लोहगड : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला व प्रसिद्ध पर्यटनस्थळ. तो मध्यरेल्वेच्या मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस सु. ७ किमी.वर व खंडाळ्याच्या आग्नेयीस सु. १४ किमी.वर इंद्रायणीच्या खोऱ्यात वसला आहे. त्याच्या परिसरात विसापूर हा दुसरा किल्ला जवळच आहे. तटबंदीच्या पायथ्याशी दाट वनराजीत केंबळी घरांचे छोटेखानी लोहगडवाडी हे गाव वसले आहे. बोरघाटाच्या मुखापाशी हा किल्ला असल्यामुळे लष्करी दृष्ट्या त्यास अनन्यासाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. हा किल्ला कुणी व केव्हा बांधला, याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि येथील अवशेषांवरून या किल्लयाविषयी काही माहिती उजेडात येते.

याचा प्राचीन इतिहास अस्पष्ट आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव इ. प्राचीन वंशांच्या आधिपत्याखाली तो होता. त्यानंतर बहमनी सुलतानांचा अंमल या प्रदेशावर होता. बहमनी सत्तेचे विभाजन झाल्यानंतर निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने त्याचा ताबा घेतला (इ.स. १४९१). निजामशाहीच्या ऱ्हासानंतर लोहगड आदिलशाही अंमलाखाली आला. पुढे लवकरच शिवाजी महाराजांनी तो त्यांच्याकडून घेतला (१६४८). सुरतेची लूट सुरक्षित ठेवण्यासाठी मराठ्यांनी याचाच उपयोग केला. पण पुरंदरच्या तहाने शिवाजींस तो मोगलांना द्यावा लागला (१६६५). शिवाजींनी तो पुन्हा जिंकून घेतला (१६७०) आणि या ठिकाणी लष्कराचे एक प्रमुख ठाणे केले व खजिना ठेवला. एखादा अपवाद वगळता हा किल्ला पुढे मराठ्यांकडेच अखेरपर्यत राहिला. उत्तर पेशवाईत त्यास पुन्हा महत्त्व प्राप्त होऊन नाना फडणीसांनी तिथे अनेक वास्तू बांधल्या. त्यांचे अवशेष तेथे असून तत्कालीन शिलालेखांतून तत्संबंधी माहिती मिळते. नाना फडणीसांनी धोंडोपंत नित्सुरे (निजसुरे) यास किल्लेदार नेमले. नानांच्या मृत्युनंतर त्यांची विधवा पत्नी जिऊबाई काही वर्षे या किल्ल्यावर होती. इंग्रज-मराठे युद्धात कर्नल प्रॉथर ह्याने विसापूर घेताच (१८१८) मराठ्यांनी लोहगड सोडला. १८४५ पर्यंत ब्रिटिशांच्या सैन्याची एक तुकडी या किल्ल्यावर होती.

गणेश, नारायण, हनुमान व महा अशी चार प्रवेशद्वारे गडावर आहेत. यांपैकी हनुमान हे प्राचीन असून उर्वरित द्वारे नाना फडणीसांनी बांधली. गणेश दरवाज्यावरील पट्टीवर एक महत्त्वपूर्ण शिलालेख आहे. त्यात त्याच्या बांधकामाचा कालावधी दिला आहे. महादरवाज्यातून आत गेल्यावर औरंगजेबाच्या मुलीची कबर लागते पण तिचे नाव ज्ञात नाही. त्याच्याजवळ सदर व लोहारखान्याचे भग्नावशेष असून तेथे जवळच खनिज्याची २१ X १५ मी. अशी प्रशस्त कोठी आहे. कोठीशेजारी एका  टेकडीवर मोठे तळे आहे. ते नाना फडणीसांनी इ.स. १७८९ मध्ये बांधले आहे, असा शिलालेखात उल्लेख होता. जवळच त्रिंबकेश्वराचे छोटे मंदिर आहे. सांप्रत या किल्ल्यावर पौष पौर्णिमेला शेख उमर या मुस्लिम साधूंच्या स्मरणार्थ मोठा उरूस भरतो. त्या ठिकाणी शेख उमर यांची जुनी कबर आहे. याच्या पश्चिमेस पंधराशे मी. लांब व तीस मी. रुंद दगडी भिंतीसारखा कडा आहे. त्याच्या नैसर्गिक आकारावरून त्यास विंचूकाटा म्हणतात. त्याच्या नैऋत्येकडे प्रसिद्ध उंबरखिंड आहे.

संदर्भ : 1. Kamalakar,J.N. The Deccan Forts, Bombay, 1981.  

           २.घाणेकर, प्र.के. साद सह्याद्रीची! भटकंती किल्यांची!! पुणे १९८५.

           ३.दांडेकर,गो. नी. दुर्गभ्रमण गाथा, मुंबई, १९८३ .

घाडगे, विमल.