स्तोत्रवाङ्मय : ‘ स्तूयते अनेन इति ’ म्हणजे ‘ ज्याच्या योगे स्तवन केले जाते ते ’, असे स्तोत्राचे लक्षण सांगितले गेले आहे. स्तोत्र हे आराध्य दैवताच्या स्तुतिपर असते. ईश्वराची स्तुती करण्याची प्रवृत्ती सर्वच धर्मांत आढळते. ऋग्वेदा तील सूक्ते ही एक प्रकारे स्तोत्रेच होत. बहुतेक सूक्तांतून आराध्य देवतेचे स्वरूप, कार्य, पराक्रम यांचे वर्णन येते. ऋग्वेदा त वरुण हा देव विश्वसम्राट म्हणून वर्णिलेला आहे. इंद्र हा युद्धदेव. त्याच्या पराक्रमांची उत्साहपूर्ण वर्णने ऋग्वेदा त निरनिराळ्या सूक्तांमधून आलेली आहेत. ऋग्वेदा तला गायत्री मंत्र सविता देवाच्या स्तुतिपर आहे. ऋग्वेदा तील मंडलांच्या अनेक धृवपदांत रक्षणासाठी, भौतिक यशासाठी प्रार्थना आहेत. स्तोत्रे वा स्तवने हा भक्तीचा एक आविष्कार होय. वसिष्ठ ऋषींनी ऋग्वेदात वरुणाला उद्देशून लिहिलेली, उत्कट भावनेने भारलेली आणि उदात्त स्वरूपाची सूक्ते आहेत. ही सूक्ते पाहिली, तर वसिष्ठ हे भक्तिपंथाचे प्रवर्तकच ठरतात, असे काही अभ्यासकांना वाटते. स्तोत्र-कर्त्यांनी भौतिक समृद्धीसाठीही स्तोत्रे रचली आहेत. ह्याची उदाहरणे वैदिक साहित्यात अनेक आहेत. पुराणात अनेक स्तोत्रे असून मार्कंडेय पुराणा तील ‘ दुर्गासप्तशती ’ सारख्या स्तोत्रांना नंतर बरीच मान्यता मिळाली. विविध कामना पूर्ण होण्यासाठी स्तोत्र किंवा त्यातील काही श्लोकांचे मंत्र म्हणून पठण करण्याची ब्राह्मणातली परंपरा पुराणातही चालू राहिली. मात्र पौराणिक स्तोत्रांमध्ये मोक्षकल्पनेला आणि आत्मकल्याणाला प्राधान्य मिळाले.
भक्तिपरंपरेचा उदय आणि धार्मिकता ह्यांच्या पोटी स्तोत्रपरंपरेला स्वतंत्र प्रेरणा मिळाली. बाणभट्टाचा समकालीन आणि आप्त मयूर ( सातवे शतक ) ह्याचे सूर्यशतक वा मयूरशतक उल्लेखनीय आहे. कवीला झालेल्या कुष्ठरोगनिवारणासाठी त्याने केलेली ‘ सूर्यस्तुती ’ ह्या शंभर श्लोकांच्या रचनेत आहे. स्त्रग्धरा वृत्तात रचलेल्या ह्या स्तोत्रात भाषेची व विचारांची प्रौढता, अनुप्रासाचे नादमाधुर्य आणि वर्णनातली भावोत्कटता आहे. ह्यांमुळे हे स्तोत्र केवळ भक्तीसाठी नव्हे, तर काव्यदृष्ट्याही सरस आहे. ⇨ बाणभट्टा च्या चण्डीशतक वा चण्डीस्तोत्र ह्या स्तोत्रात भगवती दुर्गेची स्तुती आहे. रचना व शैली बाणाला साजेल अशीच आहे.
⇨ प्रस्थानत्रयी चे महान भाष्यकार, केवलाद्वैतवादाचे प्रवर्तक आणि थोर वेदान्ती ⇨ आद्य शंकराचार्य ( इ. स. ७८८ — ८२०) यांनी शिव, विष्णू, चण्डी, सूर्य इ. देवतांना उद्देशून स्तोत्ररचना केलेली आहे. त्यांच्या बहुविध स्तोत्ररचनेत ‘ भज गोविंदम्… ’ हे अतिशय मधुर आहे, तर भगवती त्रिपुरसुंदरीच्या सीमन्तापासून पदकमलापर्यंत अंग-प्रत्यंगाच्या दिव्य सौंदर्याची स्तुती करणार्या सौंदर्यलहरी मध्ये भावानुकूल भाषा, रसात विरघळलेले अलंकार, गूढ, तांत्रिक अर्थामध्ये एकरूप झालेले साहित्यगुण ह्यांचा अपूर्व संगम आहे. विष्णूच्या समग्र रूपाचे वर्णन करणारे विष्णुपदादि–केशान्तवर्णन ( स्त्रग्धरा वृत्त, ५१ श्लोक ) हेही शंकराचार्यांच्या नावावर आहे पण ही रचना त्यांची नसावी.
शैव स्तोत्रांमध्ये काश्मीरच्या उत्पलदेवाची ( नववे शतक ) शिव-स्तोत्रावलि जगद्धरभट्टाची स्तुतिकुसुमाञ्जली ( ३८ स्तोत्रे, १४१५ श्लोक ) प्रसिद्ध आहेत. दोहोंमध्ये शैव त्रिकदर्शन मार्मिकपणे गोविले आहे. गोकुलनाथाचे शिवशतक हे एक दीर्घ, रुचिर काव्य आहे. पुष्पदंत–गंधर्वाच्या शिवमहिम्नस्तोत्रा त ( सु. दहावे शतक ) ह्या काव्याचा निर्देश आहे. प्रौढ भाषा, कल्पनारम्य मांडणी आणि भावार्तता या गुणांनी मंडित असलेले हे स्तोत्र आजही अनेकांच्या पठनात आहे. सोमेश्वराच्या रामशतक ह्या स्तोत्रात शतककाव्याची परंपरा दिसते. बुधकौशिकाची रामरक्षा हे एक अत्यंत लोकप्रिय असे स्तोत्र आहे.
कुलशेखरकृत मुकुंदमाला ( दहावे शतक ) हे स्तोत्र दक्षिणेतील आळवारांच्या वैष्णव स्तोत्रांत महत्त्वाचे मानतात. रामानुजांचे (१०१७—११३७) गुरू यामुनाचार्य ( तमिळ नाव आलबन्दार ) ह्यांचे स्तोत्ररत्न हे आलबन्दार स्तोत्र म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. भक्तिमार्गातील ‘ प्रपत्ति ’ ( शरणागती ) ह्या भावाचे सुंदर निदर्शन ह्या काव्यात आहे.
लीलाशुकरचित श्रीकृष्णकर्णामृत ( सु. अकरावे शतक ) हे चैतन्य-महाप्रभूंचे प्रिय स्तोत्र मानले जाते. त्यांनी ते दक्षिणेतून बंगालमध्ये नेले, अशी प्रसिद्धी आहे. मधुसूदन सरस्वतींचे ( सोळावे शतक ) आनंदमंदाकिनी (१०२ श्लोक ) हे स्तोत्र रसस्निग्ध, मधुर आहे.
कविराज ⇨ जगन्नाथपंडिता ने ( सतरावे शतक ) गंगालहरी वा पीयूषलहरी, अमृतलहरी ( यमुनास्तुती ), करुणालहरी, लक्ष्मीलहरी आणि सुधालहरी ( सूर्यस्तुती ) ह्या पाच लहरी रचिल्या. प्रौढ रचना, प्रसन्न प्रवाहिता, मनोरम पदावली आणि कल्पनाविलास ह्या गुणांनी त्या मंडित आहेत. ह्या काव्यरचनांमधील — विशेषतः गंगालहरी तील — स्निग्ध भक्तिभाव मनाला खोलवर स्पर्शून जातो.
स्तोत्ररचना जैन आणि बौद्ध परंपरेतही झालेली दिसते. सिद्धसेन दिवाकराचे ( इ. स. पाचवे शतक ) कल्याणमंदिर स्तोत्र आणि मान-तुंगाचार्यांचे ( इ. स. सहावे शतक ) भक्तामरस्तोत्र ही प्रसिद्ध आहेत. दोन्हींमध्ये भक्तितत्त्वाचा सहृदय, लालित्यपूर्ण आविष्कार झालेला आहे. आचार्य हेमचंद्र सूरींचे ( अकरावे शतक ) द्वात्रिंशिका हे महावीरस्तुतींचे प्रौढ, दार्शनिक स्तोत्र होय.
बौद्धांच्या महायान पंथात बरीच स्तोत्रे आहेत. त्यांपैकी नागार्जुनाचे चार श्लोकांचे चतुःस्तव स्तोत्र बुद्धाची स्तुती आंतरिक उमाळ्याने करते.
स्तोत्ररचनांमधून आस्तिक्यबुद्धी, रक्षण करण्याच्या आणि उद्धरणाच्या सामर्थ्यावर विश्वास, उत्कट भक्तिभाव, देवाची करुणा भाकून जीवनसाफल्य साधण्याची तळमळ दिसून येते. धार्मिक भावनेतून स्तोत्रसाहित्याचा जो विकास घडून आला, त्याचे पुढील विशेष दिसतात :
मूळ वैदिक देवतांव्यतिरिक्त भक्तिपंथातील आणि पुराणांतील अनेक देवता — उदा., विष्णू, शिव, गणपती, देवी, ब्रह्म, राम, कृष्ण, दत्तात्रेय, गंगादि नद्या, तीर्थे, सूर्य इ. — स्तोत्रविषय झाल्या. अनुष्टुभासारख्या आरंभीच्या साध्या, सरळ छंदाऐवजी स्त्रग्धरा, शिखरिणी, शार्दूलविक्रीडित, वसंततिलका आणि प्रदीर्घ दण्डक ( मालती माधवातील चामुण्डा स्तुती ) अशी वृत्ते रचनांतून योजिली गेली. प्रासादिक सरळ रचनेपासून दीर्घ समास, अनुप्रासयुक्त रचना, कल्पनाविलास इ. काव्यगुणांनी मंडित आणि देवाच्या सहस्त्रनामांची यादी देणारी किंवा अंगप्रत्यगांच्या रक्षणाचे आवाहन करणारी काव्यहीन शैलीही स्तोत्रांमध्ये आढळते. भक्तिभाव प्रकट करताना दैवताच्या मूर्त रूपाचे नखशिखान्त वर्णन अनेक स्तोत्रांत आढळते. भक्तिपंथात देवाचे नावही तारक ठरत असल्याने विष्णुसहस्त्रनामा सारखी स्तोत्रेही महत्ता पावली. काव्यगुणांपेक्षा पुण्यसंपादनाचा हेतू येथे अधिक महत्त्वाचा ठरलेला दिसतो. भक्ताने आपले दैन्य प्रकट करून भवसागर पार करण्यासाठी मोक्षाची याचना करावी, हा स्तोत्रांतून प्रकट होणारा एक मुख्य भाव. त्यास अनुसरून तन्मयता, तळमळ, उत्कट भक्ती अनेक स्तोत्रांतून प्रत्ययास येते.
पहा : संस्कृत साहित्य ( लघुकाव्ये ).
भट, गो. के.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..