एंजेल : जगातील सर्वांत उंच धबधबा. आग्‍नेय व्हेनेझुएलाच्या बोलिव्हार प्रांतात, कारोनी नदीवर, ५०५७’ उ. व. ६२०३३’ प. येथे हा धबधबा आहे. मौंट औयांटेपुईच्या शिखरापासून खाली काही अंतरावर खडकाच्या एका फटीतून हा धबधबा प्रथम सरळ ८०७ मी. व नंतर पुन्हा आणखी १७२ मी. खाली कोसळतो. अमेरिकन वैमानिक जेम्झ एंजेल याने व्हेनेझुएलाच्या अरण्यमय, दुर्गम अंतर्भागात १९३५ मध्ये तो प्रथम पाहिला त्याचेच नाव धबधब्याला दिलेले आहे. १९४९ मध्ये अमेरिकन पथकाने त्याची उंची मोजली व छायाचित्रे घेतली.

कुमठेकर, ज. व.