गासँदी, प्येअर : (२२ जानेवारी १५९२ — २४ ऑक्टोबर १६५५). फ्रेंच तत्त्वज्ञ. जन्म फ्रान्समधील एका खेड्यात. दीनी आणि एक्स येथे त्याने आपले आरंभीचे शिक्षण पुरे केले. वयाच्या एकविसाव्या वर्षी दीनी येथे साहित्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली. १६१४ मध्ये ॲव्हीन्यों येथून त्याने धर्मशास्त्रात डॉक्टरेट घेतली. १६१६ मध्ये त्याला धर्मोपदेशकाचे पद देण्यात आले. १६१७ ते १६२३ ह्या काळात एक्स विद्यापीठात तो तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होता. ह्या काळातच त्याने ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून आपला Exercitationes Paradoxicae Adversus Aristoteleos (१६२४) हा पहिला ग्रंथ लिहिला. त्यात ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानावर त्याने कठोर टीका केली आहे व आपले संशयवादी विचार मांडले आहेत. त्याचे खगोलशास्त्रीय संशोधनही सुरूच होते. १६१८ ते १६५५ पर्यंत त्याने केलेल्या खगोलशास्त्रीय नोंदींची टिपणे त्याच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाली. १६३० च्या सुमारास त्याने एपिक्यूरस तत्त्वज्ञानाचा, विशेषतः परमाणुवादाचा, सखोल अभ्यास केला. एपिक्यूरसप्रणीत तत्त्वज्ञान त्याच्या नंतरच्या ग्रंथांचा आधार ठरले.
दीनी येथील कॅथीड्रलचा ‘प्रॉहोस्ट’ म्हणून १६३४ मध्ये त्याची नियुक्ती झाली. १६४५ मध्ये ‘कॉलेज द फ्रान्स’ येथे त्याची गणित विषयाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. १६५४ मध्ये त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्याचा एक वर्षानंतर अंत झाला.
गासँदीला फ्रान्सचा ‘बेकन’ म्हटले जाते. तो अनुभववादी विचारवंत होता आणि त्याने विज्ञानात प्रायोगिक पद्धतीचा हिरिरीने पुरस्कार केला. एपिक्यूरसप्रणीत परमाणुवादी उपपत्ती त्याने पुन्हा उचलून धरली आणि एपिक्यूरसप्रणीत नीतिशास्त्राची सुधारून पुन्हा मांडणी केली. एपिक्यूरस तत्त्वज्ञानाच्या सखोल अभ्यासातून त्याने तीन महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले : (१) De Vita et Moribus Epicuri (१६४७) (२) Animadversiones in Decimum Libri Diogenis Laertii, qui est de Vita, Moribus Placitisque Epicuri (१६४९) आणि (३) Syntagma Philosophiae Epicuri, Cum Refutationibus Dogmatum, Quae Contra Fidem Christia num ab eo Asserta sant (१६४९). त्याने ख्रिस्ती तत्त्वज्ञान आणि एपिक्यूरसप्रणीत तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला तथापि तो सफल होऊ शकला नाही. कारण त्यात अनेक विसंगती राहून गेल्या. संकल्प स्वातंत्र्याच्या कल्पनेबाबत तर ह्या विसंगती विशेषत्वे जाणवतात.
त्याने रॉबर्ट फ्लड (१५७४ — १६३७) याच्या गूढवादावर आक्षेप घेऊन टीका केली. तसेच देकार्तच्या तत्त्वज्ञानावरही खडसून टीका करून अंतःप्रज्ञेऐवजी ऐंद्रिय वेदनेच अनुभवाचा व ज्ञानाचा मूलाधार असतात, असे मत प्रतिपादिले. ह्या त्याच्या भूमिकेमुळे तो आधुनिक वेदनवादाचा (सेन्सेशनॅलिझम) पूर्वसूरी ठरतो. त्याच्या एकूण तत्त्वज्ञानाचा विचार करता, त्याला संशयवादी न म्हणता अनुभववादी म्हणणेच अधिक युक्त ठरेल.
खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्याची चिकाटी, खगोलांच्या भ्रमणांचे सूक्ष्म अवलोकन आणि त्यांच्या भ्रमणांची नियमित नोंद करून ठेवण्याची त्याची पद्धती वाखाणण्याजोगी आहे. कोपर्निकसचे खगोलशास्त्रीय विचार त्याने उचलून धरले. कोपर्निकसचे खगोलशास्त्र हे संभाव्यतेवर आधारलेले आहे, असे त्याचे मत होते.
विज्ञानाच्या क्षेत्रात त्याने जरी काही मौलिक भर घातली नसली, तरी त्याच्या चिकित्सक आणि कुतूहलपूर्ण विचारसरणीमुळे इतरांना विज्ञानात प्रेरणा मिळाली. त्याने पेरेस्क, कोपर्निकस आणि ट्यूको ब्राए यांची चरित्रेही लिहिलेली आहेत.
संदर्भ : Brett, George, The Philosophy of Gassendi, London, 1908.
सुर्वे, भा. ग.