गोट्फ्रीट फोन स्ट्रासबुर्ग : (तेरावे शतक). मध्ययुगीन जर्मन कवी. त्याच्या जीवनाविषयीची फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. तथापि ⇨ ट्रिस्टान उंड इसोल्ट (सु. १२१०, इं. शी. ट्रिस्टान अँड इसोल्ट) ह्या त्याच्या महाकाव्यातून प्रत्ययास येणाऱ्या विद्धत्तेवरून तत्कालीन धार्मिक मठांतून त्याने शिक्षण घेतले असावे, असे वाटते तसेच तत्कालीन दरबारी जीवन आणि रीतिरिवाज ह्यांचीही त्याला उत्तम माहिती असावी. ⇨ हार्टमान फोन औए आणि ⇨व्होल्फ्राम फोन एशेनबाख ह्या दोन दरबारी महाकवींचा तो समकालीन.
ट्रिस्टानच्या कथेवर लिहिल्या गेलेल्या मध्ययुगीन काव्यांत गोट्फ्रीटचे हे महाकाव्य सर्वश्रेष्ठ गणले जाते. ट्रिस्टान आणि इसोल्ट ह्या प्रेमी युगुलाची ही शोकांतिका आहे. बहारदार प्रेमवर्णने, शब्दकळेतील तालबद्धता, दीर्घ रूपके, नादमाधुर्य इ. गुणांमुळे कवीचे वेगळेपण दिसून येते. हे महाकाव्य तो पूर्ण मात्र करू शकला नाही. उल्रिख फोन टयूर्हाइम आणि हाइन्रिख फोन फ्रायबेर्ख ह्या दोन कवींनी ते पूर्ण केले (१३००).
घारपुरे, न. का.