केवली : जैन दर्शनानुसार केवलज्ञान प्राप्त झालेल्यांना ‘केवली’ म्हणजे सर्वज्ञ म्हणतात. ज्ञानवरणीय, दर्शनावरणीय, वेदनीय, मोहनीय, आयू, नाम, गोत्र व अंतराय ही आठ कर्मे जैन धर्मात सांगितली असून, यांतील ज्ञानावरणीय, दर्शानावरणीय, मोहनीय व अंतराय ह्या चारांना ‘घातिकर्मे’ (आत्म्याच्या ज्ञानादी गुणांचा घात करणारी कर्मे) म्हटले आहे. जीवाचे ज्ञान-दर्शनादी गुण कर्मामुळे झाकले जातात. तपाचरणाने ही घातिकर्मे नष्ट केली म्हणजे, आत्म्याचे मूळ गुण प्रकट होतात व केवलज्ञानप्राप्ती होते. अशा साधूलाच ‘केवली’ म्हणतात. तो सर्वज्ञ व सर्वदर्शी असतो.

सर्व जैन तीर्थंकर हे केवली असतातच आणि केवलज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांना ‘जिन’ पद प्राप्त होऊन ते धर्मप्रवर्तनासाठी विहार करतांत. ⇨ गुणस्थानदृष्ट्या तेराव्या व चौदाव्या गुणस्थानात साधू केवली अवस्थेत असतो व आयुकर्म संपल्याबरोबर तो ‘सिद्ध’ पदवीला जातो.

मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनःपर्यायज्ञान व केवलज्ञान असे ज्ञानाचे पाच प्रकार असून त्यांतील केवलज्ञानच परिपूर्ण, प्रत्यक्ष व इंद्रियातीत ज्ञान आहे. केवलज्ञानप्राप्तिपूर्वी एखाद्याला पहिली चार ज्ञाने असू शकतात परंतु केवलज्ञान प्राप्त होताच ती नाहीशी वा हतप्रभ होतात.

केवली व जीवन्मुक्त यांत बरेच साम्य आहे. केवली हा जवळजवळ सिद्धच असतो. फक्त त्याची अघातिकर्मेच तेवढी संपावयाची असतात. जीवन्मुक्त हाही विकाररहित, द्वंद्वातीत, संसारबंधमुक्त झालेला व परमज्ञानी असतो. दोघेही कृतकृत्य असतात तथापि त्यांच्यातील भेद इतकाच, की केवली सिद्धपदवीस प्राप्त झाल्यावर त्याच्या आत्म्यास स्वतंत्र अस्तित्व असते, तर जीवन्मुक्त हा मुक्ती प्राप्त झाल्यावर ब्रह्मतत्त्वात विलीन होतो.

संदर्भ : विजयराजेंद्रसूरीश्वर, अभिधानराजेन्द्र:, भाग तिसरा, रतलाम, १९१४.

पाटील, भ. दे.