ग्रॅनोडायोराइट : अग्निज, पातालिक (अगदी खोल जागी बनलेला) खडक. हा सामान्यतः भरडकणी व मुख्यतः फेल्स्पारे व क्वॉर्ट्झ या खनिजांचा बनलेला असतो. फेल्स्पारांपैकी अर्ध्याहून अधिक खनिजे ऑलिगोक्लेज ते अँडेसाइन या प्लॅजिओक्लेज गटातील असतात. पोटॅश फेल्स्पाराचे (ऑर्थोक्लेज किंवा मायक्रोक्लीन यांचे) प्रमाण एकूण फेल्स्पाराच्या एक तृतीयांशापेक्षा कमी असते. ग्रॅनोडायोराइटाचा अर्ध्याहून अधिक भाग फेल्स्पारांचा व सु. पंचवीस टक्के भाग क्वॉर्ट्‍‌झाचा बनलेला असतो. वर उल्लेखिलेली खनिजे ही ग्रॅनोडायोराइटाची आवश्यक खनिजे होत. त्यांच्याशिवाय कृष्णाभ्रक वा हॉर्नब्लेंड किंवा दोन्ही खनिजे कमीअधिक पण अल्प प्रमाणात असतात. स्फीन, ॲपेटाइट व मॅग्नेटाइट ही ग्रॅनोडायोराइटातील गौण व अत्यल्प प्रमाणात आढळणारी खनिजे होत.

ग्रॅनोडायोराइटांचे वयन (पोत) सामान्यतः ग्रॅनाइटी (ग्रॅनाइटाप्रमाणे) असते. काहींचे पृषयुक्त (कणीदार आधारकात मोठे स्फटिक विखुरलेले असे) असते. अशा खडकांतील बृहत्स्फट (मोठे स्फटिक) फेल्स्पारांचे असतात. यातील आधारक फेल्स्पार, क्वॉर्ट्‍‌झ, कृष्णाभ्रक इत्यादींच्या निराकार व भरड किंवा मध्यम कणांचा बनलेला असतो.

ग्रॅनोडायोराइट हा ग्रॅनाइटांच्या गटातील एक प्रकार असून ज्यांना बायोटाइट-ग्रॅनाइट किंवा हॉर्नब्लेंड-ग्रॅनाइट अशी नावे दिले जातात, अशांपैकी कित्येक खडक ग्रॅनोडायोराइट असतात. ग्रॅनोडायोराइटांची निसर्गात आढळण्याची रीती ग्रॅनाइटांसारखी असते व ते बॅथोलिथांच्या किंवा लहान अंतर्वेशित (घुसलेल्या) राशींच्या स्वरूपात आढळतात. इतर कोणत्याही अंतर्वेशित अग्निज खडकांच्या मानाने त्यांच्या राशी पुष्कळच अधिक मोठ्या असतात. पुष्कळशी बॅथोलिथे ग्रॅनोडायोराइटांची बनलेली असतात.

पहा : ग्रॅनाइट, बॅथोलिथ.

ठाकूर, अ. ना.