घटप्रभा : मुख्यतः कर्नाटक राज्यातून वाहणारी कृष्णेची उपनदी. लांबी सु. ३२० किमी. ही सह्याद्रीत, महाराष्ट्र राज्यात सावंतवाडीच्या ईशान्येस २४ किमी. वर उगम पावते. सु. ६० किमी. ईशान्येकडे गेल्यावर कर्नाटक राज्यात शिरताना ती पूर्ववाहिनी होते. गोकाकपासून ६ किमी. वर तिच्यावर ५५ मी. उंचीचा धबधबा आहे. येथे अनेक प्रकारचे खडक, भित्ती, कुंभगर्त, खडकांचे जोड इ. पहावयास सापडतात. म्हणून भूविज्ञानाचे विद्यार्थी मुद्दाम येथे येतात. वरच्या बाजूस एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बांधलेल्या जलाशयाचे पाणी ओलीतासाठी व वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. धबधब्याजवळच एक कापडगिरणी आहे. गोकाकनंतर मुधोळ, बागलकोट इ. गावांवरून गेल्यावर घटप्रभा उत्तरेकडे वळते आणि बागलकोटपासून २५ किमी. वर कलादगी शहराजवळ कृष्णेला मिळते. घटप्रभेच्या उगमाकडील भागात सु. १४० सेंमी. व नंतरच्या भागात सु. ७० सेंमी. पाऊस पडतो. तिच्या खोऱ्यात ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, कडधान्ये, ऊस, कापूस तंबाखू इ. पिके येतात. काही भागात गवत होते. ओलीताचे क्षेत्र वाढविण्यासाठी दोन टप्प्यांची घटप्रभा योजना आखलेली आहे. १९६९—७० पर्यंत ६०,७५० हे. जमिनीला पाणी पुरवठ्याची सोय झालेली आहे. चौथ्या योजनेअखेरीस १,२०,६५० हे. जमीन ओलीताखाली येईल.

यार्दी, ह. व्यं.