गुप्तकाशी : गुप्त वाराणसी. हिमालयातील एक निसर्गसुंदर तीर्थक्षेत्र. रुद्रप्रयाग–केदारनाथ रस्त्यावर रुद्रप्रयागच्या उत्तरेस ४४ किमी., १,५२४ मी. उंचीच्या टेकडीवर हे वसले असून याच्या सु. ५ किमी. समोरील टेकडीवर उखीमठ हे प्रसिद्ध यात्रास्थान आहे. या दोन टेकड्यांमधून मंदाकिनी नदी वाहते. गुप्तकाशीचे माहात्म्य तेथील विश्वेश्वराचे मंदिर व मनकर्णिका कुंड ह्यांमुळे आहे. मंदिराजवळच संगमरवरी अर्धनारीनटेश्वराची मूर्ती असलेले लहान मंदिर असून, समोरील मनकर्णिका कुंडात यमुना व भागीरथी यांच्या जलधारा गोमुखातून अखंड पडत असतात. केदारनाथ व बद्रिनारायण येथून येणाऱ्या–जाणाऱ्या यात्रेकरूंची येथे नेहमी वर्दळ चालू असते.
कापडी, सुलभा