चितळदुर्ग : चित्रदुर्ग. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५०,२५४ (१९७१). हे बंगलोर-पुणे महामार्गावर बंगलोरच्या वायव्येस २०३ किमी. असून दक्षिण रेल्वेशी चिकजाजूर-चित्रदुर्ग रेल्वेफाट्याने जोडलेले आहे. येथे कापसाचा व्यापार चालतो. शहराच्या पश्चिमेस चंद्रावली येथे दुसऱ्या शतकातील सातवाहनांचे काही पुरातन अवशेष सापडले आहेत. चितळदुर्ग अनुक्रमे राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, होयसळ, विजयानगर, हैदरअली यांच्या अंमलाखाली होते. होयसळांची येथे राजधानी असून तिचे त्यावेळचे नाव बेम्मातनकल अथवा बेम्मातनूर होते. प्राचीन काळी हे अनेक नावांनी प्रसिद्ध असून महाभारतकालीन दैत्य हिडिंबासुर येथे राहत होता, अशीही आख्यायिका आहे. त्याचा दातही येथे एका मंदिरात ठेवलेला दाखवितात. गाव किल्ल्यात वसलेले असून भोवती सात तट आहेत. त्यांपैकी तीन सपाटीवर व चार टेकडीवर आहेत.

कापडी, सुलभा