सेंट पीटर्झबर्ग – २ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडा राज्याच्या पाइनेलस कौंटीतील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या २,४४,७६९ (२०१०). हे फ्लॉरिडाच्या पश्चिम किनाऱ्यावर, पाइनेलस द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास, क्लिअरवॉटरच्या आग्नेयीस २५ किमी. व टँपाच्या नैर्ऋत्येस ३० किमी. टँपा उपसागरावर वसलेले आहे. हे टँपा शहराशी पुलाने जोडलेले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

स्पॅनिश शोधक पानफिलो द नार्व्हाएस आणि एर्नांदो दे सोतो हे या भागास भेट देणारे पहिले यूरोपियन होते. डिट्रॉइटचा जॉन सी. विल्यम्स व पीटर ए. डेमेन्स यांनी हे १८७६ मध्ये वसविले. डेमेन्स याच्या रशियातील जन्मस्थळावरून याचे सेंट पीटर्झबर्ग हे नामकरण झाले आहे. जहाजवाहतुकीचे केंद्र म्हणून हे विकसित झाले असून, येथे मासेमारी, सिमेंट, विद्युत् साहित्यनिर्मिती, शिंपल्यांच्या विविध वस्तू तयार करणे इत्यादी उद्योग चालतात. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. येथे वर्षभर सूर्यप्रकाश असल्याने यास ‘ सनशाईन सिटी’ म्हणतात.

येथील स्टेट्सन विद्यापीठाचे विधी महाविद्यालय, सेंट पीटर्झबर्ग कनिष्ठ महाविद्यालय, एकार्ड महाविद्यालय (पूर्वीचे फ्लॉरिडा प्रेस्बिटेरियन महाविद्यालय, १९५८) या शैक्षणिक संस्था महत्त्वाच्या आहेत. येथे सागरविज्ञान संशोधन केंद्र आहे. येथील पुळणी, जलक्रीडा प्रकार, ललितकला संग्रहालय, नौकाशर्यती, कुत्र्यांच्या शर्यती, बेफ्राँट प्रेक्षागृह, सनकेन बगीचा इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

लिमये, दि. ह.