सेरामपूर : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुबळी जिल्ह्यातील प्रमुख शहर. लोकसंख्या १,८३,३३९ (२०११ अंदाजे). हे कोलकात्याच्या उत्तरेस सु. २० किमी.वर भागीरथी नदीकाठी वसलेले आहे. हे प्रसिद्ध ग्रँड ट्रंक मार्गावर असून लोहमार्गांनी इतर मोठमोठ्या शहरांशी जोडले आहे. १७५२ मध्ये शेवराफुलीचा राजा मनोहर रॉय याने येथे श्रीरामचंद्राच्या पुतळ्याची स्थापना केली. श्रीरामचंद्र या देवतेच्या नावावरून यास श्रीरामपूर हे नाव पडले असे मानतात.

याचे सेरामपूर हे इंग्रजी नाव (श्रीरामपूर-बंगाली) आधुनिक आहे. १७५७ मध्ये डच लोकांनी याचे नामकरण फ्रेडरिकनगर असे केले होते. डच लोकांची येथे वसाहत होती. १८४५ मध्ये हे इंग्रजांच्या आधिपत्याखाली आले. लोकसंख्येची जास्त घनता असलेले जिल्ह्यातील हे एक शहर आहे. हातमागावरील विणाईचे हे प्रमुख ठिकाण होते. येथे कापूस कताई, सुती कापड, औषधे, काच, कापडी पिशव्या तयार करणे इ. उद्योग चालतात. येथील रोमन कॅथलिक चर्च, सेंट ओलाफ चर्च, अल्‌दीन हाऊस, हेन्री मार्टिन पॅगोडा, मदनमोहन मंदिर, राधाबल्लव मंदिर, गंगाघाट इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.