम परबोरेट, पेरॉक्साइडे, पेप्सिन, पँक्रिॲटीन किंवा इतर ⇨ एंझाइमे, आयोडाइडे, क्विनीन, सॅलोल व इतर सॅलिसिलेटे, बाभूळ यांसारख्या वनस्पतींचे भाग, स्तंभक व डाग काढून टाकणारी द्रव्ये इ. विशेष घटक द्रव्ये दंतरबडीत असतात. दंतमंजनात मुख्यतः पॉलिश करणारे द्रव्य आणि अल्प प्रमाणात फेस आणणारी द्रव्ये, मधुरके, स्वादकारके इ. द्रव्ये असतात. एकूण दंतरबडी व दंतमंजन यांतील बहुतेक घटक द्रव्ये तीच असतात. अर्थात दंतमंजनात बंधक, स्नेहनकारक, विरलकारक इ. द्रव्ये नसतात. घटक द्रव्ये मिसळून व सूक्ष्म चाळणीने चाळून तयार झालेले दंतमंजन नंतर पिशव्या, बाटल्या इत्यादींत भरून आवेष्टित करतात.

द्रवरूप दंतधावनात क्षोभकारक नसलेल्या आर्द्रताकारक द्रव्यांचे विद्राव, अल्कोहॉलाचा जलीय विद्राव, सॅकॅरीन व रंजक द्रव्ये असतात. आयुर्वेदिक दंतरबडी व दंतमंजन यांच्यामध्ये विविध वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांची पूड वापरतात. उदा., बाभूळ, बकूळ, जांभूळ, बोर, अक्रोड, दालचिनी, खैर, हिरडा, वज्रदंती इत्यादींची साल ज्येष्ठमध व अनंतमूळ इत्यादींची मुळे लवंग, अजनान यांची फुले आवळा, हिरडा, बेहडा, मिरी, मायफळ, कबाबचिनी इ. फळे. यांशिवाय पुढील वनस्पतींचाही वापर करतात. उदा., अक्कलकारा, मंजिष्ठा, पतंग, पुदिना, मिरजोळी, कासनी (चिकोरी), पिंपळी, तोमर (बिया) इ. तसेच कापूर, सुंठ, तुरटी, मीठ, गेरू वगैरेंचाही विशेषतः दंतमंजनात उपयोग करतात.

पतकी, व. मं. ठाकूर अ. ना.

सौंदर्यप्रसाधने व त्यांच्या प्रक्रियांमधील विसाव्या शतकातील नवे शोध : सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती मनुष्याने त्वचेला तरुण ठेवून चिरतारुण्य प्राप्तीसाठी केली आहे. प्राचीन काळापासून मानव सातत्याने वृद्ध दिसण्याविरुद्ध प्रयोग करीत आला आहे.

सध्याच्या काळात त्वचेला तरुण ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांचे सातत्याने प्रयोग चालू आहेत. त्यासाठी मेडिकल व ब्युटी यांचा मिलाफ करून ‘कॉस्मॅस्युटीकल’ (सौंदर्य-औषधी) अशा सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती होत आहे. ‘कॉस्मॅस्युटीकल’ म्हणजे सौंदर्यप्रसाधने व औषधे यांचा मिलाफ करून तयार केलेली उत्पाद द्रव्ये. त्वचेमधील प्रथिनांचे तंतू सुकल्यामुळे त्वचेला सुरकुत्या पडतात. त्वचा कोरडी होण्याची प्रक्रिया त्वचेतील बाष्प कमी झाल्यामुळे होते. हे बाष्प पकडून ठेवणे हा शास्त्रज्ञांसमोरील मोठा प्रश्न होता. त्वचेमध्ये क्षार अंतःक्षेपित केले तर बाष्पाचे प्रमाण व बाष्पधारण शक्ती वाढते. वनस्पती किंवा माती ह्यामधील क्षार हे सहजपणे त्वचेत अंतःक्षेपित केले जाऊ शकत नाहीत म्हणून फार मोठ्या प्रमाणावर (विशेषतः फ्रान्समध्ये) ‘मरीन टेक्नॉलॉजी ‘चा (सागरी तंत्रविद्येचा) अभ्यास होऊन समुद्रात वाढणाऱ्या सागरी शैवलांचा (सी वीड) अभ्यास केला गेला. त्यापासून बनविलेली अनेक प्रकारांची जेल व लोशन ही पाण्यातून त्वचेवर फासून त्वचेमध्ये क्षार व बाष्पधारण शक्ती वाढविण्याच्या प्रक्रिया करू लागल्यामुळे त्वचेचा तजेला फार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. असे असले तरी त्वचा वयाच्या ९० वर्षांपर्यंत सतेज राहू शकते त्यापेक्षा जास्त चिरतारुण्याची शक्यता नाही.

त्वचेमधील प्रथिनांचे तंतू कालांतराने (वय वाढल्याने) सुकून त्वचेवर बारीक व मोठ्या सुरकुत्या पडतात परंतु बाष्प स्थिरीकरणामुळे व अंतस्त्वचेत आर्द्रता वाढल्यामुळे त्यावर मर्यादा येतात. प्रथिनांच्या या तंतूंना ‘इलॅस्टीन व कॉलीजेन’ अशी नावे आहेत. पूर्वी ही प्रथिने प्राण्यांच्या शरीरातून काढली जात असत, परंतु आता ती माशांच्या शरीरातून काढली जातात. हा ‘वायो पदार्थ’ असल्याने तो मानवी त्वचेमध्ये शोषला जाऊ शकतो. तसेच सुकलेल्या प्रथिनांच्या तंतूंत त्याची मदत होऊन ते परत सरळ होतात आणि त्वचेवरील, डोळ्याजवळील, ओठ व कपाळ ह्यांवरील पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे त्वचेत दिसणारा वृद्धपणा कमी होतो.

अशाच प्रकारे शरीरातील चरबीचा उपयोग चेहऱ्याच्या मुख्य मोठ्या पडलेल्या सुरकुत्यांत ती अंतःक्षेपित करून व शोषून वृद्धत्व कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. मनुष्य, प्राणी किंवा समुद्रातील प्राणी (म्हणजे जे जीव जिवंत आहेत) यांच्या शरीरातील सूक्ष्म भागांचा वापर चिरतारुण्य प्राप्तीकरिता विसाव्या शतकात सुरू झाला.

ह्या संशोधनातील सगळ्यात मोठा शोध म्हणजे स्कंधकोशिकांचा (स्टेम सेल) शोध, त्यांची निर्मिती आणि त्यांचा उपयोग. त्यांचा वापर करून शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत नवी त्वचा बनविण्यापर्यंत यशस्वी झाले आहेत. स्कंधकोशिकांच्या सीरम (लस) व जेल ह्यांचा वापर नवजीवन आणि कायाकल्प ह्या प्रमुख कारणांसाठी केला जातो. अगदी ६० वर्षांच्या स्त्रीची बऱ्याच सुरकुत्या असलेली त्वचाही काही काळ स्कंधकोशिका उपचार पद्धती केल्यास जवळजवळ २० वर्षांपूर्वीसारखी तरुण दिसू लागते.

स्कंधकोशिका उपचार पद्धतीमुळे संपूर्ण टक्कल पडलेल्या पुरुषांतही मृत झालेल्या कोशिका पुनरुज्जीवित होऊन नवीन केस येऊ लागतात. चमत्कारावत बदल करण्याची क्षमता असणाऱ्या जैव पदार्थांची निर्मिती ही एकविसाव्या शतकातील सौंदर्यप्रसाधनांत फारच मोठी क्रांती करीत आहे.[ ⟶ स्कंधकोशिका].

परांजपे, माया


 औषधी वनस्पतिजन्य (हर्बल) सौंदर्यप्रसाधने : वनस्पतिजन्य सौंदर्यप्रसाधनांना ‘नैसर्गिक (प्राकृतिक) सौंदर्य-औषधी’ असे देखील म्हणतात. प्राचीन काळी लोकांकडे सौंदर्यवर्धक क्रीमे किंवा प्रगत प्रतिरोपण शल्यक्रिया नव्हती. त्यांच्याकडे मात्र निसर्गाचे ज्ञान होते, जे भारतात आयुर्वेदात एकत्रित केले आहे. आयुर्वेदाच्या विज्ञानातून अनेक औषधी वनस्पतींचा वापर करून नैसर्गिक सौंदर्य-औषधी बनविण्यात आल्या, ज्या खूपच परिणामकारक आहेत. या प्रसाधनांमुळे त्वचा केवळ सुंदरच बनत नाही, तर बाह्य हानिकारक घटकांपासून तिचे संरक्षण देखील होते. त्यांचे मूल्य अथवा ग्राहकता आजच्या काळात देखील तेवढीच आहे. आज मोठ्या प्रमाणावर दैनंदिन वापरासाठी या सौंदर्य-औषधींचे उत्पादन केले जात आहे. कारण कार्बनी सौंदर्यप्रसाधनांच्या वापर आणि निर्मितीमुळे होणारे अनेक घातक परिणाम लक्षात आले आहेत. त्याउलट औषधी वनस्पतींपासून बनलेल्या प्रसाधनांचे कोणतेही घातक परिणाम नाहीत. उलट पोषक तत्त्वे व उपयुक्त क्षारांनी शरीर समृद्ध होते. मुखधावन द्रव, अनुकूलक (कंडिशनर), साबण, केशधावन द्राव आणि इतर अनेक सौंदर्य-औषधी उत्पादने पसंत केली जातात.

पुढील कोष्टकात प्रमुख औषधी वनस्पती व त्यांचा सौंदर्य-औषधी प्रसाधनांत असलेला उपयोग दिलेला आहे. 

औषधी

वनस्पती

शास्त्रीय

नाव

वापरण्यात येणारा भाग

सौंदर्य-औषधी

प्रसाधनांतील उपयोग

आवळा

एंब्लिका ऑफिसिनॅलिस

फळ

केस काळे करणे, केश तेले.

ओट

ॲव्हेना सटायव्हा

फळ

आर्द्रताकारक, त्वचावर्धक.

कडू निंब

ॲझॅडिराक्टा इंडिका

पान

पूतिरोधक, काळे डाग दूर करणे, त्वचारोग, दातदुखी, सूक्ष्मजंतू

प्रतिरोधक.

करंज

पाँगॅमिया ग्लॅब्रा (पाँ. पिनॅटा)

बी

त्वचा विकारांसाठी

कासनी

सिकोरियम इंटीबस

बी

त्वचेवरील डाग दूर करणे.

केसरी

बिक्सा ऑरेलॅना

बी

नैसर्गिक लाल व नारिंगी रंग.

कोरफड

ॲलो वेरा

पान

आर्द्रताकारक, सूर्यदाहप्रतिबंधक.

कोष्ट कोळिंजन

आल्पिनिया गॅलंगा

मूलक्षोड

सुगंधी पावडर.

खोबरे

कोकॉस न्यूसिफेरा

फळ

आर्द्रताकारक, केशवर्धक

गहू ( गव्हांकूर )

ट्रिटिकम प्रजाती

अंकुर

ई जीवनसत्त्व स्रोत.

गाजर

डॉकस कॅरोटा

बी

अ जीवनसत्त्व स्रोत, क्रीमे.

गुलाब

रोझा सेंटिफोलिया

फूल

शीतकारक, शीणहारक

गोवर्धन

यूफोर्बिया हिर्टा

संपूर्ण वनस्पती

त्वचारोग, तडकलेले ओठ.

चंदन

सँटॅलम आल्बम

लाकूड

शीतकारक.

जंबुरी

सिट्रस लिमॉन (सि. मेडिका)

फळाची साल

केसगळ थांबविणे.

ज्येष्ठमध

ग्लिसिर्हायझा ग्लॅब्रा

मूळ

शोथप्रतिरोधक, स्वादकारक.

झेंडू

कॅलेन्ड्यूला ऑफिसिनॅलीस (टॅजेटस इरेक्टा )

फूल

त्वचारोग, शोथप्रतिरोधक,  पूतिरोधक क्रीमे.

तीळ

सिसॅमम इंडिकम

बी

केशवर्धक, केसगळ  थांबविणे.

तुळस

ऑसिमम सँक्टम

संपूर्ण क्षुप

सूक्ष्मजंतू प्रतिरोधक, काळे  डाग कमी करणे.

देवदार

सिड्रस देवदार (क्युप्रेसस टोरुलोजा )

लाकूड

साबण, केशधावन.

नागचाफा

मेसुआ फेरीया

फूल

स्तंभक.

नागरमोथा (लव्हाळा )

सायपेरस रोटुंडस

मूळ

स्तंभक, त्वचा रापविणे.

पतंग

सिसॅल्पिनिया सॅप्पन

लाकूड

नैसर्गिक लाल व जांभळा रंग.

बाभूळ

ॲकॅशिया ॲरेबिका

साल

दातांच्या विकारांसाठी.

बीट

बीटा व्हल्गॅरिस

मूळ

नैसर्गिक लाल रंग.

बेहडा

टर्मिनॅलिया बेलिरिका

फळ

केशवर्धक, केस करडे होणे.

बोर

झिझिफस जुजुबा

फळ

त्वचा निगा.

ब्राह्मी

सेंटेला एशियाटिका

संपूर्ण क्षुप

केसांची वाढ, केशधावने, केश तेले.

मंजिष्ठा

रुबिया कॉर्डिफोलिया

मूळ

जखमा बऱ्या करणे, त्वचेवरील डाग कमी करणे.

माका

एक्लिप्टा आल्बा

संपूर्ण वनस्पती

केसांची वाढ, केशधावने,  केश तेले.

मेंदी

लॉसोनिया आल्बा

पान

केसांची वाढ, नैसर्गिक अनुकूलक, नैसर्गिक रंजक.

लवंग

सायझिजियम ॲरोमॅटिकम

कलिका

दातदुखी, पूतिरोधक.

लसूण

ॲलियम सटायव्हम

कंद

त्वचावर्धक, सूक्ष्मजंतू प्रतिरोधक.

वज्रदंती

बार्लेरिया प्रिओनिटिस

संपूर्ण क्षुप

दात बळकट करणे, दातदुखी.

वेखंड

ॲकॉरस कॅलॅमस

मूलक्षोड

त्वचाधावन द्रव, सुगंधी पावडर.

शिकेकाई

ॲकॅशिया कॉन्सिन्ना

शिंबा

केस स्वच्छताकारक, केसकोंडा  रोधक.

संत्रे

सिट्रस ऑरँटियम

फळाची साल

त्वचा क्रीमे, मुरूमरोधक, सूक्ष्मजंतू प्रतिरोधक, शांपू, साबण.

हळद

करकुमा लाँगा

मूलक्षोड

सूक्ष्मजंतुरोधी, सूक्ष्मजीवरोधी,  त्वचा क्रीमे, नैसर्गिक पिवळा व नारिंगी रंग.

हिरडा

टर्मिनॅलिया चेब्युला

फळ

स्तंभक.

वाघ, नितिन भरत

पहा : औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम कुंकू केस कोलोन वॉटर चेहरा बाष्पनशील तेले रंजक व रंजक द्रव्ये वनस्पति, औषधी रासायनिक उद्योग सुवासिक द्रव्ये सौंदर्यसाधना.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part II, Delhi, 1951.

         2. Gediya, Shweta K. Mistry, Rajan B. Patel, Urvashi Blessy, M. Jain, Hitesh N., Herbal Plants : Used as a Cosmetics ‘Journal of Nature Products’ Plant Resource, 1(1), 2011.

         3. Keither, W. R. The Foundation of Cosmetics and Specialities, New York, 1956.

         4. Myddleton, W. W. Principles and Practice of Modern Cosmetics, New York, 1963.

         5. Navarre, M. G. de, The Chemistry and Manufacture of Cosmetics, Vol. 1 and 2, Princeton, N. J., 1962.

         6. Navarre, M. G. de, International Encyclopedia of Cosmetic Material Trade Names, Princeton, N. J., 1957.

         7. Pandey, Shivanand Meshya, Nilam Viral. D. ‘Herbs Play an Important Role in the Field of Cosmetics’, International Journal of Pharm Tech. Research, Vol. 2, CODEN ( USA ) JanMarch, 2010.

         8. Patkar, Kunda B. ‘Herbal Cosmetics in Ancient India’, Indian Journal of Plastic Surgery Supplement, Vol. 41, 2008.

         9. Ramasamy, Ilangovan ‘Herbs for Beauty Care’, Solem, N. H., U. S. A., 2012.

       10. Sagarin, E., Ed., Cosmetics – Science and Teachnology, New York, 1957.