खिडकी : इमारतींच्या बाहेरील आणि आतील भिंतींत हवा व प्रकाश येण्यासाठी लाकडी अथवा धातूच्या चौकटीत झडपा बसविलेल्या असतात. अशा प्रकारच्या चौकटीला वा सांगाड्याला खिडकी असे म्हणतात. विविध प्रकारच्या वास्तूंमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या खिडक्या असतात. खिडक्यांचा मुख्य हेतू हवा व प्रकाश यांचे नियंत्रण हा असला तरी संरक्षण, शोभादायकता, आसमंताचे दर्शन यांसारखे इतर हेतूही त्यांमागे असतात. वास्तूच्या माळवदात वा गच्चीमध्ये बसविलेल्या धाऱ्यांमुळे उजेडाचे उद्दिष्ट साधले जाते. अशी रचना बहुधा माजघर, स्वयंपाकघर, ह्यांसाठी वापरली जाते. पुरातनकाळी खिडक्या प्रायः लाकडाच्या असत. क्वचित प्रसंगी धातूच्याही खिडक्या असल्याचे दाखले आहेत. आजकाल लाकडाप्रमाणेच लोखंड, ॲल्युमिनियम व ब्राँझ यांसारख्या धातूंच्याही खिडक्या वापरात येऊ लागल्या आहेत. खिडक्यांसाठी प्लॅस्टिकच्या सांगाड्यांचा वापर अद्याप प्रयोगावस्थेत आहे.

पट्ट्यांची खिडकी

खिडकीचे प्रमुख भाग म्हणजे कमानीत बसणारी चौकट व त्या चौकटीत बसणाऱ्या झडपा हे होत. याशिवाय खिडकीचा एक प्रमुख भाग म्हणजे कलमदान (व्हेंटिलेटर) हा होय. झडपा अथवा कलमदाने लाकडाच्या अथवा धातूच्या चौकटीत लाकडी फळ्या, धातूंची वा काचेची तावदाने, पट्ट्या (लूव्हर्स) किंवा जाळ्या बसवून करतात. खिडकीच्या अन्य भागांवर कोरीव काम अथवा रंगीबेरंगी कलाकुसरही केलेली आढळते.

अश्मयुगात डोंगरकपारीत असलेल्या नैसर्गिक झरोक्यांतून तसेच गुहेच्या प्रवेशद्वारातून हवा व उजेड येत असे. नवाश्मयुगीन मानव झोपडीसाठी अथवा तंबूसाठी चौकटीविरहित झडपा असलेल्या लहान खिडक्यांची योजना करीत असे. अशा झडपांसाठी वाळलेले गवत, पाने अथवा कातडी यांचा उपयोग होत असे. ईजिप्तमध्ये सर्वसाधारणपणे प्रासाद व देवालये यांसाठी खिडक्यांची योजना करीत नसत कारण अतीतीव्र तापमानामुळे खिडक्यांतून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आतील तपमान दुःसह होत असे. अशा परिस्थितीत अप्रत्यक्ष उजेड व हवा येण्यासाठी अधिवातायनाची (क्लिअरस्टोरी विंडो) योजना केलेली असे. या रचनेसाठी मध्यवर्ती भागातील खांब इतर भागातील खांबांपेक्षा जास्त उंच ठेवले जात व त्यांमधील जागेतून दगडी कोरीव जाळ्यांची योजना केलेली असे. या रचनेमुळे प्रत्यक्ष सूर्यकिरण आत प्रविष्ट न होता भरपूर उजेड व हवा येत असे. अशा प्रकारे तपमान व वातप्रवाह नियंत्रित ठेवून या खिडकीचा वापर विशिष्ट योजनेने होत असे. बाहेरील भिंती जाड आणि खिडकीविरहित असल्यामुळे भिंतीच्या अंतःपृष्ठावर कोरीव काम करण्यास अथवा भित्तिचित्रे रंगविण्यास भरपूर वाव निर्माण झाला. त्याचा त्या काळच्या कारागिरांनी भरपूर फायदा घेतल्याचे आढळते.

खिडकी ३

मध्यपूर्वेत बॅबिलोनियन, ॲसिरियन आणि इराणी प्रासादांतही खिडक्यांचा अभाव याच कारणासाठी आढळतो. फक्त अशा प्रासादांत अधिवातायनांऐवजी भिंतीत अथवा छपरात अरुंद नलिकांद्वारे केलेली झरोकेवजा योजना असे. ह्या प्रासादांत हवा व उजेडाचे प्रमुख साधन म्हणजे मध्यवर्ती चौकात उघडणारे दरवाजे होत. ग्रीक साम्राज्यातही सर्वसाधारणपणे देवालयांत व प्रासादांत खिडक्यांचा अभाव असे. ग्रीक देवालयांत पूर्वाभिमुख दरवाजांच्या व छपरांच्या मध्यभागी असलेले खुले भाग ही हवा आणि उजेड येण्याची प्रमुख साधने होती. काही देवालयांत  ईजिप्तमधील देवालयांप्रमाणे अधिवातायनाची रचना केलेली आढळते. ख्रिस्तपूर्व रोमन साम्राज्यात, विशेषतः देवालयांत, खिडक्यांचा अभाव असे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देवालयांची रचना ग्रीक धर्तीवर केलेली असे. परंतु त्यांच्या बॅसिलिका, सार्वजनिक स्नानगृहे, प्रासाद इ. वास्तूंमध्ये खिडक्यांची योजना केलेली आढळते. काही खिडक्यांवर अर्धवर्तुळाकृती कमानी असत, तर इतरत्र चौरस कमानींवर अर्धवर्तुळाकार त्रिकोणिका (पेडिमेंट्स) असत. बायझंटिन युगामध्ये चर्च आदी इमारतींत खिडक्यांची योजना घुमटाखालील भागांत अथवा भिंतीच्या उच्चतम भागात केलेली आढळते. अतीव तपमानापासून संरक्षण मिळविणे, हे याचे प्रमुख कारण होय. अशा खिडक्यांना अर्धवर्तुळाकृती कमानी असत व झडपांऐवजी कोरीव काम केलेल्या दगडी जाळ्या असत. त्यायोगे अंतर्भाग थंड व आल्हाददायक राहत असे. मध्ययुगीन यूरोपात चर्च आदी इमारतींत खिडक्यांची सर्वत्र योजना केलेली आहे. प्रथमतः त्यांचा आकार लहान असे आणि त्यांवर अर्धवर्तुळाकृती कमानी असत पण नंतरच्या म्हणजे गॉथिक काळात त्यांचा आकार व उंची बरीच विस्तृत झाली. त्यांवर टोकदार कमानी असत. अशा खिडक्यांची उंची कधी-कधी १० मी. पर्यंत व रुंदी सु. ५ मी. पर्यंत असे. अशा प्रकारच्या भव्य खिडक्यांमध्ये दगडी खांब योजून दोन अथवा दहापर्यंत विभाग करीत. अशा छोट्या विभागांसाठी लोखंडी सांगाडा व काचेची तावदाने असलेल्या झडपा बसवीत. खांबांच्या मधील ह्या खिडक्यांना सज्जाबारी (बे विंडो) म्हणतात.

खिडकी ३

खिडकीच्या वरच्या भागात म्हणजे कमानीत दगडाचे सुरेख नक्षीकाम केलेले आढळते. हे नक्षीकाम वेलबुट्टीच्या (ट्रेसरी) स्वरूपात आहे. त्यात तऱ्हेतऱ्हेच्या कमानी, वर्तुळे इत्यादींची आकर्षक रचना केलेली आढळते. अशा खिडक्यांत बायबलमधील प्रसंग चित्रित केलेल्या रंगीत चित्रकाचा बसविलेल्या असतात. त्यामुळे मध्ययुगीन चर्चमध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारची व आकर्षक प्रकाशयोजना निर्माण होत असे. तसेच त्यातील चित्रांवरून अशिक्षित भाविकांना धार्मिक रूढी व कथाप्रसंगांचे ज्ञान प्राप्त होत असे. या खिडक्यांना रंगीत चित्रकाचांची खिडकी (स्टेन्ड ग्लास विंडो) असे म्हणतात.


खिडकी ४

मध्ययुगीन फ्रेंच चर्चमध्ये दर्शनी भागात मुख्य प्रवेशद्वारावर एक भव्य व वर्तुळाकृती खिडकीची योजना केलेली असे. अशा प्रकारच्या खिडकीला चक्रवातायन किंवा चक्राकार खिडकी (रोझ अथवा व्हील विंडो) असे म्हणत कारण या खिडकीची रचना चक्राकृती असे. या खिडक्यांचा व्यास कधीकधी १२ मी. पर्यंत असे व त्यातही रंगीत चित्रकाचांची आकर्षक मांडणी केलेली असे. फ्रेंच खिडकी व झुकावाधिष्ठित खिडकी (ओरिएल विंडो) या प्रकारांची योजना, हे मध्ययुगीन प्रासादांचे वैशिष्ट्य होय. फ्रेंच खिडकी तळमजल्यावर असून प्रासादातील मुख्य दालनाच्या एका टोकाला जमिनीपासून थेट छपरापर्यंत भिडणारी असे. तिला दोन पाखा असून ती दरवाजाप्रमाणे असे. अशा खिडकीची योजना चर्चच्या खिडकीसारखी असे. झुकावाधिष्ठित खिडकी ही प्रामुख्याने प्रवेशद्वारावर पहिल्या मजल्यावर असे. तिचा आकार सज्जाबारीपेक्षा लहान पण तद्सदृश असे. छपराच्या ढालीतील खिडक्या वा धोकाबारी (डॉर्मर विंडो) जर्मनीत गॉथिक काळात वापरात होत्या. प्रबोधनकालीन खिडक्या मुख्यतः अर्धवर्तुळाकृती असून त्यांच्या झडपांना फिरता वा खडखडी पाती (व्हेनिशियन ब्लाइंड्स) बसविलेली असत. त्यांयोगे हवा व उजेड यांचे नियंत्रण करता येत असे आणि आवश्यकतेनुसार खाजगी आडोसाही साधता येत असे. काही प्रासादांत भव्य खिडक्या असून त्यांसाठी दर्शनी भागात नक्षीदार खांब आणि त्रिकोणाकृती अथवा वर्तुळाकृती कमानींची योजना करीत असत. युद्धकालीन परिस्थितीत खिडक्यांना संरक्षणार्थ जाड पोलादी जाळ्या बसवीत.

खिडकी ५

आधुनिक युगात शास्त्रीय आणि तांत्रिक प्रगतीमुळे ॲल्युमिनियम आदी धातूंच्या खिडक्यांची निर्मिती होऊ लागली आहे. अशा तऱ्हेच्या खिडक्या हलक्या पण मजबूत असून अत्यंत आकर्षक असतात. तसेच लोखंडी खिडक्यांप्रमाणे त्या गंजत नाहीत. परिणामी त्या अधिक टिकाऊ ठरतात. अशा प्रकारच्या खिडक्या १० मी. लांब व ५ मी. रुंद एवढ्या मोठ्याही असू शकतात व त्यांना अखंड आणि मजबूत काचेचे तावदान लावता येते. थंडीपावसापासून अधिक संरक्षण मिळावे म्हणून कधीकधी काचेचे दुहेरी थर असलेली तावदानेही वापरतात. अशा भव्य झडपांची उघडझाप करण्यासाठी विद्युतशक्तीचा वापर करतात. लोखंडी खिडक्या गंजू नयेत, म्हणून त्यांवर शिशाचा मुलामा देतात. लाकडी खिडक्यांच्या चौकटी स्तर रचनेच्या पद्धतीने म्हणजे लाकडी पट्ट्यांचे थर प्लॅस्टिकच्या शिरसाने सांधून बनवितात. अशा चौकटी हलक्या पण मजबूत, स्वस्त व टिकाऊ असतात. आधुनिक खिडक्यांत वाऱ्यांपासून आणि उन्हापासून संरक्षणासाठी फिरती पाती असलेल्या झडपासुद्धा बसवितात. मोठ्या खिडक्यांसाठी ॲल्युमिनियमच्या तसेच लोखंडी अथवा लाकडी सरकत्या झडपांची योजनासुद्धा आजकाल केली जाते.

पौर्वात्य देशांपैकी जपानमध्ये देवालये व प्रासाद यांसाठी भव्य खिडक्यांची योजना केलेली आढळते, पण त्यासाठी बहुतांशी लाकडी नक्षीदार जाळीची योजना केलेली असे. घरासाठी लाकडी झडपा असलेल्या खिडक्या वापरीत असत व अशा खिडक्यांना आतून कागदी पडदे लावलेले असत. चीनमध्ये खिडक्यांची विभागणी उभे व आडवे लाकडी खांब वापरून करीत असत आणि त्यांना पारदर्शक कागदी तावदाने लावीत असत. 

भारतीय वास्तूंत निरनिराळ्या काळी वेगवेगळ्या प्रकारच्या खिडक्यांची योजना केलेली आढळते, त्यांच्या आकारमानांत व रचनांमध्ये स्थलकालानुसार बरीच तफावत आढळते. भारतात प्राचीन काळात वापरात असलेल्या खिडक्यांच्या चौकटींत लाकडी पटट्या तिरप्या वा उभ्या-आडव्या अशा बसवीत. त्यांना जाळीच्या खिडक्या (लॅटिस विंडो) म्हणत. बौद्धकालीन वास्तू बहुतांशी लेण्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांत विहारनामक निवासस्थानांत खिडक्यांचा अभाव दिसतो पण चैत्यनामक प्रार्थनागृहांत दर्शनी भागात मुख्य प्रवेशद्वारावर एक नालाकृती प्रचंड खिडकी कोरलेली असे. या खिडकीचा आकार उगवत्या सूर्याप्रमाणे अथवा पिंपळाच्या पानाप्रमाणे असल्यामुळे तिला सूर्यखिडकी वा पिंपळपाती खिडकी असे म्हणत. त्यात सूर्यकिरणांची प्रखरता कमी करण्यासाठी लाकडी सांगाड्याची योजना करीत असत. खिडकी ६जैन व हिंदू देवालयांत तसेच मशिदींसाठी आणि थडग्यांसाठी संगमरवरी अथवा दगडी कोरीव जाळ्या वापरीत असत. त्यायोगे अंतर्भागात शीतलता रहात असे. विशिष्ट वेळी देवतेच्या मूर्तीवर सूर्यकिरण यावेत,म्हणून देवळाच्या शिखराला  खिडकीवजा झरोके असतात.

मध्ययुगीन भारतात प्रासादांसाठी बहुतांश लाकडी खिडक्यांची योजना केलेली आढळते. त्यांना लाकडी झडपा बसवीत असत. खिडक्यांच्या वरील भागात कमानदार नक्षीकाम असे. महाराष्ट्रात पेशवेकालीन प्रासादांतील खिडक्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्या सु. २ मी. उंच व १ मी. रुंद असत व जमिनीलगतच बसविलेल्या असत. अशा खिडक्यांना बहुतांशी दोन झडपा असत व कधीकधी आतबाहेर अशी उघडणारी दुहेरी झडप असे. खिडक्यांच्या खालील भागात १ मी. उंचीपर्यंत लाकडी नक्षीकाम केलेले खांब असत. वरील भागात कोरीव कमानी असत व खिडक्यांच्या बाहेरील अंगावर ऊनपावसापासून संरक्षण मिळण्यासाठी छोटेसे लाकडी छप्पर असे. अशा खिडक्यांची योजना फक्त वरच्या मजल्यासाठी अथवा आतील चौकाभोवती केलेली असे. त्यायोगे प्रासादाचे संरक्षण करणे सुलभ होत असे. वास्तूच्या दर्शनी भागावर खिडक्यांची विशिष्ट योजना केली जाते, त्यास हवामहल म्हणतात. जयपूरचा हवामहल प्रसिद्ध आहे.

देवभक्त, मा. ग.