गॉर्की : पूर्वीचे निझ्निनॉव्हगोरॉड. रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट प्रजासत्ताकाच्या गॉर्की विभागाचे मुख्य शहर. लोकसंख्या १२,३८,००० (१९७३). व्होल्गा व ओका ह्या नद्यांच्या संगमावर मोक्याच्या ठिकाणी, मॉस्कोच्या पूर्वेस ३९८ किमी. हे वसले असून पूर्वी बाजार व जत्रा यांच्याकरिता प्रसिद्ध होते. दोन्ही महायुद्धांमुळे ह्या शहराची खूपच वाढ झाली आहे. नवीन गॉर्की हा कारखान्यांचा भाग असून तेथे मोटारींच्या उत्पादनाचा एक प्रचंड उद्योग आहे. जुन्या गॉर्की भागात क्रेमलिनची इमारत आहे. व्होल्गा व ओका नद्यांच्या तीरांवर पसरलेल्या औद्योगिक परिसरात अभियांत्रिकी, लहानमोठी जहाजे, तेलवाहू जहाजे, सागरी विमाने, तरत्या याऱ्या, बर्फफोड्या बोटी इ. बांधणे, लाकूड व कागदधंद्याची यंत्रे व यंत्रहत्यारे बनविणे, कापड, पादत्राणे, प्लॅस्टिक, तेलशुद्धीकरण, आगगाडीचे डबे तयार करणे, लाकडी सामान, तंबाखू, अन्नपदार्थ इ. अनेकविध व्यवसाय चालतात. आसपासच्या शहरांत काच, रसायने, खते, कागद, कातडीसामान वगैरेंचे उत्पादन होते. या सर्वांना व्होल्गावरील जलविद्युत् व औष्णिक विद्युत् पुरविली जाते. येथून सर्व बाजूंस रस्ते, जलमार्ग, वायुमार्ग, लोहमार्ग यांनी वाहतूक चालते. येथे विद्यापीठ. शेती, वैद्यक आणि अभियांत्रिकी विद्यालये आहेत. संग्रहालय व जुने नाट्यगृहही आहे. सुप्रसिद्ध रशियन लेखक गॉर्की याचा जन्म या गावी झाला. १९३२ मध्ये त्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.
लिमये, दि. ह.