ग्वादालाहारा : मेक्सिकोचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ११,९६,२०० (१९७०). हालीस्को राज्याची ही राजधानी मेक्सिको सिटीपासून ४४० किमी. १,५५२ मी. उंचीवर, सांत्यागो नदीजवळ असून ते शेतमालाची बाजारपेठ व अनेकविध उद्योगधंद्यांचे केंद्र आहे. सांत्यागोवरील हवानाकात्लान धबधब्यावरील वीज याला मिळते. औद्योगिक वाढीमुळे १९३० ते १९६० या काळात येथील लोकवस्ती चौपटीहून अधिक झाली. येथील चांदी व तांबे यांचे धातूकाम, काचपात्रे आणि मृत्तिकापात्रे यांवरील नाजूक कलाकुसर प्रसिद्ध असून १६१८ चे कॅथीड्रल, १६४३ चा राज्यपालाचा वाडा, ओरोस्कोची भित्तिचित्रे, १७९२ चे जुने व १९३५ चे नवे स्वायत्त विद्यापीठ, संग्रहालय, नाट्यगृह, उद्याने इ. प्रेक्षणीय आहेत. सौम्य, स्वच्छ व कोरड्या हवेमुळे ३७ किमी. वरील चापाला सरोवराकाठीचे आरोग्यकेंद्र भरभराटले आहे. येथे विमानतळ असून रस्ते आणि लोहमार्ग यांचे ते केंद्र आहे. मेक्सिकोचा स्वातंत्र्यप्रणेता ईदाल्गो ई कोस्तीया याने गुलामगिरी नष्ट केल्याची घोषणा येथेच केली आणि मेक्सिकोचे प्रसिद्ध फिरते वाद्यवृंद येथूनच सुरू झाले. १८१८ व १८७५ च्या भूकंपांनी ग्वादालाहाराची बरीच नासधूस झाली होती.
शहाणे, मो. ज्ञा.