औंध संस्थान : महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक संस्थान. औंध हे त्याच्या राजधानीचे ठिकाण होते. ते सातारच्या आग्‍नेयीस सु. ४२ किमी. वर वसले आहे. प्रथम ह्या संस्थानाच्या अंमलाखाली कोकणपट्टीतील काही प्रदेश तसेच कराड, कोरेगाव, खटाव, वाई वगैरे तालुके होते पण पुढे ते हळूहळू कमी होऊन, त्यांतील काही भाग विशाळगडचे प्रतिनिधी ह्यांचेकडे तसेच इतर मराठे सरदारांकडे गेला. विलीनीकरणाच्या वेळी, १९४८ मध्ये याचे क्षेत्रफळ सु. १,२९५ किमी. एवढे व उत्पन्न ३,५३,००० रु. होते. संस्थानची लोकसंख्या ७६,५०७ (१९४१) होती. याचा प्रदेश अनेक ठिकाणी इतका विखुरलेला होता की, औंधच्या परिसरातील तीनसाडेतीन किमी.च्या पलीकडचा प्रदेशही त्यांत समाविष्ट नव्हता. तथापि हे संस्थान इंग्रजांस खंडणी देत नव्हते, हे त्याचे वैशिष्ट्य होते. किर्लोस्कर बंधूंचा किर्लोस्करवाडीचा लोखंडी सामानाचा कारखाना व ओगल्यांचा ओगलेवाडीचा काचकारखाना या संस्थानात सुरू झाल्यामुळे त्यास औद्योगिक चालना मिळाली.

इतिहास : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किन्हई गावचा कुळकर्णी त्र्यंबक कृष्ण हा देशस्थ शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण, या घराण्याचा मूळ पुरुष होय. याचा मुलगा परशुराम त्र्यंबक(१६६० — १७१७) याने छत्रपती राजाराम जिंजीस वनवासात असता, इकडे महाराष्ट्रात रामचंद्रपंत अमात्याचे हाताखाली औरंगजेबाविरुद्ध अनेक चकमकी व लढाया करून आपले शौर्य व कर्तबगारी प्रकट केली. यामुळे राजारामाने यास प्रतिनिधिपद दिले व समशेर जंग बहादुर हा किताब दिला. परशुराम त्र्यंबकाने १७०३ मध्ये खेळण्याच्या वेढ्यातही विशेष पराक्रम दाखविला. पुढे शाहू व ताराबाई यांच्या भांडणात प्रथम प्रतिनिधींनी ताराबाईचा पक्ष सोडला नाही पण पुढे या घराण्याच्या दोन शाखा होऊन एक सातारा छत्रपतींच्या राज्यात औंध येथे स्थिरावली व दुसरी कोल्हापूर छत्रपतींच्या राज्यात विशाळगडास स्थायिक झाली. परशुरामपंतानंतर त्याचा मुलगा श्रीपतराव काहीसा कर्तबगार निघाला. पण पुढे दोन्ही घराण्यांत कोणीच कर्तबगार निघाला नाही. पेशव्यांचे व यांचे सूत नीट जमले नव्हते. थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीत तर त्याने निजामाच्या मदतीने काही काळ बंडच उभारले होते. दुसऱ्या बाजीरावाच्या वेळी  केलेल्या छोट्या छोट्या उठावांमुळे परशुरामपंत (थोटा पंत, १७७७ — १८४८) व त्याची रक्षा ताई (रमा) तेलीण या व्यक्ती प्रकाशात आल्या. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भवानराव ऊर्फ बाळासाहेब (१८६९ — १९५१) ही एक अवश्य उल्लेखनीय व्यक्ती या घराण्यात होऊन गेली. त्यांनी आपल्या थोरल्या भावास बाजूस सारून संस्थानची गादी मिळविली, असा एक समज आहे. हे सुशिक्षित, कलाभिज्ञ, चित्रकार व विद्वान होते आणि औद्योगिक विकास, सूर्यनमस्कार-व्यायाम, शिक्षणप्रसार इत्यादींचे ते चहाते होते. त्यांनी आपल्या संस्थानात बऱ्याच सुधारणा केल्या. संस्थानात शिक्षण सक्तीचे व मोफत होते. ह्याशिवाय त्यांनी संस्थानचा कारभार कौन्सिलमार्फत चालावा, अशी योजना केली. तीत एकंदर ३५ सभासद असून सरकारी १०, सरकारनियुक्त ७ आणि लोकनियुक्त १८ सभासद होते. ह्यांवरून लोकनियुक्त राज्यपद्धतीकडे त्यांचा ओढा होता हे दिसून येते. म्हणून १९४८ मध्ये औंध संस्थान विलीन होण्यापूर्वी जे राजप्रतिनिधींचे मंडळ निर्माण झाले होते, त्याचे अध्यक्षपद ह्यांना देण्यात आले होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. आप्पासाहेब पंत यांनी अनेक देशांत भारतीय संघराज्याचे राजदूत म्हणून काम केले. नुकतीच त्यांची इंग्‍लंडमधून राजदूत म्हणून इटलीमध्ये बदली झाली आहे. त्यांनी कै. बाळासाहेब यांचे ग्रंथ, कलावस्तू, जुनी चित्रे इत्यादींचा सारा संग्रह महाराष्ट्रशासनास दिल्यामुळे त्याचे औंध येथे एक संग्रहालय बनविण्यात आले आहे.

संदर्भ : भागवत, अ.ना. सातारच्या प्रतिनिधि घराण्याचा इतिहास, औंध, १९२४.

खेर, ग. ह.