गुलबुश : (गुलबक्षी हिं. गुल-अब्बास गु. गुब्बुजी क. चंद्रमल्लिगे सं. चंद्रकली इं. फोर-ओ-क्लॉक प्लँट, मार्व्हल ऑफ पेरू लॅ. मिरॅबिलिस जलापा कुल-निक्टॅजिनेसी). ही ⇨ओषधी सु. एक मी. उंच वाढणारी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व शोभिवंत असून मूळची मेक्सिको व पेरू देशांतील आहे व त्यावरून इंग्रजी नाव ‘मार्व्हल ऑफ पेरू’ पडले आहे. भारतात सर्वत्र, बागेत व क्वचित जंगली अवस्थेत आढळते. हिचे मूळ ग्रंथिल, पिंगट असून खोड नरम व काहीसे जाड असते. पाने तळाशी हृदयाकृती, अंडाकृती व समोरासमोर असतात. फुले झुबक्यांनी येतात ती पांढरी, लाल, पिवळी, गुलाबी किंवा मिश्ररंगी असून प्रत्येकास तळाशी हिरवे छदमंडल व नळक्यासारखे परिदलमंडल असते [→ फूल]. फळ शुष्क, काळे, सुरकुतलेले असून त्यावर परिदलाच्या तळाचे वेष्टन व आत एकच बी असते. फुले सायंकाळी उमलतात म्हणून त्याला फोर-ओ-क्लॉक प्लँट असे इंग्रजीत म्हणतात.
पाने चुरगळून त्याचे गरम पोटीस सांध्यातील गाठींवर, गळवांवर बांधल्यास ती लवकर पुवाळतात. जखमा व खरचटणे यांवर पानांचा रस गुणकारी असतो. मूळ वाजीकर (कामोद्दीपक) व रेचक तुपात तळलेले चूर्ण दूधातून घेतल्यास शक्तिवर्धक असते. चीनमध्ये पाने आणि खोडाचे तुकडे मांसाबरोबर शिजवून खातात. खऱ्या जलापा (एक्झोगोनियम पर्गा ) ऐवजी किंवा त्यात याच्या मुळांची भेसळ करून वापरतात. मुळांचे चूर्ण पाण्यात कालवून लावल्यास कातडी व श्लेष्मल त्वचेची (पातळ नाजूक त्वचेची) आग होते. बियांची काळ्या मिरीबरोबर भेसळ करतात [→ निक्टॅजिनेसी].
अभिवृद्धी (लागवड) बियांपासून अगर ग्रंथिल मुळ्यांपासून करतात. गुलबुश कुंडीत, ताटव्यांच्या मागे वा कडेला लावतात. बागेतील कोणत्याही जमिनीत वाढते. बी सरळ कायम जागी लावून ३०–४० सेंमी. अंतराने रोपे विरळ करतात. पेरणी जानेवारी-फेब्रुवारी, मे–जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबर आणि डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये करतात.
जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.
“