स्लोव्हाक भाषा-साहित्य : स्लोव्हाक भाषेचा समावेश पश्चिमी स्लाव्हिक भाषांमध्ये केला जातो. ती चेक व पोलिश भाषांशी संबद्ध असून पूर्व जर्मनीतील सर्बियन भाषांशीही तिचा संबंध पोहोचतो. स्लोव्हाक भाषा ५२,९०,००० (२०११) लोकांकडून बोलली जाते. त्याशिवाय कॅनडा, हंगेरी, पोलंड, रूमानिया, युक्रेन आणि अमेरिका या देशांमध्ये ही भाषा बोलणारे काही लोक आहेत. ही इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील भाषा आहे. सहाव्या शतकात प्राचीन पोलंडमधून काही जनसमूह स्थलांतरित झाले आणि पूर्व यूरोपात स्थायिक झाले. त्यातूनच पुढे पूर्व, पश्चिम व दक्षिणेकडे स्लाव्हिक भाषांची निर्मिती झाली. स्लोव्हाक भाषेच्या वर्गीकरणात भौगोलिक निकष महत्त्वाचा ठरतो. तेथील पर्वतरांगा या बोलींच्या विभाजनाची रेषा ठरतात. तिच्या बरोबरीने चेक, पोलिश, सर्बियन या भाषा विकसित झाल्या. चेक आणि स्लोव्हाक भाषांचा अकराव्या शतकापर्यंत विशेष विकास झाला नाही पण त्यानंतर मात्र मोरेव्हिया या प्रदेशातून चेक आणि स्लोव्हाक अशा दोन स्वतंत्र भाषांचा प्रवास सुरू झाला तथापि त्यानंतरही सोळाव्या शतकापर्यंत शब्दसंग्रह वगळता या भाषांचे वेगळेपण उठून दिसते, ते त्यांच्या बलाघातामध्ये. या भाषांमध्ये नेहमी पहिल्या स्वरावर बलाघात दिला जातो. स्लोव्हाक भाषेतील राष्ट्रीय वाङ्मय म्हणून सोळाव्या शतकातील ग्रंथसंपदेचा उल्लेख करावा लागेल. हे वाङ्मय रोमन (लॅटिन) वर्णाक्षरात लिहिलेले आहे. या वाङ्मयाचा आशय मुख्यतः धार्मिक, प्राचीन ग्रीक आणि रोमन कथांवर आधारलेला आहे.

आधुनिक स्लोव्हाक भाषेत लिपी म्हणून रोमन अक्षरांचा आणि त्यांतील विशेष उच्चारचिन्हांचा ( डायक्रिटिकल मार्क्स ) वापर केला जातो. दुसर्‍या महायुद्धानंतर स्लोव्हाक लिपीत काही महत्त्वपूर्ण बदल झाले. त्यांमध्ये उपसर्गात आलेल्या या अक्षराचा या अक्षरात उच्चारसौकर्यासाठी होणारा बदल हा एक आहे. स्लोव्हाकिया १९१८ पासून १९९३ पर्यंत चेक प्रजासत्ताकाचा एक भाग होता. १९१८ मध्ये स्लोव्हाक आणि चेक या भाषांना प्रथमच राजभाषा म्हणून मान्यता मिळाली पण त्यामुळे सुरुवातीच्या काळात चेकोस्लोव्हाक असे या भाषेचे नाव असून चेक आणि स्लोव्हाक या तिच्या बोली भाषा आहेत, असे मानले जात असे. चेकव्यतिरिक्त पोलिश, हंगेरियन आणि जर्मन भाषांचाही स्लोव्हाकवर प्रभाव आहे. जर्मन भाषेतील munzen’ हा स्लोव्हाक भाषेतील mince’ ला आधारभूत आहे. अलीकडच्या काळात इंग्लिश आणि इटालियन प्रदान शब्दांचा शिरकाव तीत झाला आहे.

उदा., इं. Weekend — स्लो. Vikend

 

इटा. Qualita (quality) — स्लो. Kvalita

ध्वनिव्यवस्था : स्लोव्हाक ही भाषा जुनी ध्वनिव्यवस्था जपणारी आहे. त्यामुळे दीर्घावयवकेंद्री उदा., ! आणि ṛ ध्वनी त्या भाषेत जपलेले आहेत. या भाषेच्या लिखाणात एक वैशिष्ट्य आहे. y आणि i ही दोन चिन्हे ‘इ’ हा एकच उच्चार दाखवतात. उदा., पुं. विशेषण Pekny (nice — एकवचन ) pekni (nice — अनेकवचन ) या दोन्हींचाही उच्चार पेकनी (pekni) असाच केला जातो. ऍक्यूट मार्कचा अर्थ दीर्घतादर्शक चिन्ह असा होतो आणि तो दीर्घस्वराचा निर्देश करतो. उदा., i= i: असा साधारण होतो. उमलाऊट हे चिन्हही वापरले जाते. उदा., Ä याचे उच्चारण जर्मनमधील उन्नतस्वरासारखे केले जाते. याशिवाय कॅरन म्हणून आणखी एक चिन्ह वापरले जाते. ते तालव्यीकरणाची किंवा मृदुकरणाची खूण म्हणून वापरले जाते. दंतमूलीय घर्षक वर्णांचे पश्च दंतमूलीय आणि तालव्य व्यंजनात झालेले रूपांतर दाखवण्यासाठी ही खूण वापरली जाते. उदा., čĎžŝžň तसेच / ṛ / आणि /!/ हे अवयवकेंद्री असू शकतात आणि स्वरांसारखे वागू शकतात. उदा., vlk (wolf), prst (finger) इत्यादी.

व्यंजने : ओष्ठ्य अनुनासिक म, दंतमूलीय अनुनासिक न, तालव्य अनुनासिक ञ ही अनुनासिके आहेत. स्पर्शध्वनींमध्ये ओष्ठ्य प, ब दंतमूलीय त, द तालव्य च, ज तालुच्छदीय क, ग असे ध्वनी आहेत. घर्षस्फुट ध्वनींमध्ये /ts//dz//tò/d3/ हे चार ध्वनी आहेत. ओष्ठ्य घर्षक फ आणि व हे असून, दंतघर्षक रा आणि ज हे आहेत. श आणि झ हे पश्चजिव्हामूलीय घर्षक ध्वनी आहेत. यांशिवाय तालुच्छदीय घर्षक ख आणि कंठद्वारीय घर्षक ख असे दोन घर्षक ध्वनी आहेत. दोन दंतमूलीय स्पंदित ध्वनी /r/ आहेत.

पदविन्यास : क्रियापदांमध्ये तीन मुख्य धातुविकार दिसतात : तीन पुरुष, एकवचन आणि अनेकवचन. धातुविकारांच्या विविध रूपतालिका दिसतात.

उदा., Volat = to call

 

 

एकवचन 

अनेकवचन 

प्रथम पुरुष 

Volkam

Volkame

द्वितीय पुरुष 

Volas

Volate

तृतीय पुरुष 

Vola

Volaju

कर्तृवाचक सर्वनामे पुष्कळ वेळा अध्याहृत असतात. जिथे अपरिहार्य आहे, तिथे त्यांचा वापर केला जातो. काही घटमान ( अपूर्ण क्रियापद ) घटित क्रियापदांपासून घडवली जातात. पुनःपुन्हा किंवा सवय या अर्थांना व्यक्त करण्यासाठी ती वापरली जातात पण त्यांना स्वतंत्र शब्दिम म्हणून वापरले जाते.

उदा., To hide ( perfective ) = Skryt, to hide (habitual) = skryvat

या भाषेच्या इतिहासात दोन भूतकाळ सापडतात. यांपैकी एक भूतकाळ हा पूर्ण भूतकाळ (घटित भूतकाळ) म्हणून पूर्वी वापरला जात होता. तो आता आधुनिक भाषेत दिसत नाही. त्याचा वापर हा ङ्कआर्षङ्ख किंवा व्याकरणदृष्ट्या अशुद्ध मानला जातो.

उदा., Skryvat = Skryval som ( I hid/have hidden )

Bol som skryval ( I had hidden )

Skryvat = Skryval som, Bol som skryval

क्रियापदांच्या रूपात या प्रकारची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. विशेषणांना o or-el or-y हे प्रत्यय लावून क्रियाविशेषणे तयार केली जातात.

उदा., Vysoky (high)–Vsysoky-o (highly)

Pekny (nice) – pekn-e(nicely)


पूर्वाश्रयी शब्दयोगी हे एका किंवा अनेक विभक्तींशी संबंधित असतात. नामाची विशिष्ट विभक्ती असणार्‍या रूपाचाच विचार केला जातो. कोणत्या विभक्तीबरेाबर ते अव्यय येत आहे, त्यानुसार त्याचा अर्थ बदलतो.

उदा., around the suare = po namesti ( locative case )

past the suare = po namesti (accusative case)

वाक्यविन्यास : क्रियापदाचे पुरुष वचन हे कर्त्याप्रमाणे चालते.

Spevčka spieva-o (The female singer is singing)

spieva-o where-o is third person singular ending.

Spevčky spieva-j-u (Female singers are singing)

In spieva-j-u, j is hiatus sound, and-u is third person plural ending.

विशेषणे, सर्वनामे आणि संख्यावाचके यांचा अन्वय कर्त्याशी होतो. ती ज्या कर्त्याचा निर्देश करतात त्याच्या पुरुष, लिंग, विभक्तीप्रमाणे चालतात.

शब्दक्रम हा मुक्त असतो कारण विभक्ती प्रत्यय-विभक्ती विकार अत्यंत बलवान असल्याने व्याकरणदृष्ट्या एखाद्या पदाची भूमिका विभक्ती प्रत्ययाने स्पष्ट होते.                                

बिदनूर, जान्हवी

साहित्य : स्लोव्हाक बोली भाषा चेक भाषेशी संबद्ध होती परंतु मध्ययुगापासून ती व्यवच्छेदक झाली तथापि स्लोव्हाक लिखित भाषेचा विकास करण्याचे विधायक व पद्धतशीर प्रयत्न अठराव्या शतका-पर्यंत झाले नाहीत. अठराव्या शतकात भक्तिगीते स्थानिक पातळीवर रचली गेली. कॅथलिक आणि कॅल्व्हिनिस्ट धर्मोपदेशकांनी काही प्रार्थना-पाठ रचले मात्र ॲन्तॉन बेर्नोलॅक (१७६२—१८१३) याने स्लोव्हाक भाषेतील केंद्रोत्साहक प्रवृत्तींना संग्रहरूप देऊन पाश्चात्त्य स्लोव्हाक वर्णाक्षराच्या मूलाधारावर स्लोव्हाक व्याकरण हा साहित्यप्रकार दृढतर केला (१७९०). त्यावरच पुढे सहा खंडांत ‘ स्लोव्हाक शब्दकोश ’ (१८२५—२७) संकलित केला गेला. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या या काळात अनेक उत्स्फूर्त लेखक पुढे आले. त्यांनी बेर्नोलॅकच्या नियमानुसार शुद्ध-लेखन केले. त्यांपैकी सर्वश्रेष्ठ म्हणजे यान होली (१७८५—१८४९) हा होय. त्याने भावकविता, गोपगीते आणि राष्ट्रीय महाकाव्ये रचली. गद्य लेखकांमध्ये बेर्नोलॅकचे अनुकरण करणारा प्रसिद्ध लेखक म्हणजे युरो फॅन्ड्ली (१७५०—१८११) हा असून त्याने धार्मिक व अनुभविक असे अनेक प्रबंध लिहिले. योझेफइग्नेक बाझा (१७५५—१८३६) याने Rene शीर्षकार्थाची चेक भाषेतील बोधवादी कादंबरी लिहिली (१७८५). यान कॉल्लार (१७९३—१८५२) हा कवी व धर्मगुरू होता. त्याने डश्रर्रीं वलशीर ( १८२४, इं.  शी. ‘ द डॉटर ऑफ स्लाव्हा ’ ) ही सुनीतमाला रचली. ती राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या काळातील एक उल्लेखनीय काव्यरचना होय. तिच्यात त्याचे व्यक्तिमत्त्व आणि ताजेपणा यांची प्रचिती येते. कॉल्लार हा अराजकीय रोमँटिक सकल स्लाव्हवादाचा पुरस्कर्ता होता. स्लोव्हाक लोकांच्या सांस्कृतिक ऐक्याचा पुरस्कार करणारा एक निबंधही त्याने लिहिला (१८३६). शिवाय काही लोकगीते रचली. स्लोव्हाक लोकगीते आणि स्लोव्हानिक रम्याद्भुत काव्य यांचा समन्वय यान बोत्तो (१८२९—८१) याच्या Smart Janosikova ( इं.  शी. ‘ यानोशिक्स डेथ ’ ) या महाकाव्यात प्रकर्षाने जाणवतो. सॅमो चालुपका (१८१२—८३) याने भावगीतात लोकभाषा वापरली.

बेर्नोलॅकची भाषा स्लोव्हाकियातील प्रॉटेस्टंट पंथीयांना रुचली नाही. त्यांनी आपल्या धार्मिक स्तोत्रात व पठणात चेक भाषेचाच वापर केला मात्र, बहुसंख्य कॅथलिकांचा ओढा स्लोव्हाक भाषेकडेच होता. त्याला राष्ट्रीय प्रेमाची झालर होती. १८४० च्या दशकात लूदोव्हिट स्टर (१८१५—५६) याने सर्वसामान्यांच्या बोली भाषेत रूढ असणार्‍या शब्दांत सुधारणा करून प्रमाण स्लोव्हाक भाषा तयार केली. त्यात काही फेरफार करून मार्टिन हद्टाल याने स्लोव्हाक भाषेचे व्याकरण बनविले. याच काळात स्लोव्हाक भाषाशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्वज्ञ पाव्हेल यॉसेफ शाफारझीक (१७९५—१८६१) याने स्लाव्ह लोकांचा इतिहास आणि भाषा या विषयांवर मोलाची ग्रंथरचना केली. या नवीन भाषेचा तत्कालीन कविसमूहाने स्वीकार केला. स्टरचा वाक्प्रयोग आन्द्रेज क्लॉड्कोव्हिक-सारख्या कविसमूहातील कवींनी आत्मसात करून Marina (१८४६) या शीर्षकार्थाचे राष्ट्रीय महाकाव्य रचले. हे राष्ट्रीय महाकाव्य विख्यात रशियन कवी अलिक्सांद्र पुश्किनच्या Onegin या काव्याच्या धर्तीवर असून यान कॉल्लारच्या काव्यापेक्षा लहान, पण वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र होते. या कविसमूहातील श्रेष्ठ कवी म्हणजे यांको क्रॉल (१८२२—७६) हा होय. त्याचा १८४८ च्या क्रांतीतील सहभाग हा एक कुतूहलाचा भाग होता. पुढे त्यास आख्यायिकेचे स्वरूप प्राप्त झाले. त्याचे रोमँटिक पोवाडे, भावगीते आणि महाकाव्ये यांनी स्लोव्हाक साहित्यात मोलाची भर घातली. त्याच्या काव्यसंग्रहांतून प्रतीकवादाच्या आविष्काराबरोबरच त्याची कविता सूक्ष्मोत्कट आशय व जटिल घाट ह्या दृष्टींनीही लक्षणीय आहे. त्यातून दृक्प्रत्ययवादी प्रतिमानिर्मिती करण्याचा कवीचा प्रयत्न दिसून येतो. आशयातील सूक्ष्म बारकावे टिपण्याचे सामर्थ्य त्याच्या भाषेत आहे.

स्लोव्हाक भाषेतील पहिला नाटककार यान चालुपका (१७९१—१८७१) याने Kocourkovo ही खळबळ उडवून देणारी उपरोधिका लिहिली. त्यानंतर यान पालेरिक (१८२२—७०) याने आधुनिक स्लोव्हाक भाषेत काही सुखांतिका लिहिल्या. त्यांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील समाजाचे चित्र उपरोधक रीत्या व्याजस्तुतीद्वारे रंगविले आहे तथापि, त्यातूनही तत्कालीन स्लोव्हाक समाजाविषयीची सहानुभूती दृग्गोच्चर होते. त्याची कादंबरी ही या आधुनिक भाषाशैलीतील अखेरची साहित्यकृती होय. मार्टिन कुकूचीन (१८६०—१९२८) हा एक विचक्षण बुद्धिमत्तेचा लेखक होय. त्याने डाल्मेशियन किनार्‍यावरील लोकांच्या जीवनावर साक्षेपी लेखन केले.

विसाव्या शतकात विशेषत्वाने भावकवितेचीच अधिक निर्मिती झाली. पहिल्या महायुद्धापूर्वीचा प्रसिद्ध भावकवी हेव्हिझडोस्लाफ उर्फ पॅव्हॉल ऑर्साग (१८४९—१९२१) याने स्लोव्हाक भाषेला महाकाव्ये व अनुवादित साहित्याद्वारे वैकासिक रूप दिले. त्याची महाकाव्ये अभिजात साहित्याचे उत्कृष्ट नमुने असून त्याने इंग्लिश, रशियन, जर्मन आणि हंगेरियन भाषांतील अनेक अभिजात ग्रंथांचे अनुवाद केले. त्याचे Hajnikova Zena (१८८६), E30 Vlkolinsky (१८९०) हे ग्रंथ आणि Krave Sonely (१९१९) हा भावकवितासंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. रूसोफाईल व्हायन्स्की (१८४७—१९१६) याने काही सामाजिक मनोरंजन करणार्‍या कादंबर्‍या लिहिल्या. यान बोत्तो उर्फ इव्हान क्रॅस्को (१८७६—१९५८ ) हा विसाव्या शतकातील एक संस्मरणीय भावकवी होय. या दोघांचे अनुक्रमे Nox et solitudo (१९०९) आणि Verse (१९१२) हे साहित्य विशेष प्रसिद्धी पावले. पहिल्या महायुद्धानंतर स्लोव्हाक साहित्याला परिपक्वता प्राप्त झाली आणि यूरोपियन संकल्पना आणि कथाविषय याने ते समृद्ध झाले. भावकाव्यामध्ये मार्टिन रेझस, यान्को येसेन्स्की, एमील बोलेस्लाव्ह लूकाक, यान सिटेक उर्फ यान स्म्रेक, यान पोनिकेन आणि लॅको नोव्होमस्की यांनी मोलाची भर घातली. तसेच तिम्राव्ह (१८६७—१९५१) याच्या कादंबरीसदृश लोककथा, मिलो अर्बनचे स्लोव्हाकियाच्या विसाव्या शतकातील घडामोडींवरचे इतिवृत्तपर लेखन आणि मार्गिना फिगुलीचे गद्यकाव्य हे काही लक्षणीय अभिजात साहित्य होय. दुसर्‍या महायुद्ध- काळात व त्यानंतरच्या कम्युनिस्ट राजवटीत लेखनस्वातंत्र्यावर काही निर्बंध असतानाही लॅडिस्लॉव्ह मॅनको, ॲल्फॉन्झ बेदनार आणि डॉमिनिक नातार्क यांनी साम्यवादविरोधी परखड लेखन केले. यांपैकी मॅन्को याने स्टालिनवादावर Ako chuti moc ( इं. शी. ‘ द स्टेट ऑफ पॉवर ’ ) या कादंबरीत घणाघाती टीका केली. खडतर परिस्थितीतून मूलभूत मानवी मूल्यांच्या जपणुकीची जी तीव्र आणि वाढती जाणीव निर्माण झाली, तिचे पडसाद स्लोव्हाक साहित्यात या कादंबरीद्वारे उमटले. कदाचित अशा प्रकारचे सडेतोड लेखन करणारा पूर्व यूरोपीय लेखकांमधील तो एकमेव असावा. तातर्क याने हुसेक या हुकूमशाहाच्या राजवटीवर Sam proti noci (१९८४, इं. शी. ‘ अलोन अगेन्स्ट द नाइट ’) या पुस्तकात परखड टीका केली. व्हेल्व्हेट क्रांतीच्या पूर्वसंध्येला लॅडिस्लाव्ह बॅलेक, व्हिन्सेन्ट शिकुला आणि यान याहनाड्स या कादंबरीकारांनी कम्युनिस्ट राज-वटीच्या विरुद्ध आवाज उठविला. मार्टिन सिमेकाच्या Ozin (१९९०, इं. शी. ‘ द यिअर ऑफ द फ्रॉग ’) या कादंबरीत १९८० च्या दशकातील विद्यापीठातील अत्याचारावर प्रकाश टाकला आहे. चेकोस्लोव्हाकिया-तील एका तरुण विद्यार्थ्याची करुण कहाणी त्यात असून त्याचे वडील कम्युनिस्टविरोधी कारस्थानात सहभागी झाल्याने, त्यास विद्यापीठातून हाकलण्यात येते, असे वर्णन आहे. ही कादंबरी समाजवादी वास्तव-वादाने प्रेरित झालेली असून साहित्य व प्रत्यक्ष जीवन यांच्या एकात्म आविष्काराचा ध्यास तीत घेतलेला दिसतो. १९९० च्या दशकात स्वातंत्र्याच्या चेतनादायी वातावरणाचा प्रभाव वाङ्मयीन सर्जनशीलते-वरही अपरिहार्यपणे पडला आणि त्यामुळे नाटक, कादंबरी, भावकविता आदी साहित्यप्रकारांतील लेखनाला नवा जोम प्राप्त झाला. विसाव्या शतकाच्या सरत्या दशकात व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात स्लोव्हाक साहित्यात यूरोपीय नवप्रवाहांना अनुसरून साहित्यनिर्मिती झाली. या काळातील द्युसान मितना आणि पाव्हेल व्हिस्कोव्हस्की हे प्रसिद्ध लेखक असून मिलान रूफूस हा आधुनिक कवी होय.

देशपांडे, सु. र.

संदर्भ : 1. Leff, Carol Skalnik, The Czech and Slovak Republics : Nation Versus State, 1998.  

           2. Misianik, J. etal Dejiny Starsej Slovenskej Literatury, 1958.

           3. Pynsent, Robert B. Kankova, S. I. Eds., Rendet’s Encyclopaedia of Eastern   European Literature, New York, 1993.