गोस्वामी, त्रैलोक्यनाथ : (३ मार्च १९०६ –  ). आधुनिक असमियातील आघाडीचे कथाकार व साक्षेपी समीक्षक. नलबारी (जि. कामरूप) येथे एका ब्राह्मण कुटुंबात जन्म. गौहाती येथील कॉटन कॉलेजातून इंग्रजी घेऊन एम्.ए. तसेच बी.एल्. झाल्यावर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. पुढे नलबारी येथे निघालेल्या कॉलेजचे ते प्राचार्य झाले. ते विद्यापीठ अनुदान मंडळ नियुक्त संशोधन विद्वान (रिसर्च स्कॉलर) आहेत.

त्रैलोक्यनाथ गोस्वामी

आवाहन (१९२९, सध्या बंद) ह्या दर्जेदार वाङ्‌मयीन मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध होताच लोकांचे लक्ष्य त्यांच्याकडे वेधले गेले. आवाहनमुळे आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही बाबतींत असमिया कथेला नवे वळण लागले. त्रैलोक्य गोस्वामींच्या कथांत सामाजिक भाष्य व समाज सुधारणेची कळकळ यांचे प्रभावी दर्शन घडते. अरुणा (१९४८), मरीचिका (१९५२) आणि शिल्पीर जन्म (१९५७) हे त्यांचे कथासंग्रह. अरुणामधील कथांत सभोवतालच्या सामाजिक जिवनातील अन्याय व दुष्ट रूढी याचे प्रत्ययकारी चित्रण आढळते. मरीचिकातील कथांत त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण परिणामांचे चित्रण केले आहे. जीया मानुह (१९५४) ही त्यांची लघुकादंबरी असून तीत महायुद्धामुळे उद्‌ध्वस्त झालेली सामाजिक नीतिमूल्ये व उदात्त भावना यांचे त्यांनी मनोज्ञ दर्शन घडविले आहे. सतत वीस वर्षे कथालेखन केल्यावर ते साहित्यसमीक्षेकडे वळले. गेल्या १५–२० वर्षांत त्यांनी समीक्षेत मोलाची भर घातली आहे.

साहित्य आरू समालोचना (१९५०) हा त्यांचा समीक्षाग्रंथ महत्त्वाचा असून त्यात त्यांनी आपल्या सुबोध व प्रसन्न शैलीत असमिया साहित्याची मूलगामी समीक्षा केली आहे. पाश्चात्त्य व भारतीय समीक्षातत्त्वांचे तौलनिक उपयोजन त्यांच्या समीक्षेत आढळते. असमिया चुटी गल्प (१९६४) हा त्यांचा दुसरा समीक्षाग्रंथही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आधुनिक गल्प साहित्य  ह्या त्यांच्या समीक्षाग्रंथास १९६७ मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला. 

सर्मा, सत्येंद्रनाथ (इ.) सुर्वे, भा. ग. (म.)