धामण-२ : (हिं. गुरभेली, फारसिमा लॅ. ग्रेविया स्कॅब्रोफिला, ग्रे. स्क्लेरोफिला कुल-टिलिएसी). ह्या लहान झुडपाचा प्रसार उष्ण कटिबंधीय हिमालयात कुमाऊँपासून आसामपर्यंत सु. १,२४० मी. उंचीपर्यंत आहे. याची साल भुरकट हिरवी आणि खरबरीत खोड सु.२ मी. उंच आणि काष्ठयुक्त पाने साधी व एकाआड एक, रुंदट, दीर्घवृत्ताकार किंवा अल्पवर्तुळाकार आणि दंतुर. पांढरी फुले चामरकल्प वल्लरीवर [→ पुष्पबंध] येतात अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ साधारण गोलसर मोठ्या जरदाळूएवढे असून कवच कठीण व मगज (गर) गोड, चिकट, जांभळा व खाद्य असतो. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ टिलिएसी कुलात (परुषक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे व खांबासाठी होतो. खोडापासून वाख निघतो व त्याचे दोर करतात. मुळे खोकल्यावर व आंतडे व मूत्राशय यांचा दाह यांवर उपयुक्त मुळांचा काढा वेदनाशामक असून बस्तीकरिता देतात. ⇨ फालसामध्ये व ⇨ धामणी मध्ये वर्णिलेल्या दुसऱ्या जातींनाही धामण म्हटल्याचे आढळते. ⇨ खटखटी  व गुळगोळप, ⇨ असोलीण  या जाती परुषक कुलात अंतर्भूत आहेत यांच्या गुणधर्मांत साम्य आढळते.

जमदाडे, ज. वि.