गुलकंद : गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनविलेला एक औषधी पदार्थ. यास लेह असेही दुसरे नाव आहे.
उत्तर भारतातील शेवती गुलाबाला सुगंध कमी असतो, परंतु त्याला उन्हाळ्यात बहर येतो म्हणून त्यापासूनच मुख्यतः गुलकंद बनविला जातो कारण तो बनविण्यास उन्हाची गरज असते.
गुलाबाच्या फुलांच्या स्वच्छ केलेल्या पाकळ्या १ भाग, खडीसाखरेचे चूर्ण २ भाग (व अवश्य तेथे पाठाप्रमाणे प्रवाळ घेऊन) बरणीत किंवा लाखलोटीत (लाखेचा थर दिलेल्या मडक्यात) त्यांचे एकावर एक थर रचतात व तोंड फडक्याने बांधून पात्र (बरणी वा लाखलोटी) उन्हात ठेवतात. दररोज हालवून अनेक दिवस ऊन दिले म्हणजे पात्रातील घटक एकजीव होऊन गुलकंद बनतो. या कल्पामुळे गुलाबाचा सर्व ऋतूंत औषधी उपयोग करता येतो. क्वचित शेवंती व कमळ यांच्या पाकळ्यांचाही गुलकंद बनवितात.
उष्णता व कडकी यांवर गुलकंद हे गुणकारी औषध आहे. उन्हामुळे डोके दुखणे, हातापायांची आग होणे, डोळ्यांची जळजळ, शौचाला खडा होणे, उन्हाळे लागणे, वारंवार डोळे येणे, तोंड येणे इ. उष्णविकारांवर त्याचा विशेष उपयोग होतो. प्रवाळयुक्त गुलकंद जास्त वीर्यवर्धक आहे व त्याचा गुण जास्त काळ टिकतो. तसेच गुलकंद थंड, उत्साहजनक, वर्णप्रासादजनक, किंचित कडवट व पाचक असून त्रिदोषविकार, रक्तविकार, मूळव्याध, मुतखडा या विकारांवर गुणकारी आहे. उन्हाळ्यामध्ये हे औषध नेहमी वापरण्यासारखे आहे. इतर औषधास अनुपान (औषधाबरोबर घेण्याचा पदार्थ) म्हणूनही गुलकंद वापरतात.
लखनौ व कनोज येथे गुलकंद मोठ्या प्रमाणावर तयार केला जातो.
पहा : औषधिकल्प गुलाब.
जमदाडे, ज. वि.