स्कोलेसाइट : हे झिओलाइट गटातील खनिज असून नॅट्रो-लाइटाशी याचे साम्य आहे. याचे स्फटिक एकनताक्ष, बारीक सुईसारखे व प्रचिनाकार असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. हे संपुंजित, तंतुमय, नाजुक अरीय त्रिज्यीय मांडणीचे पुंज व ग्रंथिल रूपांतही आढळते. ⇨ पाटन (110) जवळजवळ परिपूर्ण कठिनता ५ — ५.५ वि. गु. २.१६ — २.४० रंगहीन वा पांढरे पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे काहीसे पारभासी चमक काचेसारखी, तंतुमय प्रकाराची रेशमासारखी [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. [CaA12Si3O10 3H2O]. अम्लाबरोबर याचे नॅट्रोलाइटाप्रमाणे जिलेटिनीकरण होते.

स्कोलेसाइट हे मेसोलाइट, एडिंग्टनाइट व गोनार्डाइट या खनिजांबरोबर आढळते. हे द्वितीयक ( नंतरच्या क्रियांनी तयार झालेले ) खनिज आहे. हे जर्मनी, स्वित्झर्लंड, आइसलँड, फेअरो बेटे व ग्रीनलंड येथे आढळते. थळ घाट, पुणे व लोणावळा परिसर येथे हे ⇨ दक्षिण ट्रॅप खडकांतील पोकळ्यांमध्ये सूक्ष्म स्फटिकांच्या रूपात आढळते. कृत्रिम रीतीने बनवि-लेल्या या निर्जलीकृत खनिजाला मेटास्कोेेलेसाइट हे नाव मुळात दिले होते. मात्र तापविले असता हे कृमीप्रमाणे कुरळे होते. यामुळे कृमी अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे स्कोलेसाइट हे नाव पडले आहे.

पहा : झिओलाइट गट नॅट्रोलाइट.

ठाकूर, अ. ना.