गुलचांदणी : (इं. मून फ्लॉवर लॅ. आयपोमिया बोनानॉक्स, कॅलोनिक्टीअन ॲक्युलिएटम कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). वळसे घेऊन ३ ते ८ मी. उंच वाढणारी ही वेल सर्व भारतभर, श्रीलंका, उष्ण कटिबंधीय आफ्रिका आणि पूर्व आशियात आढळते. ती १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात चांगली वाढते. फुले सुवासिक, ८ ते १५ सेंमी. लांब व रुंद, तुतारीच्या आकाराची, पांढरी, कधीकधी हिरवट चुण्या असलेली, संध्याकाळी फुलतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजतात. बागेतील फुलझाड म्हणून लोकप्रिय असून घराच्या छप्परावर अगर खांबावरही चढवितात. 

जमीन कसलीही चालते. अभिवृद्धी (लागवड) वेलीच्या छाट कलमांनी अगर बी लावून करतात. फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता चांगली असतात. श्रीलंकेमध्ये फुलांचे मांसल संवर्त (फुलांचे सर्वांत बाहेरील मंडल, पुष्पकोश) कढीत अगर रश्शामध्ये वापरतात. 

चौधरी, रा. मो.