गोलदारु : (पून, पुनई हिं. जंगली बदाम, गंध बदाम क. सेंबाडी, पेन्नारी सं. नागलकुडा इं. बॅस्टर्ड पून लॅ. स्टर्क्युलिया फेटिडा कुल-स्टर्क्युलिएसी). हा एक मोठा सु. २४-२७ मी. उंच, सरळ वाढणारा, शोभिवंत, पानझडी वृक्ष जंगली अवस्थेत क्वचित दिसतो पण इंडोचायना, मलाया, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, श्रीलंका, ब्रह्मदेश व भारत येथे बऱ्याच ठिकाणी लावलेला आढळतो. याची शारीरिक लक्षणे सामान्यतः ⇨स्टर्क्युलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. साल पांढरी व फांद्यांची मांडणी मंडलाकार असते. पाने हस्ताकृती विभागलेली व संयुक्त दले ५-९, लंबगोल व कुंतसम (भाल्यासारखी) असून ते उन्हाळ्यात गळतात फुले एकलिंगी व द्विलिंगी, फिकट लाल, दुर्गंधी व लहान असून मार्च ते मेमध्ये येतात. पुं-पुष्पे अधिक लवकर गळून जातात परागकोश १०-१५ स्त्री-पुष्पे थोडी व परिमंजरीच्या टोकास येतात. किंजदले केसाळ व बळकट किंजधरावर असून त्यांच्याभोवती वंध्यकेसरांचे वर्तुळ असते [→ फूल]. घोसफळातील प्रत्येक पेटिकाफळ ५-१० x ६ सेंमी., कठीण, शेंदरी व नावेसारखे असते. बिया १०-१५, मोठ्या, काळ्या, लांबट व गुळगुळीत असून प्रत्येकीच्या टोकास एक पिवळे बीजोपांग (बीजाच्या देठापासून वा त्यावरील छिद्राच्या जवळच्या भागापासून तयार झालेली वाढ) असते. सालीपासून धागा व डिंक (ट्रॅगकांथसारखा) काढतात. फळे व बीजांचे तेल रेचक व वायुनाशी पाने कीटकनाशक बिया भाजून खातात. लाकूड बळकट व टिकाऊ असून होडकी, डोलकाठी, खोके अशा किरकोळ उपयोगात आहे.
पराडकर, सिंधु अ.
“