सोयराबाई -१ : (इ. स. सुमारे चौदावे शतक). संत-कवयित्री. प्रसिद्ध विठ्ठलभक्त संत ⇨ चोखामेळा यांच्या धर्मपत्नी. त्यांच्या काही अभंगांमध्ये ‘चोख्याची महारी’, ‘सोयरा’ असाही स्वतःचा उल्लेख त्या करतात. त्यांचा मुलगा कर्ममेळा हाही विठ्ठलभक्त होता. सोयराबाई आपला संसार सुखाने नीटनेटका सांभाळीत होत्या. पतिसेवेत त्या अतिशय दक्ष असत. शिवाय त्या अत्यंत पारमार्थिक वृत्तीच्या होत्या.

सोयराबाई यांचे ६२ अभंग श्रीसकलसंतगाथेमध्ये (खंड १) मुद्रित झाले आहेत. त्यांतील पुष्कळ अभंगांतून तिच्या मनातील सामाजिक व्यथा उमटली आहे. ‘येई येई गरुडध्वजा । विटेसहित करीन पूजा ।’ हा त्यांचा एक विशेष ख्याती पावलेला अभंग. विठ्ठलभेटीसाठी आतुरझालेली त्यांची मनःस्थिती त्यांच्या ‘उदारा पंढरिराया नको अंत पाहू । कोठवरि मी पाहू वाट तुझी ।’ या एका अभंगातून व्यक्त झाली आहे तर दुसऱ्या एका अभंगातून विठ्ठलदर्शनाने झालेला आनंद व्यक्त करताना आपल्या संतृप्त, आनंदमयी भावस्थितीचा आविष्कार ‘अनंता जन्मांचे फिटले साकडें । कोंदाटले पुढे रूप त्याचें ।’ असे म्हणून ‘आनंद न समाये मनाचे अंतरी ।’ असा घडविला आहे. सोयराबाईंनी नाममाहात्म्याची थोरवीही आपल्या अभंगांतून सांगितली. उदा., ‘नामापरते सार नाही हो निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ।’ हा त्यांचा एक अभंग. त्यांची वाणी उत्कट, स्पष्ट आहे. सोयराबाईंनी देहाचा विटाळ मानणाऱ्या कर्मठांवर चोखामेळा यांच्याप्रमाणेच अत्यंत कठोर टीका केली आहे. चोखामेळा यांची बहीण निर्मळा यांचे उल्लेखही त्यांच्या अभंगांतून येतात.

‘चोखा मेळविला रूपी । आता माझी कोण गती ।’ हा अभंग, तसेच चोखामेळा यांच्या समाधीच्या आनंदसोहळ्याचे वर्णन करणारा अभंग यांवरून, चोखामेळा यांचा मृत्यू सोयराबाईंच्या आधी झाला, असे अनुमान काढले जाते.

पोळ, मनीषा