गोपाल आता : (सु. १५४७-१६११). आसाममधील एक प्रसिद्ध वैष्णव संत व कवी. भवानिपुरिया गोपाल आता या नावाने तो विशेष प्रसिद्ध होता. तो मूळचा पूर्व आसामाचा तथापि नंतर तो पश्चिम आसामात भवानीपूर येथे येऊन स्थायिक झाला व ⇨ माधवदेवांचा निःसीम भक्त बनला. माधवदेवांनी आपल्या नंतरचा पीठप्रमुख म्हणून त्याची नियुक्ती केली होती. गोपाल आता संस्कृतचा गाढा पंडित होता. उत्स्फूर्तपणे काल्पनिक रूपककथा आणि बोधकथा रचून धार्मिक व तात्त्विक विषयांचे विवरण करण्यात तो निष्णात होता. त्यामुळेच त्याला ‘कथार सागर’ (कथासागर) म्हटले जाई. आसामातील ⇨ शंकरदेवप्रणीत वैष्णव पंथाच्या चार प्रमुख उपपंथांपैकी ‘काल संहति’ ह्या उपपंथाचा गोपाल आता संस्थापक. ह्या उपपंथाच्या अनुयायांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना आपल्या पीठप्रमुखाबद्दल वाटणारी आत्यंतिक निष्ठा व आदर. गोपाल आताच्या अनुयायांनी आपल्या मताचे लोण आसामातील दूरदूरच्या भागांत आणि आदिवासी क्षेत्रातही नेऊन पोहोचविले. गोपाल आताने नंतर कामरूप जिल्ह्यातील कल्झार येथेही आपला एक मठ स्थापन केला. कल्झार येथेच त्याचे निधन झाले.

गोपाल आताने काही भक्तिपर पदे (गीते) व जन्मयात्रा, नंदोत्सव  आणि उद्धवयान (किंवा गोपी-उद्धवसंवाद) हे तीन ‘अंकिया नाट’ (संगीत एकांकी नाटके) लिहिले. यांतील नंदोत्सव  हा नाट जन्मयात्राचाच विस्तार असल्यामुळे त्याला काही समीक्षक स्वतंत्र नाट म्हणून मान्यता देत नाहीत. जन्मयात्राचा प्रयोग भवानीपूर येथील ‘कीर्तनघरा’त प्रथम केला, तेव्हा माधवदेव प्रयोगास जातीने हजर होते. त्यांना तो प्रयोग अतिशय आवडला व त्यांनी समाधान व्यक्त केले. कलादृष्ट्या हा नाट सरस उतरला आहे. गोपाल आताचे हे तिन्हीही अंकिया नाट भागवत पुराणावर आधारलेले असून त्यांचा आशय कृष्णचरित्र व भक्तिमहिमा हा आहे. 

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)