गेअरी : गॅरी, गेरी. अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक मोठे औद्योगिक शहर. लोकसंख्या १,७५,४१५ (१९७०). मिशिगन सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर, शिकागोच्या ४० किमी. आग्नेयीस, लोखंड व कोळसा यांच्या खाणी-प्रदेशांदरम्यान १९०५ मध्ये हे वसविले गेले. पोलादनिर्मितीचे हे जगातील सर्वांत मोठे केंद्र आहे. पोलाद व पोलादाच्या विविध वस्तू यांशिवाय येथे रसायने, सिमेंट, तेलशुद्धी इत्यादींचे मोठे उद्योग आहेत. आखीव नगररचना व उद्याने यांसाठी शहर प्रसिद्ध आहे. व्यावसायिक काम, खेळ व दैनंदिन पाठ यांमध्ये विभागलेली ‘प्लॅटून’ शिक्षणपद्धती गेअरी येथे निर्माण झाली.
लिमये, दि.ह.