गुलाबराव महाराज : (६ जुलै १८८१–२० सप्टेंबर १९१५). विदर्भातील एक सत्पुरुष. अमरावतीजवळ माधान येथे जन्म. चार महिन्यांचे असतानाच त्यांना अंधत्व आले. जातीने कुणबी. बालपणापासून ज्ञानेश्वरीचा व्यासंग. स्वतःला ज्ञानेश्वरकन्या व कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हे ते धारण करीत. भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही, हा भक्तिसिद्धांत शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला [→ मधुरा भक्ति]. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी प्रतिपादिले. भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत, असे समन्वयात्मक विचार त्यांनी प्रतिपादन केले. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणींचे त्यांनी खंडन केले. आर्य ‘वंश’ असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्स म्यूलर व लोकमान्य टिळकांचे मत त्यांना मान्य नव्हते. २,५०० वर्षांपूर्वी वैदिक धर्मच तेवढा विश्वव्यापक होता, असे ते प्रतिपादन करीत. प्राचीन न्यायशास्त्र हे प्रामुख्याने आर्यांचे भौतिकशास्त्र होते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी (साउंड), ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति- प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखवून दिले. पण परंपरा लुप्त झाल्यामुळे त्यांचे स्पष्टीकरण होण्यासाठी आस्तिक-नास्तिक सर्व संस्कृत पंडितांनी मिळून न्यायशास्त्रातील प्रत्यक्षखंडाचा अभ्यास आणि विस्तार केला, तर नवीन भौतिक शोध लागतील आणि आर्यांचे भौतिकशास्त्र पुन्हा उदयाला येईल, असे साधार व तर्कशुद्ध विवेचन करून न्यायशास्त्रातून भौतिक शोध लावण्याची दिशा महाराजांनी दाखवून दिली.
त्यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इ. अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वऱ्हाडी बोलीतून त्यांनी सु. १२५ ग्रंथ लिहिले. त्यांची छापील पाने सु. ६,००० भरतील. ओव्या २७,०००, अभंग २,५००, पदे २,५००, श्लोकादी रचना ३,००० इत्यादींचा त्यांत समावेश आहे. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्मयप्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या ग्रंथांतील अलौकिकव्याख्याने (१९१२), साधुबोध (१९१५), प्रेमनिकुंज (१९१८), संप्रदाय सुरतरु (१९१९) वगैरे ग्रंथ विशेष महत्त्वाचे आहेत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय श्री बाबाजी महाराज पंडित यांनी १९६४ पर्यंत चालविला. त्यांच्यानंतर मधुराद्वैत संप्रदायाच्या प्रतिनिधिस्थानावर सध्या कोणीही नाही. ‘श्रीज्ञानेश्वरमधुराद्वैतसांप्रदायिक मंडळ’ या नावाचे मंडळ अमरावती येथे असून सर्व उत्सवादी कार्य ते करीत असते. ग्रंथालयरक्षणाचे व पुस्तकप्रकाशनाचे कार्यही त्याच्यामार्फत चालते. साधारणपणे या संप्रदायाचे तीनशे अनुयायी असून कात्यायनीव्रत, श्रीकृष्णजन्म, शिवरात्र वगैरे उत्सव नेहमीप्रमाणे आजही साजरे होतात.
घटाटे, कृ. मा.
“