स्लाव्हिक भाषासमूह : ⇨ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबा ची एक महत्त्वाची शाखा. स्लाव्हॉनिक भाषासमूह असेही यास म्हणतात. तसेच ⇨ बाल्टिक भाषासमूहाला ती विशेष जवळ असल्यामुळे तिला बाल्टो-स्लाव्हिक अशी संयुक्त शाखाही मानतात. सुमारे २,७६१.५ लक्ष स्लाव्हिक भाषक बराचसा पूर्व यूरोप, मध्य यूरोप आणि बाल्कन द्वीपकल्पाचा काही भाग आणि त्यांच्या उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेमधील अलीकडच्या वसाहती यांतून पसरलेले आहेत. आद्य बाल्टो-स्लाव्हिक भाषक इ. स. पू. ३००० च्या सुमारास इतर इंडो--यूरोपियन भाषकांपासून वेगळे झाले आणि इ. स. पू. २०००—० काळात बाल्टिक समुद्राच्या दक्षिण-पूर्वेच्या प्रदेशात स्थिर झाले. इ. स. पहिल्या शतकापासून मात्र आद्य स्लाव्हिक भाषक पश्चिमेकडे, दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे पसरले. दक्षिण यूरोपमधली ग्रीक व रोमन संस्कृती आणि त्यांच्यावर झालेले ख्रिस्ती धर्माचे संस्कार यांच्याशी जर्मानिक भाषकांपेक्षा स्लाव्हिक भाषकांचा संपर्क बर्याच उशिरा झाला. उर्वरित यूरोपला त्यांची ओळख दुर्दैवाने प्रथम रोमनांचे गुलाम म्हणून झाली. ( लॅटिन भाषेत तर sclavus ‘ स्लाव्ह माणूस ’ या शब्दात मध्ययुगात गुलाम असा अर्थ आला. इंग्लिश भाषेत slav आणि slave यांमध्ये सुदैवाने अर्थांची वाटणी झाली. ) इ. स. नववे ते अकरावे शतक या काळात स्लाव्हिक भाषकांची राज्ये तयार झाली. इ. स. दहावे ते बारावे शतक या काळात स्लाव्हिक भाषासमूहाचे प्रदेशांनुसार भाषिक विभाजन झाले. नवव्या शतकात ग्रीस-मधून आलेल्या संत सिरिल (८२७—६९) आणि मिथोडियस (८२६—८५) या ख्रिस्ती बंधुद्वयाने स्लाव्हिक भाषकांमध्ये ख्रिस्ती धर्माबरोबर नवी लिपी दिली ( जी ग्लॅगॉलिटिक लिपी आजच्या सिरिलिक लिपीचे पूर्वरूप होती ). लिखित धार्मिक व ललित वाङ्मय आणि मौखिक वाङ्मयाची स्थिर परंपरा आली. क्रमाक्रमाने ती भाषाभाषांतून पसरली. मात्र, आद्य बाल्टो-स्लाव्हिक काळापासून पूर्वेकडील इंडो-इराणियन भाषकांशी असलेली भाषिक आणि सांस्कृतिक जवळीक पूर्ण विसरली गेली नाही.
स्लाव्हिक भाषासमूहाचे विभाजन झाले, तरी भौगोलिक दृष्ट्या जवळच्या बोलींमध्ये भाषाविशेषांचे आदानप्रदान झाले. पश्चिम शाखेत जर्मनीच्या पूर्व भागातली सर्बियन ( किंवा वेंदिश ),पोलंडमधली पोलिश, दक्षिण भागातली काशूबियन, सतराव्या शतकात नामशेष झालेली पोलेबियन, मध्य यूरोपातील चेक आणि स्लोव्हाक या भाषा येतात.दक्षिण शाखेत स्लोव्हेनियन,सर्बियन, क्रोएशियन, मॅसिडोनियन आणि बल्गेरियन या भाषा येतात. पूर्व शाखेत बेलोरशियन ( व्हाइट रशियन ), रशियन ( ग्रेट रशियन ) आणि युक्रेनियन ( लिट्ल रशियन ) या भाषा येतात. धर्मप्रसार आणि सिरिलिक लिपीचा प्रसार यांच्याबरोबर दक्षिण शाखेतील तत्कालीन मॅसिडोनियन-बल्गेरियन भाषारूपांचा व्यावहारिक भाषेपासून वेगळ्या धर्मभाषेच्या रूपाने प्रसार झाला तिला पुराण चर्च-स्लाव्हिक म्हणतात. पूर्व यूरोपच्या ख्रिस्ती धर्मजीवनात लॅटिन कॅथलिक चर्च आणि पूर्वीय ऑर्थोडॉक्स चर्च यांची स्पर्धा होती. १०५४ मध्ये कॉन्स्टँटिनोपलच्या पॅट्रिआर्कने रोमच्या पोपचे वर्चस्व झुगारून दिले. इ. स. च्या अकराव्या--बाराव्या शतकामध्ये त्याचे भाषिक परिणाम स्पष्ट झाले. पश्चिम शाखेतील स्लाव्हिक भाषक आणि दक्षिण शाखेतील क्रोएशियन भाषक रोमन कॅथलिक, धर्मभाषा लॅटिन आणि रोमन लिपी स्वीकारणारे होते, तर उर्वरित स्लाव्हिक भाषक ऑर्थोडॉक्स पंथीय, धर्मभाषा चर्च-स्लाव्हिक आणि सिरिलिक लिपी स्वीकारणारे होते. ( या प्रक्रियेत चेक भाषकांनी ८६३ पासून चालत आलेली चर्च-स्लाव्हिक व सिरिलिक लिपी सोडून दिली आणि एकाच बोली-कुलाची क्रोएशियन आणि सर्बियन-माँटेनेग्रिन अशी विभागणी झाली. ) एकोणिसाव्या शतकात ‘ स्लाव्ह तितके एक आणि त्यांना जर्मन भाषक आणि तुर्की लोक यांच्या आक्रमणापासून वाचवा ’ या विचारांनी ( पहिल्या महायुद्धापर्यंत ) मूळ धरले होते.
वर्णव्यवस्था : इंडो-इराणियन, केल्टिक, बाल्टिक व स्लाव्हिक भाषा केंतुम् गटात न मोडता सातम् गटात मोडतात. आद्य इंडो-यूरोपियन- मधला स्वरमानावर आधारित, पदातील विशिष्ट अक्षरावर पडणारा आघात काही स्वरूपात फक्त वैदिक संस्कृतमध्ये आणि सर्बो-क्रोएशियन बोलीकुलात शिल्लक आहे. नामांच्या आणि क्रियापदांच्या रूपातील आघातव्यवस्था एकसारखी असून, आघातहीन स्वर गाळण्याची असून व्यंजनांचे तालव्यरंजन करण्याची आणि घर्षक व घर्षस्फुट व्यंजनांचे वैपुल्य असण्याची प्रवृत्ती दिसते.
पदव्याकरण : स्लाव्हिक भाषांमध्ये पदविकार टिकवण्याची, तर कधी वाढवण्याची प्रवृत्ती दिसते. कृत्रिम लिंगभेद तसेच नामांचे अपादान सोडून इतर कारक-विकार टिकून आहेत. क्रियापदांमध्ये भूत आणि भूतेतर कालभेद व घटित आणि घटमान क्रियाव्याप्तिभेद दिसतात.
वाक्यव्याकरण : अर्वाचीन बल्गेरियन व मॅसिडोनियन सोडता वाक्यरचना पदक्रमावर न विसंबता पदविकारांवर आणि पदविकार-सुसंवादावर ( विशेषणाचा विशेष्याशी, क्रियापदाचा कर्त्याशी ) अवलंबून ठेवण्याची प्रवृत्ती दिसते. ‘ आहे ’ क्रियापद अध्याहृत ठेवण्याची पद्धत आहे.
शब्दसंग्रह : पश्चिमेकडून जर्मन आणि दक्षिण-पूर्वेकडून तुर्की शब्दरूपांचे आदान दिसते. पश्चिम यूरोपियन विचारसृष्टीशी नाते जोडण्याच्या वृत्तीमधून एकोणिसाव्या शतकापासून ग्रीक व लॅटिन अभिजात शब्दरूपांचे प्रत्यक्ष आदान करण्याची किंवा त्यांच्यावर बेतलेली नवी अनुवादित शब्दरूपे घडवण्याची प्रवृत्ती दिसते.
लेखनव्यवस्था : रोमन आणि सिरिलिक लिपींच्या स्पर्धेबद्दल अगोदर उल्लेख आलाच आहे. बर्याच भाषांच्या वर्णरचनेचे उच्चारानुसारी प्रमाणीकरण अलीकडेच झाल्यामुळे लेखन पुष्कळ अंशी उच्चारानुसारी राहिले आहे.
एकंदरीने स्लाव्हिक भाषासमूह इंडो-यूरोपियन भाषांमधल्या यूरोपियन आणि आशियाई भाषांमधला एक दुवाच मानायला हरकत नाही. रशियन, पोलिश, चेक या भाषांनी जगाला महत्त्वाचे वाङ्मय दिले आहे.
संदर्भ : 1. Berneker, Erich, Slavisches Etymologisches Wodrterbuch, Vol. 1, 1924.
2. De Bray, R. G. A. Guide to the Slovanic Languages, 1969.
3. Jakobson, Roman, Slavic Languages 2nd Ed., 1955.
4. Meillet, Antoine, Le Slave Commun 2nd Ed., 1934.
5. Trautmann, Reinhold, Die Slavische Volker and Sprachen, 1947.
6. Wijk, Van Nicholas, Les Langues Slaves, de L’unite a la Pluralite, 2nd Ed., 1956.
केळकर, अशोक रा.
“