ग्रीन्यार, व्हीक्तॉर : (३ मे १८७१–१३ डिसेंबर १९३५). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. १९१२ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म फ्रान्समधील शेअरबुर्ग या गावी झाला व तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते क्लूनी येथे गेले व शेवटी लीआँ विद्यापीठात संशोधन करून १९o१ साली त्यांनी डॉक्टरेटची पदवी मिळविली. १९o५ साली ते बझाँसाँ येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले व १९o६ मध्ये पुन्हा लीआँ येथे परत आले. १९१o साली नॅन्सी विद्यापीठात व १९१९ साली लीआँ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

कार्बनी-मॅग्नेशियम संयुगांसंबंधीच्या त्यांच्या संशोधनाने सांश्लेषिक (रासायनिक विक्रियांनी संयुगे बनविण्यासंबंधीच्या) रसायनशास्त्रात अत्यंत मौलिक भर पडली. त्याबद्दल १९१२ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना व पॉल साबात्ये यांना विभागून मिळाले. ही संयुगे ‘ग्रीन्यार संयुगे’ या नावे प्रसिद्ध आहेत [→ ग्रीन्यार विक्रिया].

त्यांनी १८९९ मध्ये त्यांचे गुरू बार्ब्ये यांच्या सूचनेवरून कार्बनीमॅग्नेशियम संयुगांसंबंधी संशोधन सुरू केले आणि त्यांचा अनेक अज्ञात ⇨अल्कोहॉले, ⇨कीटोने, कीटोएस्टरे, नायट्राइले,  ⇨टर्पिने  इत्यादींच्या संश्लेषणात व संशोधनात केला. त्यावरून ही संयुगे वापरून कमी खर्चात, कमी वेळात व सुलभतेने विविध रासायनिक संयुगांचे संश्लेषण करता येते हे सिद्ध झाले. त्यामुळे कार्बनी रसायनशास्त्राच्या प्रगतीस फार साहाय्य झाले. १९३५ सालापर्यंत त्यांच्या उपयोगाचा उल्लेख सु. ६ooo ठिकाणी झालेला आढळतो. यावरून त्यांची उपयुक्तता लक्षात येईल. ग्रीन्यार यांनी केलेले इतर क्षेत्रातील संशोधनही महत्त्वाचे आहे. परिमाणात्मक ओझोनीकरणाने (संयुगावर ओझोनाची विक्रिया करून तयार झालेली संयुगे तपासण्याने) अतृप्त संयुगाच्या संरचनांचा अभ्यास, ॲल्युमिनियम क्लोराइडाच्या सान्निध्यात हायड्रोकार्बनांचे भंजन आणि कमी दाबाच्या परिस्थितीत हायड्रोजनीकरण (रेणूत हायड्रोजन मिळविणे) व हायड्रोजननिरास (रेणूतील हायड्रोजन काढून टाकणे) ही काही उदाहरणे होत.

त्यांनी सु. १७o संशोधनात्मक लेख व कार्बनी रसायनशास्त्रावर दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यांना इन्स्टिट्यूट द फ्रान्सचे काव्हूर्स (Cahours) पारितोषिक १९o१ मध्ये मिळाले व बर्थेलॉट पदकाचा सन्मान १९o२ साली मिळाला. ते जगातील प्रमुख रसायनशास्त्रीय आणि वैज्ञानिक संस्थांचे सन्माननीय सदस्य होते. लूव्हें (१९२७) व ब्रुसेल्स (१९३o) येथील विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेटचा व नॅन्सी विद्यापीठाने सन्माननीय प्राध्यापकपदाचा (१९३१) बहुमान त्यांना दिला.

जमदाडे, ज. वि.