कुरुवंश (पौराणिक) : महाभारतकाली सुप्रसिद्ध असलेल्याकुरुवंशाचा उल्लेख ऋग्वेदात येत नाही. ऋग्वेदकाली विख्यात असलेल्या तृत्सु, भरत व पूरु या आर्यवंशाचे मीलन होऊन त्यांना पुढे ‘कुरू’ हे नाव प्राप्त झाले असावे. हे वंश प्राचीन काळी कुरूदेशाच्या जवळपास राज्य करीत होते. भरत वंशाच्या राजांनी सरस्वती, दृशद्वती आणि आपया या नद्यांच्या काठी यज्ञ केल्याचे वर्णन वेदांत येते. या प्रदेशालाच पुढे कुरू प्रदेश हे नाव मिळाले. तृत्सु परुष्णीच्या पूर्वेस राज्य करीत होते आणि पूरु सरस्वतीच्या दोन्ही तीरांवर होते. पूरुवंशातील नंतरच्या एका राजास कुरू-श्रवण असे नाव होते. त्यावरूनही त्याच्या काळी या वंशांचे मीलन झाले होते असे दिसते.

महाभारतात कुरुवंश ऐल पुरूरवस यापासून उत्पन्न झाला असे म्हटले आहे. या वंशातील आयु, ययाति, पूरु, भरत, दौष्यंति, शंतनु, विचित्रवीर्य, धृतराष्ट्र इत्यादी अनेक राजांचा उल्लेख वैदिक वाङ्‌मयात येतो. विचित्रवीर्याला धृतराष्ट्र आणि पांडू असे पुत्र झाले. त्यांच्या वंशजांना अनुक्रमे कौरव व पांडव अशी नावे पडली. भारतीय युद्धात कौरवांचा समूळ उच्छेद झाला, पण पांडव वंशातील अभिमन्युपुत्र परीक्षित्‌ व त्याचा पुत्र जनमेजय यांनी पुढे राज्य केले या दोघांचे उल्लेख शतपथ ब्राह्मण इ. वैदिक वाङ्‌मयात येतात. जनमेजयाच्या भीमसेन, उग्रसेन आणि श्रुतसेन या भावांचा आणि त्यांनी केलेल्या अश्वमेध यज्ञांचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात व शांखान श्रौतसूत्रात आढळतो. जनमेजयाचा पणतू अधिसीमकृष्ण याचा उल्लेख उत्तरकालीन पौराणिक कालगणनेत येतो. जनमेजयाचा पुतण्या अभिप्रतारिन्‌ याचे वंशज बलाढ्य राजे होऊन गेले, असे पंचविंश ब्राह्मणात म्हटले आहे. पुराणात म्हटले आहे, की गंगेच्या पुरामुळे हस्तिनापूर उद्‌ध्वस्त झालेतेव्हा कुरुवंशाला आपली राजधानी कौशाम्बी (प्रयागजवळचे आधुनिक कोसम) येथे हलवावी लागली. 

मध्ययुगीन काळातील राजवंश आपला संबंध प्राचीन विख्यात राजवंशाशी जोडू लागले, तेव्हा विंध्य प्रदेशातील कर्करेडिका (सध्याचे ककरेडी) येथील काही राजांनी (बारावे शतक) आपल्या दानपत्रांत आपण कौरव वंशात उत्पन्न झाल्याचा साभिमान उल्लेख केलेला आढळतो.  

मिराशी, वा. वि.