स्वमग्नता : ( ऑटिझम ). मानवी चेतासंस्थेच्या विकास प्रक्रिये-मध्ये अवरोध उत्पन्न झाल्यामुळे विशिष्ट प्रकारचे विकार संभवतात. त्यांना एकत्रितपणे ‘स्वमग्नता वर्णपट विकार ’ ( ऑटिझम स्पेट्रम डिस्ऑर्डर्स ) असे संबोधन आहे. ‘स्वमग्नता’ हा ह्या गटातील एक आजार आहे. ह्या आजाराने बाधित व्यक्तींच्या मेंदूमध्ये संवेदनांचे एकत्रीकरण करणे, अर्थ लावणे व त्यांनुसार प्रतिक्रिया देणे ही कामे सुरळीतपणे होत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींच्या बाबतींत,सूत्ररूपाने सांगायचे, तर पुढील तीन वैशिष्ट्ये आढळतात : (१) सामाजिक आंतरक्रियेची (इंटरॲशन) अक्षमता. म्हणजेच मानवी संबंधांच्या प्रस्थापनेत अडथळे. (२) सामाजिक संप्रेषण अक्षमता. म्हणजेच वाचिक किंवा अन्य प्रकारे संवाद साधण्याच्या क्षमतेचा अपुरा विकास. (३) वैविध्य आणि कल्पनाशक्तीचा अभाव असलेले आवर्ती वर्तन. या वैशिष्ट्यांपोटी स्वमग्नता विकारग्रस्त मुलांमध्ये आढळणारी काही लक्षणे अशी : सामाजिक आंतरक्रिया अक्षमतेमुळे ही मुले समाजापासून अलिप्त असतात. मानवी नातेसंबंध निर्माण करण्यात त्यांना अपयश येते. दुसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाचीही त्यांना जाणीव नसते. इतरांच्या नजरेला ती नजर देत नाहीत. एक शिष्टाचार म्हणूनही इतरांकडे पाहून ती स्मित करीत नाहीत. इतकेच काय, पण त्यांना नावाने हाक मारली, तरी ती प्रतिसाद देत नाहीत. ह्याचा एक परिणाम म्हणजे मानवी नातेसंबंधांतून त्यांना भावनिक साहाय्य किंवा आधार मिळवता येत नाही.

ही मुले इतर व्यक्तींचे अनुकरण करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना भोवतालच्यांशी आळीपाळीने बोलणे वा कृती करणे शय होत नाही. खेळताना अथवा वागताना अमूर्त संकल्पना समजत नसल्यामुळे आणि किमान कल्पनाशक्तीचा अभाव असल्यामुळे त्यांना इतरांशी मिळूनमिसळून खेळता येत नाहीत्याचप्रमाणे इतरांशी अन्य व्यवहारही करता येत नाहीत. स्वतःहून इतरांशी संवादाला ही मुले प्रारंभ करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे संवादाचा ओघ त्यांना राखता येत नाही. संवादासाठी आवश्यक इतका त्यांचा भाषेचा विकासही झालेला नसतो. त्यामुळे ही मुले पुनःपुन्हा तेच तेच बोलत राहतात. औपचारिक बोलणेही त्यांना अनेकदा जमत नाही. समाजाच्या रीतीनुसार भाषेचा वापरही करता येत नाही. ह्यांशिवाय भाषेतला आशय चुकीचा असणे, बोलताना सर्वनामांचा वापर करता न येणे, वायांतल्या शब्दांची सुसंबद्ध जुळणी आणि योग्य क्रम न समजणे अशा भाषेच्या वापराबद्दलच्या त्रुटी हेही स्वमग्न मुलांचे एक वैशिष्ट्य आहे. तसेच ही मुले बोलत असताना देहबोलीचा अभाव जाणवतो.

त्यांची वर्तणूक पाहता असे दिसते, की त्यांना त्यांच्या दिनक्रमात कोणताही बदल सहन होत नाही. एकाग्रता त्यांना साधत नाही. राग आल्यास त्यावर त्यांचे नियंत्रण राहत नाही. त्यांची कुठलीही मनःस्थिती टोकाची असते. उघडउघड धोकादायक वस्तुस्थितीची त्यांना भीती वाटत  नाही पण क्षुल्लक गोष्टींबद्दल अतिरेकी भीती त्यांना वाटते. ही मुले शरीराची एकाच प्रकारची, असंबद्ध हालचाल करीत राहतात. त्यांच्या विक्षिप्त हालचालींचे काही प्रकार म्हणजे चवड्यावर चालणे, स्वतःभोवती फिरत राहणे. शारीरिक हालचालींची त्यांची ढब अनैसर्गिक असते कारण सुसूत्र हालचालींसाठी शारीरिक समायोजनाचा अभाव त्यांच्या ठायी आढळतो. शारीरिक संवेदनांना त्यांचे प्रतिसाद विचित्र असतात. अनेकदा ती स्वतःच स्वतःशी आवाज करीत राहतात.

स्वमग्न मुलांची अन्य काही वैशिष्ट्ये अशी : झगझगीत प्रकाश, अतिउष्णता, दुखापत यांना त्यांचा प्रतिसाद कमी असतो. दुसऱ्याच्या अलगद वा ओझरत्या स्पर्शाने ही मुले अस्वस्थ, त्रस्त होतात मात्र, दुसऱ्याला स्वतःहून घट्ट कवटाळण्याची त्यांची प्रवृत्ती असते. जिच्यामुळे स्वतःला इजा होईल अशी कृती ती पुनःपुन्हा करीत राहतात. काळ ह्या संकल्पनेची समज आणि तिचा अंदाज त्यांना कमी असतो तसेच अवकाशाची त्यांना भीती वाटत असते. वासाबद्दल अतिसंवेदनशील असतात. भोवतालच्या वस्तूंचा वास आणि चव घेऊन अंदाज घेण्याकडे त्यांचा कल असतो. खाण्यामध्ये त्यांना वैविध्य चालत नाही. पूर्ण स्वरूपातील एकसंध वस्तूपेक्षा तिच्या सुट्या भागांबद्दल त्यांना अमर्याद आकर्षण असते. निर्जीव वस्तू आणि फिरणारी चाके, पंखा हे त्यांच्या आकर्षणाचे आणखी काही विषय. कलाकौशल्ये, स्मरणशक्ती, दृक्-संवेदनांद्वारे आकलन हे विशेष गुण त्यांच्यात असतात पण ते आत्यंतिक एकारलेले असतात.

स्वमग्नता विकारातील वरील प्रकारची लक्षणे स्वतंत्रपणे सर्वसाधारण व्यक्तींमध्येसुद्धा आढळू शकतात. मात्र, त्यावरून ह्या व्यक्ती या आजाराशी निगडित करता येत नाहीत. या प्रकारची लक्षणे मुलाच्या अथवा व्यक्तीच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापूर्वीपासून आढळली असतील, तरच स्वमग्नता विकाराचे निदान केले जाते. या निदानाच्या निश्चितीसाठी देशोदेशीची सामाजिक व्यवहारांबाबत असणारी लक्षणे ध्यानात घेऊन वैद्यकीय छाननी करण्याच्या चाचण्या बनविल्या गेल्या आहेत. स्वमग्नता विकाराची लक्षणे सामान्यतः बाधित बालक सहा महिन्यांचे झाल्यानंतर दिसू लागतात आणि वयाच्या दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षापर्यंत अगदीच स्पष्ट होऊ लागतात. सहसा ही लक्षणे मोठ्या वयातही टिकून राहतात. मात्र, या विकारातून मुक्त झालेल्या काही व्यक्तींचीही नोंद वैद्यकीय विश्वात झालेली आहे. तसेच, सुरुवातीला सामान्य विकास झालेला असूनही नंतर ह्या विकाराने ग्रस्त झालेली मुलेही आढळू शकतात.

स्वमग्नता विकार असलेल्या व्यक्तींच्या मेंदूतील मज्जापेशींच्या परस्पर-संपर्कातून नैसर्गिक बोधनप्रक्रिया सुरळीत घडत नाहीत. त्यामागची कारणमीमांसा आजवर अनिश्चित आहे. आनुवंशिकता हे या विकाराचे सर्वांत प्रबळ कारण मानले जाते. मात्र, आनुवंशिकतेस जबाबदार असणारी नेमकी गुणसूत्रे आणि त्यांतला नेमका बिघाड या बाबी अस्पष्ट आहेत. कीटकनाशके, जड धातू , विषाणुसंसर्ग, मद्य, धूम्रपान, बाळाच्या मेंदूला प्रसूतिकालीन इजा अशी काही कारणे स्वमग्नता विकार उद्भवण्यास जबाबदार असावीत, असादेखील काही संशोधकांकडून दावा केला जातो. पालकांमधील भावनिक ताणतणाव किंवा भावनिक अलिप्तता ही या विकाराची कारणे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. स्वमग्नता विकारातील प्रमुख वैशिष्ट्यांना कारणीभूत घटक भिन्नभिन्न असून ते एकत्र उद्भवत असावेत, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.

स्वमग्नता विकार मुलींपेक्षा मुलांमध्ये ४ : १ इतया अधिक प्रमाणात आढळतो. जगभरातील आकडेवारीतून या विकाराचे प्रमाण १,००० व्यक्तींमध्ये १-२ पासून २० पर्यंत आढळते. जनजागृती, आर्थिक अनुदाने, प्रत्यक्ष वाढ अशा अनेक संभाव्य कारणांपोटी १९८० सालापासून या विकाराचे निदान झालेल्या मुलांच्या किंवा व्यक्तींच्या संख्येत वाढ झालेली आढळते.

स्वमग्नता विकार असणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये मानसिक तणाव जास्त प्रमाणात आढळतो. अशा विकारग्रस्त मुलांमधील दैनंदिन सामाजिक व्यवहारासंबंधी समस्या कमी करून त्यांचे स्वावलंबन आणि सामाजिक वर्तन सुधारले असता, हा तणाव कमी होऊ शकतो. स्वमग्नता विकाराकरिता केल्या जाणाऱ्या उपचारांचे हेच सूत्र आहे. प्रामुख्याने कुटुंब आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्या पातळीवर हे उपचार बेतले जातात. खास पद्धतीचे प्रशिक्षण आणि वर्तनोपचार यांना वाचा-उपचार आणि व्यवसायोपचार यांची जोड देऊन स्वमग्नता विकारग्रस्त मुलांना लवकरात लवकर आणि प्रदीर्घ काळ साहाय्य देऊ केल्यास अशा मुलांचे वर्तन सर्वसामान्य पातळीच्या अधिकाधिक जवळ येण्यास मदत होते.

संदर्भ : 1. American Psychiatric Association, Dignostic and Statistical  Manual of Mental  Disorders, 5th Ed., 2013.

            2. Sadock, Benjaamin Sadock, Virginia Ruiz, Pedro, Eds. Kaplan and  Sadock’s Comprehensive Textbook of Psychiatry, 9th Ed., New Delhi, 2009.

चव्हाण, अनिमिष