चित्रळ संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील वायव्य सरहद्दीवरील एक संस्थान. सध्या ते पाकिस्तानात आहे. त्याचे क्षेत्रफळ सु. ११,३०० चौ. किमी. असून लोकसंख्या सु. एक लाखाच्या आसपास होती (१९४१). उत्तरेकडे हिंदुकुश पर्वतांच्या रांगा, पश्चिमेस अफगाणिस्तान, पूर्वेस गिलगिट व दक्षिणेस दीर यांनी ते सीमित झाले असून त्याच्यापासून रशियाची हद्द सु. २० किमी. वर सुरू होते.

याच्या प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. येथे बौद्ध धर्मीय लोकांची वस्ती होती, असे नवव्या शतकातील एका संस्कृत लेखावरून दिसते. पुढे काही दिवस काबूलच्या जयपाल राजाच्या आधिपत्याखाली ते होते. स्थानिक परंपरेनुसार चंगीझखानानेही त्यावर हल्ले केले होते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस खोरासानमधून आलेल्या बाबा आयूबने हे संस्थान स्थापन केले. मेहतर ही त्याची पिढीजाद पदवी होती. रशियाच्या वाढत्या सत्तेला पायबंद घालण्याकरिता ब्रिटिशांनी या सरहद्दीवरील संस्थानात १८९२ मध्ये आपला राजकीय प्रतिनिधी नेमला. १८९५ मध्ये ब्रिटिशांनी लढाई करून शुजाउल्मुल्कला गादीवर बसविले आणि परराष्ट्रसंबंध व संस्थानचे संरक्षण आपल्या ताब्यात घेतले. त्याबद्दल मेहतरांना ते वार्षिक १२,००० रु. अनुदान देत. संस्थान आठ जिल्ह्यांत विभागले होते व चित्रळ हे राजधानीचे ठिकाण होते. जिल्हाप्रमुखाला अतालिक म्हणत. आदमजादा, अर्बाबजादा व फकीरमिस्कीन या तीन नावांखाली समाज विभागाला गेला होता. फकीरमिस्कीन हे त्यांतील सर्वांत गरीब लोक होते. बरेचसे मुसलमान खोजा इस्माईल पंथाचे होते व त्यांचा प्रमुख आगाखान मुंबईस राहत असे. त्यांची भाषा खोवार होती. एकोणिसाव्या शतकात येथे सुंदर मुलींचा व्यापार विधिसंमत होता. विसाव्या शतकात तो हळूहळू घटत गेला. सृष्टिसौंदर्यसंपन्न व सुपीक खोरी यांमुळे या प्रदेशास महत्त्व प्राप्त झाले. सुका मेवा, लोखंड, तांबे यांचा व्यापार भरभराटीत होता व ते उत्पन्नाचे एक मोठे साधन होते. चित्रळ तलवारींच्या पात्यांसाठी प्रसिद्ध होते. १९४७ मध्ये हे संस्थान पाकिस्तानात विलीन झाले पण कारभार काही दिवस पुढे मेहतरांकडेच होता.

कुलकर्णी, ना. ह.