क्लोजपेट ग्रॅनाइट : कर्नाटक राज्याच्या जवजवळ मध्य भागातून, उत्तर-दक्षिण दिशेने सु. १९० किमी. जाणारा व सु. १८ किमी. रुंदीचा ग्रॅनाइटी खडकांचा एक पट्टा आहे. त्या पट्ट्यातील ग्रॅनाइटांना क्लोजपेट ग्रॅनाइट म्हणतात. ग्रॅनाइट, ॲडॅमेलाइट व ग्रॅनोडायोराइट असे ग्रॅनाइटांच्या गटातले सर्व प्रकार या पट्ट्यात आढळतात. या खडकांचा रंग सामान्यतः गुलाबी किंवा राखी असून त्यांची संरचना पृषयुक्त (पॉर्फिरिटिक) असते म्हणजे त्यांच्यातील बृहत्स्फट (मोठे स्फटिक) फेल्स्पारांचे असून ते बरेच मोठे असतात व ते भरडकणी आधारकात बसविल्यासारखे असतात. खडकांची संरचना सामान्यतः पट्टित असते म्हणून त्यांना क्लोजपेट पट्टिताश्म असेही म्हणतात. हे खडक आर्कीयन कालीन पायाभूत खडकांत व द्वीपकल्पी पट्टिताश्मांत अंतःक्षेपित झालेले (घुसलेले) असल्यामुळे अर्थातच त्यांच्यापेक्षा नवे आहेत, तसेच एकूण आर्कीयन महाकल्पातील खडकांपैकी ते सर्वांत नवे आहेत.

पहा : आर्कीयन.

केळकर, क. वा.