स्यिनच्यी-जी : (११४०—१२०७). चिनी कवी. शँटुंग प्रांतात जन्म. लहानपणापासून त्याच्यावर सैनिकी संस्कार झाले होते. सुंग राज-घराण्याच्या सैनिकी सेवेत तो होता. ११९४ मध्ये तो सेवेतून निवृत्त झाला आणि शांग-राऊ ह्या सुंदर प्रदेशात त्याने एकान्त मिळेल असे निवासस्थान बांधले तेथे मनसोक्त वाचन आणि काव्यलेखन केले. तेथे त्झू (Tz’u) या काव्यप्रकारातील सहाशेहून अधिक कविता त्याने लिहिल्या. या काव्यप्रकारातील कविता संगीताच्या स्वरबंधांत गुंफलेल्या असतात. ह्या काव्यप्रकारात एक प्रकारची संयत प्रयोगशीलता दाखवून त्याचा त्याने विस्तारही केला. सखोल भावनिकता हे त्याच्या कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. त्याच्या काव्यरचनेचे मोठ्या प्रमाणात अनुकरणही झाले. सुंग घराण्याच्या कालखंडात होऊन गेलेला सर्वश्रेष्ठ कवी म्हणून तो मान्यता पावला.
शांग-राऊ येथेच त्याचे निधन झाले.
कुलकर्णी, अ. र.