सोम : एक वनस्पती. तिच्या पानांचा रस मधुर, तीव्र, मदकारक, रसवान आणि बलप्रद असल्याचा निर्देश ऋग्वेदात आहे (६·४७·१-२). ह्या वनस्पतीचा रंग हिरवट, काळसर आणि तांबूस असा विविध प्रकारे वर्णिलेला आहे. सोम हा दूरस्थ द्युलोकातून श्येन पक्ष्याने आणला, असा ऋग्वेदात उल्लेख आहे (४.२६·६). सोमरस हा इंद्रादी देवांना, तसेच यज्ञांत सहभागी होणाऱ्या ऋत्विजांना अत्यंत प्रिय होता. बैलाचे कातडे पसरलेल्या एका लाकडी फळीवर सोमाची पाने ठेवून त्यांचा रस काढण्यासाठी ती दगडाने ठेचीत नंतर एका चाळणीतून तो रस गाळून घेतला जाई. सोम ठेचण्यासाठी वापरल्या जाणाज्या दगडांना ‘अग्नी’, ‘ग्रावा’ अशा संज्ञा होत्या. सोम ठेचणाऱ्यांना ‘ग्रावन’ म्हणत. सोमाच्या अंशूंना (अंकुरांना) ठेचल्यावर त्यांतून निघणारा रस दुधासारखा शुभ्र असल्यामुळे या क्रियेला ‘सोमदोहन’ म्हणत. ⇨ सोमयाग ह्या एका श्रौतयागात सोम हेच मुख्य हवनीय द्रव्य असते. सोमाला एक देवता म्हणूनही मान्यता मिळाली होती. ऋग्वेदाचे नववे मंडल हे निरनिराळ्या ऋषींनी रचलेल्या स्फुट स्वरूपाच्या सोमसूक्तांचे संकलन आहे. सोम हा अमरत्व देणारा, भक्तवत्सल, द्यावापृथ्वी आणि अंतरिक्ष व्यापणारा आहे (९.२२·४-५) असे एका सूक्तात म्हटले आहे. सोमरसात दूध, मध आणि तूपही मिसळत.

सोमयागासाठी सोमवल्ली विकत घेण्यासाठी अध्वर्यू सोमवल्लीची किंमत म्हणून सोम विकणाज्याला दहा वस्तू मूल्य म्हणून देत असे : (१) गाय, (२) नुकतीच व्यायलेली गाय, (३) कालवड, (४) खोंड, (५) गाडीला चालेल असा बैल, (६) व (७) गायबैलाचे जोडपे, (८) सोने, (९) वस्त्र, (१०) शेळी. सोम विकणाऱ्याची अधिक अपेक्षा असल्यास त्याला म्हैस, घोडा अशा आणखीही वस्तू दिल्या जात. सोमवल्ली ही केवढी मूल्यवान होती हे ह्यावरून दिसून येते.

सोमपान कोणी करावे, ह्याबद्दलही काही नियम होते. ज्याच्या पूर्वीच्या दहा पिढ्यांत सदाचारी व्यक्तीच होऊन गेल्या आणि कोणताही अनाचार झालेला नाही, असा मनुष्यच सोमप्राशनाचा अधिकारी मानला जात असे. शिवाय ज्याच्या घरात आहे, आर्थिक सुबत्ता आहे नोकरचाकरांना तीन वर्षे पुरेल इतके धान्य ज्याच्या घरात आहे असा माणूस सोमपानास योग्य समजला जाई.

प्रातःकाळी, दुपारी आणि सायंकाळी ह्याप्रमाणे दिवसातून तीन वेळा सोमरस पिळला जाई. त्याला सवन म्हणत. पहिल्या दोन सवनांमध्ये इंद्राला बोलवीत, तर सायंकाळच्या सवनात ऋभुगणांना. इराणी आर्य सोम ह्या वनस्पतीला ‘हओम’ म्हणत. सोम ही नेमकी कोणती वनस्पती होती, हे आज सांगता येत नाही. काहींच्या मते ती भांग असावी, तर काहींच्या मते मद्यार्क तथापि सोमरस आनंददायक असला, तरी मादक नव्हता, असेही म्हटले जाते.

पहा : सोमयाग.

कुलकर्णी, अ. र.