ग्वादालूपे ईदाल्गो : गुस्ताव्हो आ मादेरो. मेक्सिको सिटीपासून सु. ५ किमी. वरील तेपेआक टेकडीवरील मंदिर आणि अमेरिका खंडातील अतिमहत्त्वाचे यात्रास्थान. लोकसंख्या ११,८२,८९५ (१९७०). या जागेवर वॉन द्योगो नावाच्या इंडियनाला स्पेनमधील ग्वादालूपेच्या मेरी देवीने ९ व १२ डिसेंबर १५३१ मध्ये दर्शन दिले, असे सांगतात. या देवीस मेक्सिकोची संरक्षक देवता मानतात. तेथे नंतर मंदिर उभारण्यात आले. पुढे ग्वादालूपेला मेक्सिकोचा क्रांतिवीर ईदाल्गो या धर्मगुरूचे नाव जोडण्यात आले. १९३१ नंतर मेक्सिकोचा क्रांतिवीर व पूर्वीचा एक अध्यक्ष गुस्ताव्हो आ मादेरो याचे नाव या शहरास देण्यात आले. १८४८ मध्ये अमेरिका-मेक्सिको युद्धसमाप्तीचा तह येथे झाला होता.
शहाणे, मो. ज्ञा.