खाजण : खाडीत व छोट्या आखातांत समुद्राचे खारे पाणी व भूखंडावरून येणारे गोडे पाणी यांची मिसळ होते. नद्यांनी व समुद्रप्रवाहांनी वाहून आणलेल्या गाळांचे अशा ठिकाणी छोट्या गोट्यांत रूपांतर होऊन त्यांचे निक्षेपण होते. हा नव्याने बनलेला भूभाग कालांतराने ओहोटीच्या वेळी उघडा पडू लागतो व खाऱ्या पाण्यावर वाढणारे वनस्पतिप्रकार तेथे उगवू लागतात. त्यांच्या मुळांशी निक्षेपणाचे कार्य विशेष जलद होऊन भरतीच्या वेळीही जेमतेम उघडी पडेल इतकी या भूभागाची उंची वाढते. या भूभागास खाजण असे नाव आहे. विशिष्ट तऱ्हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीस उपयोग करून घेतात.
कुलकर्णी, गो. श्री.