केसतूट : त्वचेतील केशपुटक (केसाचे मूळ जेथे असते तो त्वचेवरील खोलगट भाग) आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ग्रंथींचा व इतर ऊतकांचा (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांचा) स्थानिक शोथ (दाहयुक्त सूज) आणि त्यामुळे होणाऱ्या विद्रधीला (गळूला) ‘केसतूट’ किंवा ‘केसतूड’ म्हणतात.

केसतूट बहुधा स्टॅफिलोकॉकस ऑरियस  या सूक्ष्मजीवाच्या संसर्गामुळे होतो. काख, जांघ वगैरे ज्या भागांत जास्त घाम येण्याची प्रवृत्ती असते अथवा ज्या भागावर घर्षण अधिक होते, तेथील त्वचेवर केसतूट होण्याचा संभव अधिक असतो. प्रयोगशाळेत संवर्धित केलेले स्टॅफिलोकॉकस ऑरियस  हे सूक्ष्मजीव त्वचेवर घासले असता केसतूट उत्पन्न करता येते.

सुरुवातीस केशमूलाशी एक लालसर फोड दिसू लागतो. हा फोड वाढत जाऊन तेथे वेदना होऊ लागतात. ज्वरही येतो. काही वेळा या अवस्थेत केसतूट जिरून जाते. तसे न झाल्यास सूज व वेदना वाढतात, धक्का लागल्यास तीव्र वेदना होतात. फोडाच्या मध्यभागी केस असून त्याच्याभोवती पांढरट, पिवळट असा ठिपका दिसतो त्याच्याभोवती काळसर लाल, घट्ट भाग दिसतो. ग्रस्त भागातून लसीकेचे (ऊतकातून रक्तात जाणाऱ्या रक्तद्रवाशी साम्य असलेल्या पदार्थांचे) वहन करणाऱ्या लसीका ग्रंथी (लसीका पेशींचा परिवेष्टित पुंजका) सुजून दुखू लागतात. त्याला ‘अवधाण’ असे म्हणतात. नंतर हे केसतूट फुटून केस व त्याच्या मुळाभोवती तयार झालेली घट्ट पुवाची ‘बी’ बाहेर पडल्याबरोबर वेदना थांबतात आणि जखम भरून येते. स्टॅफिलोकॉकस ऑरियसाचा प्रतिरोध करण्याची शक्ती ज्या व्यक्तीत कमी झालेली असते अशा अशक्त, मधुमेही वा क्षयरोगग्रस्त रुग्णांत केसतुटे वारंवार उठतात. क्वचित प्रसंगी या सूक्ष्मजीवामुळे अस्थिमज्जाशोथ (हाडांच्या पोकळीत असणाऱ्या ऊतकाची दाहयुक्त सूज), परिवृक्कविद्रधी (मूत्रपिंडाच्या आवरणावरील गळू) किंवा काळपुळी असे उपद्रव संभवतात.

चिकित्सा : कोरडा शेक, पोटीस किंवा लघुतरंग ऊतकतापन (लघुतरंग विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने ऊतकात उष्णता निर्माण करणे) यांचा उपयोग केल्यास केसतूट सत्वर बरे होते. जंतुनाशक द्रव्य पाण्यात टाकून त्या पाण्याने शेक दिल्यास वारंवार केसतुटे होण्याचे थांबते. पिकलेल्या केसतुटातील केस उपटून टाकल्यास ‘बी’ लौकर बाहेर पडते.

पेनिसिलीन व इतर प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांमुळे केसतुटे त्वरित जिरतात, परंतु नवीन होणारी केसतुटे उत्पन्न होण्याचे थांबतेच असे नाही.

मधुमेहादी ज्या दुसऱ्या रोगांमुळे केसतुटे होण्याची प्रवृत्ती होते, त्यांची चिकित्सा करावी लागते. शिवाय सात्त्विक, जीवनसत्त्वयुक्त आहार, विश्रांती व ग्रस्त भागाची स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे आहे. केसतुटातील स्टॅफिलोकॉकस ऑरियसापासून लसीची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) केल्यास केसतुटे वारंवार उत्पन्न होण्याची प्रवृत्ती नाहीशी होते.

ढमढेरे, वा. रा. 

आयुर्वेदीय चिकित्सा : खाण्यापिण्यामध्ये शेवग्याचा पाला, शेवग्याच्या शेंगा यांचा उपयोग केसतुटाच्या काळात करावा. पण शरीरात वारंवार केसतूट होण्याची सवय जाण्याकरिता शेवग्याच्या पाल्याची किंवा सालीची चटणी वाटून किंवा रस काढून लेप करावा.  

जोशी, वेणीमाधवशास्त्री