सोपस्टोन : हा मुख्यतः संपुंजित संगजिऱ्याचा बनलेला घट्ट असा रूपांतरित खडक आहे. यातील संगजिरे कणमय किंवा गूढ स्फटिकी असते. सुभाजा खडकासारखा किंवा आंतरगुंफित पोत आणि साबणासारखा किंवा तेलकट पदार्थासारखा मऊ स्पर्श ही या खडकाची वैशिष्ट्ये आहेत. याचा रंग पांढरा ते करडा व करडसर हिरवा असतो. हा नखाने ओरखडा काढता येण्याएवढा मऊ असल्याने सहजपणे कापता व कोरता येतो. हा चांगला विद्युत् निरोधक असून याच्यावर उच्च तापमान व अम्ले यांचा परिणाम होत नाही. याची रचना सर्वत्र एकसारखी असल्याने हा कोरीव कामासाठी उपयोगी उपयुक्त आहे. यापासून कोरीव कामाद्वारे भांडी, वाडगे वगैरे बनवितात म्हणून याला पॉटस्टोन असेही म्हणतात. स्टिॲटाइट व सोपरॉक ही याची अन्ये पर्यायी नावे आहेत.
कमी तापमान व मध्यम दाब या परिस्थितीत पाण्याच्या उपस्थितीत पेरिडोटाइटा- सारख्या अग्निज खडकांच्या रचनेत व रासायनिक संघटनात बदल होऊ न सोपस्टोनचे कमी-जास्त जाडीचे थर तयार होतात. संगजिरे सुभाजा यासारख्या सुभाजा खडकांत हा प्रमुख घटक म्हणून आढळतो. सामान्यपणे याच्याबरोबर सर्पेंटिनाइट, डोलोमाइट इतर मॅग्नेशियमयुक्त खडक आढळतात. कॅनडा, फ्रान्स, इटली, अमेरिका इ.देशांत सोपस्टोन आढळतो. भारतीय द्वीपकल्पातील ⇨ आर्कीयन व ⇨ धारवाडी संघातील खडकांत सोपस्टोन आढळतो. आंध्र प्रदेश,तमिळनाडू, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांत याचे साठे आहेत.
सोपस्टोनच्या वरील गुणधर्मांमुळे त्याचे अनेक व व्यापक उपयोग होतात. प्रयोगशाळेतील टेबलावरील फरश्या, तेथील कुंडे, काही रासायनिक साधनसामग्री, छत इत्यादींसाठीही याच्या फरश्या वापरतात. याचे चूर्ण सौंदर्यप्रसाधने, कागद, रंगलेप, रबर, कीटकनाशके, ओतकाम इत्यादींमध्ये भरणद्रव्य म्हणून वापरतात. यामुळे या उत्पादनांची गुणवत्ता सुधारते. उदा., कागद गुळगुळीत होतो. इमारतीमधील शोभेचे काम, स्वस्त सेरॅमिक द्रव्य (उदा., रडार, रेडिओ, दूरचित्रवाणी संच इत्यादींमधील घटक) साखरनिर्मिती, वायुज्वालकाचे प्रोथ खास प्रकारचे उच्चतापसह पदार्थ व पोर्सेलीन, झीज घडवणाऱ्या संक्षारक धातुमळीपासून संरक्षण करण्याची सामग्री, पोलादाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे उच्च दर्जाचे रंगलेप, निरोधक स्विचफलक, स्नानगृहातील साधनसामग्री वगैैरे असंख्य गोष्टींमध्ये सोपस्टोनचा उपयोग करतात.
शिंप्याचा खडू (फ्रेंच चॉक), मूर्ती, नामफलक, जाळ्या, शोभिवंत वस्तू यांसाठीही सोपस्टोन वापरतात.
पहा : संगजिरे.
ठाकूर, अ. ना.