केवलानंदसरस्वती : (८ डिसेंबर १८७७–१ मार्च १९५५). महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित. पूर्वाश्रमीचे संपूर्ण नाव नारायण सदाशिव मराठे. जन्म कुलाबा जिल्ह्यतील सुडकोली गावी. ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्‍मय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींत पारंगत. शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही झाले. नव्य-न्यायाचे व शांकर अद्वैत वेदान्ताचे अध्ययन, १८९५ मध्ये वाई येथे आल्यावर झाले. अध्यात्मविद्येचे अध्ययन प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी झाले. वाई येथे स्वतःची पाठशाळा १९०१ पासून सुरू केली. त्याच पाठशाळेचे ‘प्राज्ञपाठशाळा’ असे नामकरण १९१६ साली केले. दिनकरशास्त्री कानडे, महादेवशास्त्री दिवेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इ. त्यांचे नामवंत शिष्य.

केवलानंदसरस्वती

१९२० साली प्राज्ञपाठशाळेस राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. त्यातून अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले. १९२५ साली धर्मकोशाच्या कार्यास प्रारंभ केला. संस्कृतमध्ये मीमांसाकोश (७ खंड, १९५२–६६) संपादन केला.  हिंदुधर्मसुधारणेची चळवळ चालू ठेवण्याकरिता १९३४ साली म. म. डॉ. ⇨पां. वा. काणे , रघुनाथ शास्त्री कोकजे, केशव लक्ष्मण दप्तरी, ⇨ना. गो. चापेकर, ज.र. घारपुरे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक इ. विद्वानांच्या साहाय्याने, धर्मनिर्णयमंडळ  स्थापिले (१९३४). ब्रह्मचर्यातूनच १९३१ साली त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर बद्रीनाथची पायी यात्रा केली. करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे ते निधन पावले. त्यांचे तेथे स्मारकमंदिर उभारले असून तेथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. १९७५ पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश  धर्मकोश  ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली.

जोशी, रंगनाथशास्त्री