खाल्डिया : युफ्रेटीस व टायग्रिस नद्यांच्या खोऱ्यातील दक्षिणेकडील एक प्राचीन संस्कृती. हीमध्ये बॅबिलोनियाचा काही भाग पूर्वी समाविष्ट होता. इ. स. पू. १००० च्या थोड्या आधी सेमिटिक जमातीने तिची उभारणी केली. तीस ॲसिरियन कल्डू म्हणत तर बॅबिलोनियन कस्डू आणि हिब्रू कस्डीम म्हणत. खाल्डियन हा ग्रीक शब्द पुढे रूढ झाला. इ. स. पू. आठव्या शतकात बितयाकिनीचा राजा मेरोडॅक बॅलडॅन (इ. स. पू. ७२१–७१०) याने पाच टोळ्या एकत्रित आणून येथील राजकीय सत्तेचा पाया घातला. त्याने पूर्वेकडे ईलम लोकांशी सख्य करून त्यांचे साहाय्य मिळविले आणि बॅबिलोनियातील अंदाधुंदीचा तसेच ॲसिरियन सम्राटांच्या अनवधानाचा, कारण ते उत्तरेकडे लढायांत गुंतले होते, फायदा घेऊन इ.स. पू. ७२१ मध्ये बॅबिलनवर आपले राज्य स्थापिले. यानंतर सु. बारा वर्षांनी दुसरा सारगॉन याने त्यांची हकालपट्टी केली परंतु त्यामुळे आरंभलेली खाल्डियनांची प्रगती खुंटली नाही. इ. स. पू. ६१२ मध्ये नॅबोपोलॅसर (इ. स. पू. ६१५–६०५) याने मीड लोकांची मदत मिळवून असूर व निनेव्ह यांचा पाडाव केला आणि ॲसिरियन सत्ता नष्ट करून नव-बॅबिलोनियन साम्राज्य स्थापन केले. याच्यानंतर गादीवर आलेल्या नेबुकॅड्नेझर (इ. स. पू. ६०५–५६२) हा या राजांतील सर्वात थोर खाल्डियन सम्राट होय. त्याच्या कारकीर्दीच्या आरंभीच त्यास हारान येथे जमविण्यात आलेली अवशिष्ट ॲसिरियन सेना आणि त्यांच्या मदतीस आलेली ईजिप्तची सेना यांना तोंड द्यावे लागले. इ. स. पू. ६०५ मध्ये त्याने या संयुक्त फौजेची धुळदाण उडविली. एवढेच नव्हे, तर सिरियाचा प्रदेश व पॅलेस्टाइनची किनारपट्टीही आपल्या ताब्यात घेतली. त्याने इ. स. पू. ५९७ व ५८६ मध्ये जूडाच्या राज्यावर आक्रमणे केली. दुसऱ्या वेळी जेरूसलेम शहर जाळून हजारो ज्यू कैदी म्हणून बॅबिलनला पाठविले. नंतर फिनिशियातील टायर या नगराकडून खंडणी वसूल करून ईजिप्तकडे मोहरा वळविला व थेट मेंफिसपर्यंत मजल मारली. इतक्या दूरच्या प्रदेशावर ताबा ठेवणे त्याला शक्य नव्हते, परंतु ईजिप्तकडून सतत होणारी कटकट बंद करण्यात त्याला यश आले. त्याच्या मृत्यूच्या वेळी खाल्डियन साम्राज्यात सबंध बॅबिलोनिया, दक्षिण ॲसिरिया, सिरिया व पॅलेस्टाईन या प्रदेशांचा समावेश होता. नेबुकॅड्नेझरनंतर आमेल मार्डूक (इ. स. पू. ५६२–५६०), नरीग्लिसर (इ. स. पू. ५६०–५५६), लेबॅशी मार्डूक (इ. स. पू. ५५६) व नॅबोनाइडस (इ. स. पू.५५६–५३९) हे राजे गादीवर आले. या वेळी नाव घेण्यासारखा एकही प्रबळ शत्रू उरला नव्हता, तथापि पुढील दुर्बळ राजे आणि अंतर्गत कलह यांचा फायदा घेऊन इ. स. पू. ५३९ मध्ये सायरस द ग्रेटने बॅबिलनचा पूर्ण पराभव केला. त्यामुळे नेबुकॅड्नेझरच्या मृत्यूनंतर केवळ तीस वर्षांत खाल्डियन सत्ता संपुष्टात आली.

खाल्डियन संस्कृती अनेक बाबतींत बॅबिलोनियन संस्कृतीची वारसदार होती. पूर्वीप्रमाणे याही काळात पुरोहितवर्गाचे प्राबल्य होते. नॅबोपोलॅसर व नेबुकॅड्‌नेझर यांनी देवस्थानांना देणग्या देऊन पुजाऱ्यांना मोठ्या दक्षिणा दिल्या व या वर्गाला खूष ठेवले. नॅबोनाइडस याने मार्डूकला बाजूस ठेवून हारानच्या चंद्रदेवतेची उपासना सुरू केली, तेव्हा पुरोहितवर्ग नाखूष झाला. मोठाल्या मोहिमा व आक्रमणे थंडावल्याने सेनानी व शासक यांना उद्योग उरला नाही, एवढेच नव्हे तर त्यांची द्रव्यप्राप्ती थंडावली. साहजिकच हा वर्ग असंतुष्ट झाला.

खाल्डियनांचा नाव घेण्यासारखा वारसा म्हणजे त्यांची खगोल शास्त्रातील प्रगती. या काळात सतत तीनशे वर्षे सूर्य व चंद्र यांच्या उदय-अस्तांची व ग्रहणांची नोंद ठेवण्यात आली. याच्या आधारावरून इ. स. पू. ५०० च्या आसपास नबुरिमन्नु याने सूर्यचंद्र व इतर ग्रह यांच्या भ्रमणांचे आणि ग्रहणांचे तक्ते तयार केले. किडिन्नु यानेही आणखी शंभर वर्षांनी यात काही सुधारणा केल्या. यांची कालमापनपद्धती इतकी अचूक होती, की तीत केवळ काही सेकंदांचाच फरक आढळतो. अशा प्रकारचे शास्त्रीय निरीक्षण व त्याची नियमित लेखी नोंद अन्य कोणत्याही प्राचीन समाजाने केलेली आढळत नाही.

पहा : ॲसिरिया बॅबिलोनिया.

संदर्भ : Wiseman, D. J. Ed. &amp Trans. Chronicles of Chaldean Kings (656–626 B.C.). London, 1956.

माटे, म. श्री.