ॲबेलार्ड, पीटर : (? १०७९ – २१ एप्रिल ११४२). हा फ्रान्सचा सर्वश्रेष्ठ तत्त्वविवादपटू होता असे म्हणता येईल निदान मध्ययुगातील तो सर्वश्रेष्ठ तर्कवेत्ता व तत्त्ववेत्ता होता हे निश्चित. त्याला आदराने ‘पॅलेचा ॲरिस्टॉटल’ असे म्हणत. (फ्रान्समधील नँट्सजवळील पॅले हे त्याचे जन्मग्राम). काँपेन्य येथील रॉसेलँ, शँपो येथील विल्यम आणि लां येथील ॲन्सेल्म या त्या काळच्या श्रेष्ठ विद्वानांजवळ त्याने अध्ययन केले. पण लवकरच त्याने अभ्यासात इतके प्रावीण्य मिळविले, की तो आपल्या गुरूंच्या बरोबरीचा तर ठरलाच पण शिवाय मोठमोठ्या वादविवादांमध्ये तो त्यांच्या मतांना आव्हान देऊ लागला. त्याने स्वतः विद्यालये सुरू केली. तसेच तो पॅरिस विद्यापीठाच्या संस्थापकांपैकीही एक होता. एक काळ असा होता, की त्याची व्याख्याने ऐकण्यासाठी आणि त्याच्या हाताखाली शिकण्यासाठी केवळ फ्रान्समधूनच नव्हे, तर शेजारील देशांतूनसुद्धा हजारो विद्यार्थी हौसेने येत. आपली शिष्या एलॉईस (Heloise) हिच्याबरोबरच्या प्रेमप्रकरणामुळे तो साहित्यात व इतिहासात प्रसिद्ध आहे. जेव्हा एलॉईझने एका मुलाला जन्म दिला, तेव्हा ॲबेलार्डने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शविली. परंतु त्याचा सूड घेण्यासाठी तिच्या चुलत्याने ॲबेलार्डवर मारेकरी घातले व त्यांनी तो झोपेत बेसावध असताना त्याच्यावर क्रूर हल्ला करून अमानुष रीतीने त्याला जायबंदी केले. त्यानंतर ॲबेलार्डने पॅरिस सोडले व तो ख्रिस्ती भिक्षू बनला. एलॉईझ त्यापूर्वीच भिक्षुणी झाली होती. काही काळाने ॲबेलार्ड एका मठाचा अधिपती झाला पण त्याचे आयुष्य कधीच शांतपणे गेले नाही. ह्याचे एक कारण म्हणजे त्याचा स्वभाव. त्याने ईश्वरविद्येत अशा भूमिका घेतल्या, की चर्चकडून त्याचा निषेध होणे अटळ होते आणि तसा तो झालाही. त्याने वरचेवर मठ बदलले, शाळा स्थापन केल्या आणि एलॉईझ आपल्या मठाची प्रमुख झाल्यावर तिच्या जबाबदार्‍यांमध्ये तिला मदत करण्यासाठी तिचा सल्लागार म्हणूनही काम केले. ॲबेलार्ड आणि एलॉईझ यांच्यातील पत्रव्यवहार साहित्याच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. फ्रान्समध्येच क्लूनी येथे तो मरण पावला.

तत्त्वज्ञानाच्या प्रांतात ॲबेलार्डने तर्कशास्त्र व नीतिशास्त्र ह्यांवर पुस्तके लिहिली. स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाच्या प्रारंभीच्या काळी  सामान्यांच्या तत्त्वमीमांसात्मक स्थानासंबंधी जो वादविवाद झाला, त्यात त्याचाही वाटा होता. अतिवास्तववादी मानातात, त्याप्रमाणे ‘सामान्य’ हे एखाद्या संकल्पनेप्रमाणे स्वतःच सामान्यरूप असते काय? की नाममात्रतावाद मानतो त्याप्रमाणे सामान्ये म्हणजे स्वभावतःच विशिष्ट असलेल्या वास्तव पदार्थांना उद्देशून, विधेये म्हणून जे शब्द आपण वापरतो, ते केवळ शब्द असतात? ॲबेलार्डचा ह्या दोन्हीही भूमिकांना विरोध होता. ज्याला मागाहून ‘सौम्य वास्तववाद’ म्हटले गेले, अशी मधली भूमिका त्याने निर्माण केली. त्याच्या मते पदार्थमात्रात असे काही असले पाहिजे, की ज्यामुळे, ज्याच्या आधाराने, माणसांनी निर्माण केलेल्या सामान्य संकल्पना पदार्थमात्रांना उद्देशून वापरणे युक्त ठरते. पदार्थमात्रात असलेले हे काहीतरी म्हणजे सामान्य. सदसद्विवेकबुद्धीच्या व्यक्तिनिष्ठतेवर कित्येक आधुनिक नीतिशास्त्रज्ञांनी जो भर दिला आहे, त्याचे पूर्वदर्शन नो दायसेल्फ ह्या त्याच्या नीतिशास्त्रविषयक ग्रंथात मिळते. त्याच्या मते नीतिविचारात उद्दिष्टाला महत्त्व असते. प्रत्यक्षात जी कृती घडते तिच्या स्वरूपाला त्याने पुरेसे महत्त्व दिलेले नाही. ईश्वरविद्येत सनातनी मताहून वेगळी अशी याची कितीतरी मते होती. तरीसुद्धा त्याने प्रचलित केलेली विचारपद्धती ईश्वरविद्येत बरीच रूढ झाली. ईश्वराने प्रकट केलेल्या ज्ञानावर आपणास शक्य होईल तेवढे चिंतन करण्यावर त्याने भर दिला. एकाच प्रश्नावरील पूर्वपक्ष व उत्तरपक्ष एकत्र मांडण्याच्या स्केलॅस्टिक तत्त्वज्ञानाच्या पद्धतीचे पूर्वदर्शन त्याच्या येस् अँड नो या पुस्तकात होते. आयुष्यात त्याच्यावर अनेक आपत्ती आल्या. त्यांची माहिती सांगण्यासाठी त्याने जे एक दीर्घ पत्र लिहिले त्यासच मागाहून द स्टोरी ऑफ कलॅमिटीज असे नाव मिळाले. हे त्याचे आणखी एक प्रसिद्ध पुस्तक होय.

पहा : स्केलॅस्टिक तत्त्वज्ञान.

संदर्भ : 1. McKeon, R. Ed., Selections from Medieval Philosophers, New York, 1929.

           2. Ostlender, H. Trans. McCallum J. R.Abailard’s Christian Theology, London, 1948.

           3. Sikes, J. G. Peter Abailard, Cambridge, 1932.

जे. डी. मार्नेफ, एस्. जे. (इं.) दीक्षित मीनाक्षी (म.)