सोमाली प्रजासत्ताक : (सोमालिया). आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागातील एक देश. आफ्रिकेच्या अगदी ईशान्य भागात असलेल्या शृंगाकृती भागावर या देशाचे स्थान आहे. सोमालीच्या उत्तरेस एडनचे आखात, पूर्वेस आणि दक्षिणेस हिंदी महासागर, पश्चिमेस केन्या, इथिओपिया आणि वायव्येस जिबूती देश आहे. सोमालीची इथिओपियाशी असलेली सीमा वादग्रस्त आहे. या देशाला एडनच्या आखाताचा १,०४६ किमी. व हिंदी महासागराचा २,१७३ किमी. लांबीचा किनारा लाभला आहे. सोमालीचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १२° उ. ते १° ३९ʹ द. अक्षांश आणि ४१° ३०ʹ पू. ते ५१° पू. रेखांश यांदरम्यान आहे. याचा ईशान्य-नैर्ऋत्य विस्तार १,८४७ किमी. आणि आग्नेय-वायव्य विस्तार ८३५ किमी. आहे. क्षेत्रफळ ६,३७,६५७ चौ. किमी. लोकसंख्या १,००,८५,६३८ (२०१२ अंदाज). मॉगाडिशू हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : सोमालीचा बराचसा प्रदेश शुष्क व सॅव्हाना गवताळ मैदानी भूमीने व्यापलेला आहे. देशाच्या उत्तर भागात एडनच्या आखातास समांतर असा गूबान हा मैदानी प्रदेश आहे. हा प्रदेश निमओसाड, झुडुपांनी व्यापलेला आणि सामान्यपणे भुऱ्या रंगाचा दिसतो. येथे उष्ण व दमट हवामान, कमी पर्जन्य आणि विरळ वनस्पतिजीवन आढळते. गूबान प्रदेशाच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात ओबडधोबड पर्वतीय व उच्चभूमी प्रदेश असून त्याचा उत्तर भाग विच्छेदित, उभ्या व तुटलेल्या कड्यांचा आहे. गूबान मैदानाची उंची या प्रदेशाकडे वाढत जाते. या पर्वतीय प्रदेशाचा विस्तार वायव्येस इथिओपियाच्या सरहद्दीपासून पूर्वेस शृंगाच्या टोकापर्यंत झालेला आहे. याच रांगेत मौंट सुरड कॅड (उंची २,४०७ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतीय प्रदेशाच्या दक्षिणेस अधिक थंड व कोरडे असे हॉड पठार आहे. अगदी दक्षिण भागात सपाट मैदानी प्रदेश आहे. दक्षिणेकडील हिंदी महासागराच्या किनारवर्ती भागास बेनादीर असे म्हणतात. या किनाऱ्यास समांतर वाळूच्या टेकड्या असून त्यांच्या अडथळ्याने शेबेली नदी सरळ महासागरास न मिळता या टेकड्यांना समांतर दक्षिणेकडे सु. ३०० किमी. पर्यंत वाहत जाऊन पुढे ही नदी जूबा नदीला किनारवर्ती भागात येऊन मिळते. हा संयुक्त प्रवाह हिंदी महासागराला कीस्मायूच्या उत्तरेकडे जाऊन मिळतो. जूबा आणि शेबेली या देशातील प्रमुख नद्या आहेत. या दोनही नद्या इथिओपियामध्ये उगम पावतात.

देशाच्या उत्तर भागातील सरासरी तापमान ३०°-४०° से. तर दक्षिण भागात ते १८°-४०° से. यांदरम्यान असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २८ सेंमी. आहे. देशाचा दक्षिण भाग सर्वांत आर्द्र असूनही तेथील पर्जन्यमान क्वचितच ५० सेंमी.पेक्षा अधिक असते. उत्तर भागात ते फक्त ५-८ सेंमी. इतके कमी असते. पाऊस प्रामुख्याने मार्च ते मे आणि सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत पडतो. वारंवार अवर्षणाची स्थिती असते.

या देशाचा दक्षिणेकडील जंगलविभाग अत्यंत विरळ स्वरूपाचा असून उत्तरेकडील पठारीभागात मुख्यत्वे स्टेप प्रकारचे गवताळ भाग, काटेरी झुडुपे तसेच तृणखरगे (पॅचेस) आढळतात. देशाचे निम्म्यापेक्षा अधिक भूक्षेत्र गवताळ प्रदेशाखाली आहे. उंचवट्याच्या प्रदेशात काही प्रमाणात वने आढळतात. शुष्क प्रदेशात बाभूळ, कोरफड, गोरखचिंच, सालई, कँडलाब्र हे वृक्ष तर नद्यांच्या खोऱ्यात कच्छ वनश्री व कॅपोक वृक्ष आढळतात. सिंह, हत्ती, तरस, कोल्हा, चित्ता, जिराफ, झेब्रा, हरिण, हिप्पो, मगरी इ. प्राणी येथे आढळतात.

इतिहास व राजकीय स्थिती : भूमध्य सागरी किनाऱ्यालगतचे प्रदेश आणि पूर्वेकडील देश यांदरम्यानच्या प्राचीन व्यापारी मार्गावर सोमालीचे स्थान असल्यामुळे पूर्वीपासून हा प्रदेश प्रसिद्ध आहे. सोमालीचे मूळ रहिवासी म्हणजे पूर्वीची ‘बुशमन’ ही भटकी जमात किंवा त्यांच्याशी साधर्म्य असणारे लोक होत. येथील लोकांत प्रामुख्याने कॉकेशियन वंशाचे गुणधर्म आढळत असून त्यात निग्रो वंशियांचे मिश्रण झालेले दिसून येते. याशिवाय येथे सोमाली गाला व अफार (दानाकिल) या प्रमुख भटक्या जमातीचे गट आहेत. हा प्रदेश पूर्वी सुगंधी वनस्पती व गुलामांसाठी प्रसिद्ध होता. या प्रदेशालाच ईजिप्शियनांनी पूंट असे नाव दिले. प्राचीन ईजिप्शियन लेखनात उल्लेख असलेला पूंट म्हणजे सोमालीच्या उत्तर व पूर्व किनाऱ्याचा प्रदेश असावा. इ. स. सातव्या ते दहाव्या शतकांत आलेल्या मुस्लिम, अरब व पर्शियन लोकांनी एडनचे आखात व हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर व्यापारी ठाणी स्थापन केली. दहाव्या शतकात गल्फच्या आखाताचा अंतर्गत किनारी प्रदेश सोमाली जमातींनी तर दक्षिण व पश्चिम भाग वेगवेगळ्या भटक्या पशुपालक टोळ्यांनी आणि जमातींनी व्यापला होता. इ. स. ११०० पर्यंत येथील बहुतांश लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर झाले होते.

ब्रिटिशांनी इ. स. १८३९ मध्ये एडनचा ताबा मिळविला. तेव्हापासून यूरोपीयांचे या प्रदेशातील सखोल समन्वेषण सुरू झाले. ब्रिटिशांनी १८८४ मध्ये सोमालीच्या उत्तर भागात ‘ब्रिटिश सोमालीलँड’ नावाने रक्षित राज्य स्थापन केले. इटलीने सोमालीच्या ईशान्य कोपऱ्यातील दोन रक्षित राज्ये आपल्या ताब्यात घेतली (१८८९). तसेच दक्षिण भागातील दोन वसाहतींची जबाबदारी स्वीकारली (१९०५). इटालियन फौजांनी १८८०-९० च्या दशकांत हिंदी महासागर किनाऱ्याचा बराचसा प्रदेश काबीज केला. हळूहळू अंतर्गत भागातील इथिओपियाकडे प्रवेश करून या सर्व भागात आपली ‘इटालियन सोमालीलँड’ ही वसाहत स्थापन केली. १९००-१०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात सईद मुहम्मद अब्दीली हसन याच्या नेतृत्वाखाली सोमालियन राष्ट्रवादींनी ब्रिटिश, इटालियन व इथिओपियाच्या विरोधात मुस्लिम संघटना उभी केली. इटलीने सोमालीलँडहून इथिओपियावर आक्रमण केले (१९३५). इथिओपिया काबीज केल्यानंतर (१९३६) इटालियन सोमालीलँड हा प्रदेश इटालियन पूर्व आफ्रिकी साम्राज्याचा एक भाग बनला. त्याची राजधानी अदिस अबाबा (इथिओपिया) येथे ठेवण्यात आली. ब्रिटिश आणि इटली या राष्ट्रांप्रमाणेच फ्रेंचांनीदेखील इ. स. १८६२ मध्ये बाब-एल्-मांदेब या बंदरावर ताबा मिळविला आणि हळूहळू आपले क्षेत्र विस्तारले. म्हणजेच सोमाली सुरुवातीला ब्रिटन, इटली व फ्रान्स यांत विभागलेला होता परंतु इटली व ब्रिटन यांनी इ. स. १९६० मध्ये सोमाली प्रजासत्ताक स्वतंत्र केले. फ्रेंचांच्या ताब्यातील सोमाली मात्र एका वसाहतीपुरताच मर्यादित राहिला.

फ्रेंच सोमाली प्रदेश म्हणजे तांबडा समुद्र व एडनचे आखात यांच्या टोकाजवळील भूभाग होय. याचा विस्तार साधारणपणे २३,५०० चौ. किमी. आहे. इ. स. १९६० मध्ये हा फ्रेंच सोमाली व पुढे फ्रेंच आफार्झ अँड ईसाझ म्हणून निर्माण झाला. हा प्रदेश इ. स. १९७७ मध्ये ‘जिबूती’ या नावे स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला.


 दुसऱ्या महायुद्धकाळात इटालियन सैन्याने ब्रिटिश सोमालीलँडवर आक्रमण करून त्या प्रदेशाचा ताबा घेतला (१९४०) परंतु १९४१ मध्ये दक्षिण आफ्रिकी व भारतीय लष्कराच्या मदतीने ब्रिटिशांनी तो प्रदेश परत मिळविला. त्यानंतर ब्रिटिश व इटालियन सोमालीलँड या संपूर्ण प्रदेशावर ब्रिटिश लष्कराची सत्ता राहिली. इथिओपियाने १९४८ मध्ये सोमालींचे आधिक्य असलेला आपला ओगाडेन प्रदेश परत मिळविला. १९५० च्या दशकात इटालियन सोमालीलँड हा इटालियन प्रशासनांतर्गत संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश राहिला. १ जुलै १९६० रोजी ब्रिटिश व इटालियन सोमालीलँड या दोन्हींचा मिळून स्वतंत्र सोमाली प्रजासत्ताक देश अस्तित्वात आला. कॅब्दीरशीद कॅली शेरमार्के हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, तर मॅक्झामेड झाजी इब्राहिम सिगल हे पंतप्रधान झाले (१९६७). शेरमार्के यांची १९६९ मध्ये हत्या झाली. मेजर जनरल मोहम्मद सईद बॅरी याच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या लष्करी उठावात सिगल यांची सत्ता जाऊन तेथे लष्करी सत्ता आली (२१ ऑक्टोबर १९६९). सईद याने लष्करी अधिकाऱ्यांचा अंतर्भाव असलेल्या ‘सुप्रीम रेव्हलूशनरी काउन्सिल ‘द्वारा संसदीय राजवट बाजूला सारून ‘सोमाली डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ‘ची स्थापना केली. १९७० च्या मध्यास तीव्र अवर्षणाची स्थिती निर्माण होऊन त्यात असंख्य जनावरे मृत्युमुखी पडली व दोन लाखांपेक्षा अधिक सोमालींना तात्पुरत्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले. त्याचवेळी सोमालीचे सोव्हिएट युनियनशी दृढ संबंध प्रस्थापित झाले.

सोमालीने इथिओपियातील ओगाडेन प्रदेशावर आक्रमण करून हा प्रदेश सोमालीला जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला (१९७७-७८). सोव्हिएट युनियनने तातडीने इथिओपियाला मदत केल्यामुळे सोमालीच्या लष्कराला माघार घ्यावी लागली. तरीही सोमाली बंडखोरांनी इथिओपियातील दबाव कायम ठेवला. ओगाडेन प्रदेशातील हजारो निर्वासितांनी इथिओपियाच्या सरहद्दीजवळ आपल्या छावण्या टाकल्या. १९८८ मध्ये अनेक बंडखोर गटांनी सोमाली शासन उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. याचवर्षी इथिओपिया व सोमाली यांदरम्यान शांतता करार होऊन संघर्ष संपुष्टात आला. युनायटेड सोमाली काँग्रेस (यू.एस्.सी.) या बंडखोरांच्या गटाने सय्यदची लष्करी राजवट उलथवून टाकली आणि राजधानी व तिच्या सभोवतालच्या प्रदेशाचा ताबा घेतला (१९९१). या वर्षाच्या अखेरीस मॉगाडिशू नगर व त्याच्या परिसरात यूएस्सीच्या प्रतिस्पर्धी गटांत अचानक तीव्र संघर्ष सुरू झाला. त्यामुळे देशाचे अनेक प्रादेशिक तुकडे पडले. १९९२ मध्ये तीव्र दुष्काळ पडला होता. त्यावेळी बहुराष्ट्रीय फौजा खाद्यपुरवठा करण्यासाठी देशात आल्या होत्या (डिसेंबर १९९२). १९९५ मध्ये अचानक झालेल्या तीव्र हल्ल्यामुळे येथील परकीय फौजा निघून गेल्या.

उत्तर भागात कार्यरत असणाऱ्या ‘सोमाली नॅशनल मूव्हमेंट’ या प्रमुख बंडखोर गटाने १७ मे १९९१ रोजी देशातून फुटून निघून स्वतंत्र ‘सोमालीलँड रिपब्लिक’ ची घोषणा केली. परंतु सोमालियन शासनाने त्याला मान्यता दिली नाही. १८८४-१९६० या कालावधीत हा प्रदेश ब्रिटिश रक्षित राज्य होते. या सोमालीलँडचे क्षेत्रफळ सु. १,३७,६०० चौ. किमी. व लोकसंख्या सु. ३·५ द. ल. असून हारगेसा हे राजधानीचे ठिकाण होते. सोमाली ही येथील अधिकृत भाषा असून सोमालीलँड शिलिंग हे चलन आहे. बँक ऑफ सोमालीलँड ही मध्यवर्ती बँक होती (१९९४). मुहम्मद आइदीद याच्या फौजांनी या प्रजासत्ताकाचा ताबा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला (जानेवारी १९९६). त्याची हत्या झाल्यावर (जुलै १९९६) त्याचा मुलगा हुसेन आइदीद सत्तेवर आला.

अब्दुल्लाही यूसूफ याच्या नेतृत्त्वाखाली सोमालीच्या ईशान्य भागातील नेत्यांनी जुलै १९९८ मध्ये पूंतालँड नावाच्या स्वायत्त राज्याची घोषणा केली. परंतु या राज्याला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. पूंतालँडचे क्षेत्रफळ सु. ३,००,००० चौ. किमी. व लोकसंख्या सु. २ द. ल. होती (२००२). गारोवे ही याची राजधानी आहे. सोमाली ही अधिकृत भाषा असून सोमाली शिलिंग हे अधिकृत चलन आहे. एप्रिल २००२ मध्ये ‘रहनवेन रिझिस्टन्स आर्मी’ ने मॉगाडिशूमधून फुटून ‘साऊथवेस्टर्न सोमालिया’ या तिसऱ्या स्वायत्त सोमाली राज्याची घोषणा केली. इस्लामिक कोर्टस युनियन या इस्लामिक लोकसेनेने जून २००६ मध्ये राजधानी मॉगाडिशूचा तसेच दक्षिण सोमालीच्या बऱ्याचशा प्रदेशावर ताबा मिळविला. सोमाली शासनाने डिसेंबर २००६ मध्ये इथिओपियन लष्कराच्या मदतीने हल्ला करून मॉगाडिशूचा ताबा घेतला. इस्लामी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिणेकडील किस्मायू या शहराचा शासनाने पुन्हा जानेवारी २००७ मध्ये ताबा मिळविला.

सोमाली प्रजासत्ताक या नावाने हा देश स्वतंत्र झाला असला (१९६०) तरी हे नावालाच प्रजासत्ताक राष्ट्र राहिले आहे. देशाच्या १९७९ च्या संविधानानुसार कार्यकारी अधिकार राष्ट्राध्यक्ष व विधानसभेकडे होते. या संविधानानुसार सोमाली रेव्हलूशनरी सोशालिस्ट पार्टी हा एकमेव अधिकृत पक्ष होता. या संविधानात १९८४ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. १९९१ मध्ये केंद्र सरकार कोसळून शासन स्थानिक टोळीवाल्या नेत्यांच्या ताब्यात राहिले. त्यानंतर देशातील संघर्ष व अस्थिरता कमी करून देशात स्थिर शासन व शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न एकविसाव्या शतकातही निष्फळच ठरले आहेत. ऑगस्ट २००४ मध्ये ‘ट्रॅन्झिशनल फेडरल पार्लमेंट ‘ची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये २७५ सदस्य असून त्यांची निवड प्रामुख्याने वेगवेगळ्या टोळ्यांच्या नेत्यांकडून केली जाते. मंत्रिमंडळात २५ सदस्य असतात ते सुद्धा वेगवेगळ्या टोळ्यांचे प्रतिनिधी असतात. सोमालीत स्थिर व लोकशाही शासन अभावानेच राहिले आहे. येथील न्यायव्यवस्था इस्लामिक कायद्यांवर आधारित आहे.

कार्यक्षम व स्थिर केंद्र शासनाचा अभाव, अराजक, प्रचंड बेकारी इत्यादींमुळे अनेक सोमालियन चाचेगिरीत गुंतले आहेत. सोमालियन चाचे जगात कुप्रसिद्ध असून सोमाली हे चाचेगिरीचे प्रमुख केंद्र बनले आहे. हे चाचे हिंदी महासागर व एडनच्या आखातातून वाहतूक करणारी तेल व मालवाहू जहाजे तसेच नागरी वाहतूक करणाऱ्या जहाजांचे अपहरण करून ती ओलीस ठेवून मालाची व वस्तूंची लूट करतात किंवा बदल्यात खंडणी वसूल करतात. सोमालींच्या या चाचेगिरीला आळा घालण्यासाठी व अपहरण केलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी अनेक देशांनी सोमालीलगतच्या सागरी प्रदेशात आपली नाविक गस्त वाढविली आहे.

आर्थिक स्थिती : सोमाली जगातील सर्वांत गरीब व अविकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी एक आहे. आर्थिक संसाधने मर्यादित आहेत. बरीचशी भूमी केवळ पशुपालनासाठीच उपयुक्त आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पशुपालन व कृषी व्यवसायावर आधारित आहे. देशाच्या दक्षिण भागातून वाहणाऱ्या जूबा व शेबेली या नद्यांचाच शेती व पशुपालनासाठी उपयोग होतो. एकूण देशांतर्गत उत्पादन व दरडोई उत्पादन फारच कमी आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनापैकी सु. ६०% कृषी व पशुपालन व्यवसायातून, ३३% सेवा व्यवसायांतून आणि ७% उद्योगांतून मिळते (२०११). १९९० च्या दशकातील नागरी युद्धा-पासून देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने खालावली. लाचलुचपतविरोधी संघटनेने २००८ मध्ये केलेल्या पाहणीनुसार सोमाली हा जगातील सर्वाधिक भ्रष्टाचारी देश असल्याचे आढळले.


 मोहम्मद सईद बॅरी याच्या लष्करी राजवटीने १९७० च्या दशकात देशात राजकीय समाजवाद अंमलात आणला. १९८० च्या दशकात देशाच्या निर्यातीत आणि वस्तुनिर्मितीत वेगाने घट झाली. पशुधन निर्यातीपासून सोमालीला ८०% परदेशी चलन मिळत असे परंतु १९८३ मध्ये सौदी अरेबियाने सोमालीकडून केल्या जाणाऱ्या आयातीवर निर्बंध घातले. आंतरराष्ट्रीय चलन निधीने खाजगीकरणासाठी व अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी १९८७ मध्ये एक पंचवार्षिक योजना ठरविली. १९८८ मध्ये सुरू झालेल्या नागरी युद्धात देशाची अर्थव्यवस्था, प्रशासन आणि बँक प्रणाली पूर्णपणे कोसळली. १९९० च्या दशकात परदेशातील सोमाली लोकांकडून येणाऱ्या आर्थिक मदतीवरच येथील सोमालियन अवलंबून होते. अशी मदत वर्षाला सु. ८०० द. ल. अमेरिकी डॉलर येत होती.

सोमालीच्या वसाहतकाळात इटालियन वसाहतकऱ्यानी जूबा व शेबेली नद्यांच्या खोऱ्यात केळीच्या मळ्यांची लागवड केली. सुमारे १·०५ द. ल. हेक्टर क्षेत्र मशागत योग्य, सु. २६,००० हे. क्षेत्र कायम पिकांखाली व सु. २,००,००० हे. क्षेत्र जलसिंचनाखाली होते (२००२). प्रमुख कृषी उत्पादने पुढीलप्रमाणे झाली होती (उत्पादन हजार टनांत) : ऊस २०० (अंदाजे), मका ९९, ज्वारी ८०, कसाव्हा ८२, केळी ३८, तीळ ३० (२००८). देशातील सु. ८०% लोक पशुपालक असून त्यांपैकी निम्मे भटके पशुपालक आहेत. पशुधनामध्ये १३·१ द. ल. मेंढ्या, १२·७ द. ल. शेळ्या, ७ द. ल. उंट व ५·१ द. ल. गुरे होती (२००३). जगातील सर्वाधिक उंट येथे आहेत. मासेमारीत येथील फारच कमी लोक गुंतले असून ती मुख्यत: उत्तर किनाऱ्यावर केली जाते. मत्स्योत्पादन सु. ३०,००० टन झाले होते. (२००५). देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ११·४% क्षेत्र अरण्याखाली होते (२००५). लाकडी ओंडक्यांचे उत्पादन १०·२५ द. ल. घमी. झाले होते (२००३). लाकूड व लोणारी कोळसा ही प्रमुख ऊर्जा साधने आहेत. धूप व हिराबोळ ही प्रमुख उत्पादने होत.

देशात काही मोजकेच कारखाने आहेत. त्यांत साखर उद्योग, अन्न प्रक्रिया, मांस व मत्स्य प्रक्रिया, चामडी उत्पादन, वस्त्रनिर्मिती हे महत्त्वाचे उद्योग आहेत. क्रोमियम, दगडी कोळसा, तांबे, सोने, जिप्सम, शिसे, चुनखडक, मँगॅनीज, निकेल, सेपीओलाइट, चांदी, टिटॅनियम, टंगस्टन, युरेनियम, जस्त, नैसर्गिक वायू या खनिजांचे साठे येथे आहेत. विद्युत्शक्तीचे उत्पादन सु. ३१५ किवॉ. तास झाले (२००९) असून ती प्रामुख्याने औष्णिक वीज आहे.

देशाचे आयात मूल्य सु. १·२६३ बि. व निर्यात मूल्य सु. ५१५·८ मि. अमेरिकी डॉलर होते (२०११). निर्मिती वस्तू, खनिज तेल, खाद्यपदार्थ यांची आयात तर पशुधन, कातडी व चामडी, केळी यांची निर्यात केली जाते. जिबूती, केन्या, ब्राझील, संयुक्त अरब अमिरात, येमेन, ओमान, चीन, इटली या देशांशी आयात-निर्यात व्यापार चालतो.

सोमाली शिलिंग (एस्ओएस्) हे अधिकृत चलन असून १०० सेंटचा १ शिलिंग होतो. सेंट्रल बँक ऑफ सोमालिया ही मध्यवर्ती बँक चलन निर्गमीत करते. बँक ऑफ सोमालीलँड प्रजासत्ताकाची हारगेसा येथे स्वतंत्र मध्यवर्ती बँक आहे. सर्व राष्ट्रीय बँका १९९० मध्ये दिवाळखोरीत निघाल्या. सोमालीमध्ये लोहमार्ग नाहीत. रस्त्यांची एकूण लांबी २२,१०० किमी. असून त्यांपैकी २,६०० किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. प्रवासी गाड्या १२,७०० आणि ट्रक व प्रवासी बसेस १०,४०० होत्या (२००२). किस्मायू, बर्बरा, मार्का व मॉगाडिशू ही खोल सागरी बंदरे आहेत. मॉगाडिशू व हारगेसा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. १९९१ मधील संघर्षात दूरचित्रवाणी केंद्राची हानी झाली तेव्हापासून येथे राष्ट्रीय कार्यक्रमाचे प्रसारक नाहीत. रेडिओ हे संदेशवहनाचे प्रमुख साधन आहे. येथे सहा दैनिक वृत्तपत्रे होती (२००५).

लोक व समाजजीवन : सोमालीमधील दोन तृतीयांशपेक्षा अधिक लोक भटके किंवा निमभटके आहेत. कोरड्या ऋतूत या जमाती पाण्याची उपलब्धता असणाऱ्या खेड्यांजवळ गोळा होतात आणि जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा त्या आपल्या प्राण्यांसह वेगवेगळ्या प्रदेशांत विखुरल्या जातात. अलीकडच्या काळात ग्रामीण भागाकडून नगरांकडे मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरामुळे भटके पशुपालक आणि स्थायी शेतकरी ही परंपरागत सांस्कृतिक विभागणी कमी झाली आहे. देशात सोमाली लोकांचे आधिक्य आहे. इस्लाम हा अधिकृत धर्म असून बहुतांश सोमालियन इस्लाम धर्मीय (मुख्यत: सुन्नी मुस्लिम) आहेत. सोमाली ही संपूर्ण देशात बोलली जाणारी भाषा असून हाच एक देशाचा प्रबळ समान घटक आहे. त्याशिवाय अरेबिक, इंग्रजी व इटालियन या भाषाही बोलल्या जातात.

देशातील स्थायी वस्ती प्रामुख्याने दक्षिण भागातील जूबा आणि शेबेली नद्यांच्या खोऱ्यात केंद्रीत झाली आहे. शुष्क प्रदेशात लोकवस्ती विरळ असली, तरी दुसऱ्या महायुद्घकाळापासून या भागात नागरी लोकसंख्या वेगाने वाढली आहे मात्र येथील शहरे लहान आहेत. मॉगाडिशू ह्या राजधानी असलेल्या मोठ्या शहराची यादवी युद्धाच्या सुरुवातीच्या काळात फार मोठी हानी झाली होती.

भटक्या जमाती तसेच दुष्काळ आणि सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्वासितांचे होणारे स्थलांतर यांमुळे लोकसंख्येची गणना करणे बरेच गुंतागुंतीचे होते. १९७०-८० च्या दशकात युद्ध आणि अवर्षणामुळे इथिओपियातील ओगाडेन प्रदेशातून निर्वासितांचे प्रचंड लोंढे (सु. १ द. ल.) सोमालीत आले. १९९० च्या दशकातील आरंभीच्या काळात हिंसाचार, उपासमार, रोगराई, अवर्षण, दुष्काळ, यादवी युद्ध इ. आपत्तींमुळे हजारो सोमालियन लोक मृत्युमुखी पडले. तसेच सु. १ द. ल. निर्वासित म्हणून देश सोडून गेले. २००४ च्या अखेरीस सोमाली किनाऱ्याला त्सुनामीचा तडाखा बसून त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले व हजारो लोक स्थलांतरित झाले.

देशात दर हजारी जन्मदर ४२·१२ व मृत्युदर १४·५५ होता आणि बालमृत्युमान दर हजारी १०३·७२ होते (२०१२ अंदाज). येथील वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर १·५९% होता (२००२-१२). सरासरी आयुर्मान ५०·८ वर्षे होते. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १३ व्यक्ती अशी होती (२००५). एकूण लोकसंख्येपैकी ६३% लोक ग्रामीण भागात राहतात (२०१०). येथील लोकसंख्या वाढीचा वेग अधिक असून सरासरी प्रसूतिमान प्रति स्त्री ६·३ अपत्ये असा होता (२०१२).


भटक्या लोकसंख्येच्या आधिक्यामुळे शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे प्रौढ साक्षरतेचे प्रमाण फक्त ३७·८% होते (२००१ अंदाज). प्राथमिक शिक्षण सक्तीचे असले, तरी प्राथमिक शिक्षण घेण्याच्या वयोगटातील केवळ सु. एक पंचमांशपेक्षा कमी मुले प्राथमिक विद्यालयांत दाखल होतात. माध्यमिक शिक्षण सक्तीचे नाही. प्राथमिक विद्यालयांत १,९४,३३५ विद्यार्थी व ९,६७६ शिक्षक, माध्यमिक विद्यालयांत ३७,१८१ विद्यार्थी व २,३२० शिक्षक (१९८५) आणि शिक्षक व प्रशिक्षण केंद्रामध्ये ६१३ विद्यार्थी व ३० शिक्षक होते (१९८४). मॉगाडिशू येथे असलेल्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सोमालीमध्ये ४,६५० विद्यार्थी व ५५० अध्यापक होते (१९९४-९५). अलीकडच्या काळात संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने देशात भरीव शैक्षणिक प्रगती होत आहे.

देशातील सामाजिक व आरोग्यविषयक परिस्थिती हलाखीची आहे. प्रचंड अन्नटंचाईमुळे देशाच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर उपासमार आढळते. पटकी, गोवर, क्षयरोग व मलेरिया या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. नागरी युद्घकाळात देशातील आरोग्य व कल्याणकारी सुविधांची फार मोठी हानी झाल्यामुळे आरोग्यविषयक सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. न्यूनपोषित लोकसंख्या ७३% आहे. देशात २६५ डॉक्टर, १३ दंतवैद्यक, १,३२७ परिचारिका आणि ७० औषध निर्माते होते (१९९७).

मॉगाडिशू या राजधानीच्या ठिकाणाशिवाय येथे हारगेसा (१,२०,०००), किस्मायू (१,८३,०००), बर्बरा (२,३२,५००) व मार्का (२,३०,१००) ही प्रमुख नगरे आहेत (लोकसंख्या, २०११ अंदाज). सोमालियात काव्य महत्त्वाचे असून युद्घ, शांतता, स्त्रिया, घोडे व उंट हे काव्याचे प्रमुख विषय असतात. लोकनृत्य ही कला लोकप्रिय आहे. सॉकर, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस हे खेळ खेळले जातात. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांविषयीचे येथील मौखिक वाङ्मय समृद्घ आहे. हारगेसा म्यूझीयम व नॅशनल थिएटर ह्या देशातील प्रमुख सांस्कृतिक संस्था आहेत.

चौधरी, वसंत

सोमाली प्रजासत्ताक (सोमालिया)

राजधानी मॉगाडिशू : एक दृश्य यादवी युद्धात उद्ध्वस्त झालेल्या मॉगाडिशू शहराचे एक दृश्य.
सोमालिया विद्यापीठ, मॉगाडिशू. हारगेसा विमानतळ
 पारंपरिक वेशभूषेत सोमालियन स्त्रिया बूनधेरे : पारंपरिक सोमालियन नृत्यप्रकार.
बर्बरा बंदरातील उंटांच्या निर्यातीचे दृश्य मॉगाडिशू येथील प्रसिद्ध मशीद