खासी-जैंतिया : भारताच्या द्वीपकल्पीय पठाराचाच तुटक भाग असलेल्या मेघालय पठारी प्रदेशाचा मध्य व पूर्व भाग. क्षेत्रफळ सु. १४,३७५ चौ.किमी. पठाराच्या उत्तरेस ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्याकडे टेकड्यांमागून टेकड्यांचा ऊर्मिल प्रदेश म्हणजे जैंतिया टेकड्या होत. त्या पूर्वपश्चिम सु. २१० किमी. विस्ताराच्या व १,३५० मी. उंचीच्या आहेत. १,५०० ते १,८३० मी. उंचीचा पठारी भाग सु. ५,००० चौ. किमी. असून त्याच्या दक्षिणेस सुरमा खोऱ्याकडे एकदम उतरत गेलेल्या सु. २२५ किमी. विस्ताराच्या व १.९४० मी. उंचीच्या खासी टेकड्या आहेत. पठारावर १,५०० ते २,००० मी. उंचीच्या सात समतलीभूत पृष्ठभागांचे अवशेष असून शिलाँग शहराजवळील शिलाँग डोंगर त्या सर्वांत उंच आहे. शिलाँग टेकड्यांच्या दक्षिणेस ग्रॅनाईट खडकांचा प्रदेश असून त्याच्या दक्षिणेस एका सांरचनिक मंचावर जगातील सर्वोच्च पर्जन्यवृष्टीचे चेरापुंजी ठिकाण आहे. मध्य पठाराचा हा भाग क्रिटेशसकालीन रेतीखडकांचा व बेताच्या उताराचा असून त्याच्या काठावरून पडणारा मौसमे धबधबा नयनरम्य आहे. चेरा पठारावर छोट्या चुनखडी टेकड्या विखुरलेल्या असून त्यांपैकी काहींत भूमिगत मार्ग व निक्षेप आढळतात. चेरापुंजीच्या दक्षिणेस सहा किमी. नंतर खालच्या मैदानाकडे एकदम तीव्र उतार आहे. खासी टेकड्यांच्या प्रदेशात चुनखडी, थोडा कोळसा व कोरंडम सापडते.

खासी-जैंतिया टेकड्या म्हणजे बहुतांशी मेघालय राज्याचा संयुक्त खासी व जैंतिया टेकड्या जिल्हाच होय. त्याची लोकसंख्या ६,०५,०८४ (१९७१) असून ३२·३६% लोक साक्षर आहेत. ६१·६१% लोक शेती करतात. ते भात, कापूस, तीळ, मुसुंबी, बटाटे, सुपारी इ. पिके काढतात. जंगलांत लाख मिळते. जंगलांतून आणि पाळलेल्या मधमाशांपासूनही मध व मेण मिळते. बरेचसे लोक फिरती शेती करतात. ते जडप्राणवादी, मातृसत्ताक समाजपद्धतीचे व मागासलेले आहेत. अलीकडे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आहे. नाँगथिम्माई हे येथील मोठे गाव १६,१०३ (१९७१) लोकवस्तीचे आहे.

कुमठेकर, ज. व.