गोराडू : (हिं. चुप्रि आलू क. तुंग-गेनसू इं. व्हाइट यॅम, ग्रेटर यॅम लॅ.डायॉस्कोरिया ॲलाटा कुल-डायॉस्कोरिएसी). सु. १५ मी. उंचीच्या या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) व मोठ्या वेलीचे मूलस्थान
आग्नेय आशिया असून संपूर्ण उष्ण कटिबंधात तिची लागवड करतात. भारतात बहुतेक सर्वत्र लागवड होते. डा. पार्सिमिलिस व डा. हॅमिल्टोनी या रानटी जातींशी हिचे जवळचे नाते आहे. हिचे सु. ७२ प्रकार ओळखले गेले आहेत. खोड चौकोनी व काहीसे सपक्ष असून डावीकडून उजवीकडे वेढे देत वर चढते [→ महालता]. पाने साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक असून पात्यांमध्ये पाच मुख्य शिरा तळाकडून टोकाकडे जातात. फुले एकलिंगी फळे (बोंडे) सपाट व बी सपक्ष असते. पानांच्या बगलेत अनेक आकार-प्रकारच्या कंदिका (लहान कंद) येतात. जमिनीत विविध प्रकारची ग्रंथिल मुळे येतात. तपकिरी रंगापासून ते गर्द काळ्यापर्यंत अनेक छटा त्यांवर आढळतात. ती खाद्य आहेत. काही प्रकारांत त्यांची लांबी १·८५-२·५० मी, आढळते त्यांतील पिठूळ मगज (गर) नरम, पांढरा किंवा मलईसारखा, जांभळट किंवा लालसर असतो, त्यात २१ टक्के स्टार्च असतो. ही मुळे वाळवून व पीठ करून अथवा बटाट्यासारखी भाजी करून किंवा तळून खातात. वन्य जमाती भाताऐवजी खातात. जांभळट रंगाच्या मुळाचा उपयोग आइसक्रीमला रंग व स्वाद आणण्यासाठी करतात. ही मुळे कृमिनाशक असून महारोग, मूळव्याध व परमा इत्यादींवर वापरतात.
पहा : कारंदा डायॉस्कोरिएसी.
जमदाडे, ज. वि.
गोराडूची लागवड सुरण, आले किंवा हळदीच्या पिकात मिश्रपीक म्हणून करतात किंवा स्वतंत्र पीक म्हणूनही लावतात. गुजरातमध्ये याची लागवड बरीच होते.
गोराडूला १००–१५० सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि उष्ण हवामान चांगले मानवते. या पिकाला ६० सेंमी. खोल, मध्यम काळी किंवा रेतीमिश्रित पोयट्याची जमीन उत्तम समजतात. भारी चिकण जमिनीत ग्रंथिल मुळे चांगली पोसत नाहीत.
लागवडीपूर्वी जमीन २०-२२ सेंमी. खोल नांगरून, ढेकळे फोडून हेक्टरी २५-३० टन भरखत घालून, वखरपाळ्या देऊन, चांगली नरम आणि भुसभुशीत करतात. रेताड जमिनीत स्वतंत्र पिकांसाठी वाफे व भारी प्रकारच्या जमिनीत रुंद वरंबे करतात. मिश्रपिकाच्या बाबतीत मुख्य पिकासाठी काढलेल्या सऱ्यांचा उपयोग केला जातो.
लागवड मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला करतात. बेण्यासाठी मागील सालच्या उत्पादनापैकी पोसलेली निरोगी ग्रंथिल मुळे वापरतात. त्यांचे १००–१५० ग्रॅ. वजनाचे प्रत्येकी दोन डोळे असलेले तुकडे ७५ X ७५ सेंमी. किंवा ९० X ९० सेंमी. अंतरावर ओळीत प्रत्येक जागी एक याप्रमाणे १० सेंमी. खोल लावतात. हेक्टरी १,२५०–१,५०० किग्रॅ. बेणे लागते. आले-हळदीमधील मिश्रपीक १·५–३ मी. अंतरावर लावतात. त्याकरिता बेणे ४००–४८० किग्रॅ. लागते. लावलेल्या बेण्यातून निघालेले एकदोन जोमदार वेल ३० सेंमी. इतके वाढले की, त्यांच्याजवळ उंच बांबू पुरून आधार देतात. हेक्टरी ६०–७५ किग्रॅ. नायट्रोजन दोन समान हप्त्यांनी देतात. पहिला हप्ता लागणीनंतर एक महिन्याने आणि दुसरा पहिल्यानंतर एक महिन्याने देतात. आवश्यकतेप्रमाणे निंदणी करतात व पाणी देतात. मिश्रपिकाला मुख्य पिकाला दिलेल्या मशागतीचा व खतपाण्याचा फायदा मिळतो.
लागवडीपासून ६-७ महिन्यांत ग्रंथिल मुळे तयार होतात. त्यावेळी वेलावरील जुनी पाने पिवळी पडून गळू लागतात, वेलाच्या बुंध्याभोवतालची जमीन भेगाळते. वेल थोडेसे सुकल्यावर बुंध्याजवळची माती खणून ग्रंथिल मुळे न दुखवता काढून घेतात. प्रत्येक वेलापासून एक दोन मोठी ग्रंथिल मुळे मिळतात. योग्य प्रकारे तयार होण्यापूर्वीच खणून काढल्यास साठवणीत ती टिकत नाहीत. ग्रंथिल मुळे काढल्याबरोबर विकतात किंवा थंड कोरड्या जागेत साठवितात.
सामान्यतः गुजरातमधील पिकापासून हेक्टरी १५,०००–१७,००० किग्रॅ. उत्पन्न मिळते. मिश्रपिकापासून हेक्टरी ७,०००– ८,००० किग्रॅ. उत्पन्न येते.
गोराडूवर महत्त्वाचे कीटक उपद्रव आणि रोग नाहीत.
नानकर, ज. त्र्यं.
“